ChatGPT आणि Google Gemini सारख्या AI असिस्टंटमुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. पण या सोयींसोबतच आपल्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. विशेषतः जेव्हा आपल्या खाजगी माहितीचा प्रश्न येतो.
‘Google Gemini’ काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या आठवड्यात अनेक अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना Google कडून एक ईमेल करण्यात आला. त्यात सांगण्यात आलं होतं की, 7 जुलै 2025 पासून Google Gemini तुमच्या फोनमधील काही ॲप्ससोबत कशा प्रकारे काम करेल आणि त्यामध्ये काय नवीन बदल होणार आहेत. त्या ईमेलमध्ये स्पष्टपणे असंही सांगितलं होतं की, तुम्ही तुमची Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी बंद केली असेल तरी, Gemini आता तुम्हाला तुमचे फोन कॉल, मेसेजेस, WhatsApp मेसेजेस आणि इतर युटिलिटी ॲप्स वापरण्यात मदत करू शकणार आहे.
याचा अर्थ असा की, Gemini ला तुम्ही तुमच्या वैयक्तिक डेटाची परवानगी दिली नसतानाही, ते आता तुमच्या कॉल, मेसेजेस आणि WhatsApp मधील माहिती पाहू शकणार आहे. ही गोष्ट अनेकांसाठी धक्का देणारी आहे. कारण आपल्या खासगी संभाषणात AI डोकावतंय हे कोणालाच आवडणार नाही.
Google च्या वेबसाइटवर स्पष्टपणे सांगितलं आहे की, ‘Gemini ॲप्समुळे तुम्ही थेट Google AI वापरू शकता आणि यामध्ये तुमच्या चॅट तुमच्या खात्यात 72 तासांपर्यंत सेव्ह केल्या जातात’. मग तुम्ही Gemini ॲप्सची ॲक्टिव्हिटी चालू ठेवली असो वा बंद.
Google Gemini बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे
Google Gemini त्यांच्या नवीन अपडेटमुळे जास्त उपयुक्त झालं असलं, तरी अनेक वापरकर्त्यांना ही गोष्ट खाजगी आयुष्यात डोकावल्यासारखी वाटू शकते. आपल्या नकळत आपलं संभाषण, लोकेशन आणि आपण आपल्या मोबाईलमधील ॲप्समध्ये काय करतोय, काय पाहतोय ही सगळी माहिती AI कडे जात असेल, तर ती एक चिंतेची बाब आहे. आपले मेसेजेस कोण वाचतंय, हे आपल्याला माहीत असायलाच हवं.
अजूनही अनेकांना हे माहीतच नाही की Gemini तुमच्या खाजगी माहितीला ॲक्सेस करू शकतं आणि या माहितीचा वापर करून रिप्लाय देऊ शकतं. तुमचे मेसेजेस, लोकेशन आणि ॲपमधील ॲक्टिव्हिटी आता AI द्वारे हाताळली जाऊ शकते.
काय काय पाहू शकतं Gemini?
WhatsApp, Gmail, YouTube मधील माहिती, तुमचे मेसेजेस, ईमेल, तुम्ही YouTube वर काय पाहता, तुम्ही कुठे आहात, तुमच्या कॅलेंडरमध्ये काय कार्यक्रम आहेत, तुम्ही कोणत्या ॲप्समध्ये काय करता, तुमच्या नोटिफिकेशन्स आणि तुमच्या स्क्रीनवर काय दिसत आहे, हे सर्वकाही Gemini पाहू शकेल. जर तुम्ही Gemini Ai ला परवानगी दिली असेल तर. तुमच्या फोनवरील जवळपास प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष ठेवू शकतं.
हे ‘सेटिंग’ बंद कसं करायचं?
जर तुम्हाला Gemini ला तुमच्या खासगी माहितीपासून दूर ठेवायचं असेल, तर ही सेटिंग लगेच बदलून टाका. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
– तुमच्या अँड्रॉइड फोनवर Gemini ॲप उघडा.
– वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
– आता Gemini Apps Activity नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
– एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला चालू/बंद करण्याचे बटण दिसेल. तो टॉगल बंद करा.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्ही हे फीचर बंद केले तरी, Google Gemini ॲप्सची सुरक्षितता आणि सुरक्षा राखण्यासाठी तुमचा डेटा 72 तासांपर्यंत साठवून ठेवला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमध्ये Gemini ॲपच बंद करू शकता, जेणेकरून AI तुमच्या डिव्हाइसवरील कोणतीही ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकणार नाही.
हेही वाचा : वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपमधलं वैविध्य
Google Assistant चं काय?
जर तुम्हाला Gemini ऐवजी Google Assistant चा वापर करायचा असेल, तर तुम्ही तेही करू शकता.
– तुमच्या फोन सेटिंग्जमध्ये जा.
– ॲप्स वर टॅप करा आणि मग डिफॉल्ट ॲप्स निवडा.
– डिजिटल असिस्टंट ॲप हा पर्याय निवडा.
– यामध्ये तुम्ही ‘काहीही नाही’ पर्याय निवडू शकता किंवा Gemini बंद करून Google Assistant निवडू शकता.
तुमच्या खासगी माहितीची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे, लवकरात लवकर हे बदल करून घ्या आणि आपली डिजिटल माहिती सुरक्षित ठेवा.