आपल्या शरीराला रोज 7-8 तास झोपेची आवश्यकता असते. पण अनेकदा असं होतं की पुरुषांना 7-8 तासांची झोप पुरेशी होते आणि ते सकाळी ताजेतवाने उठतात. पण स्त्रिया मात्र 8 तास झोपूनही सकाळी त्यांना थकल्यासारखं वाटतं. कधीकधी तर एनर्जीच नसते. असं का होतं? स्त्रियांना खरोखरंच पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते का? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज का लागते?
1. शारीरिक बदल आणि आयुष्यातील टप्पे
स्त्रियांच्या शरीरात अनेक मोठे शारीरिक बदल घडतात. जे पुरुषांच्या शरीरात होत नाहीत. याच बदलांमुळे त्यांना जास्त झोपेची आवश्यकता असते. गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती हे दोन्ही टप्पे स्त्रियांच्या शरीरावर खूप ताण आणतात. गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. यामुळे खूप जास्त ऊर्जा खर्च होते आणि थकवा येतो. बाळंतपणानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी जास्त झोपेची गरज असते.
2. हार्मोन्सचे चढ-उतार
स्त्रियांमध्ये मासिक पाळीमुळे हार्मोन्सच्या पातळीत म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यामध्ये बदल होत असतात. हार्मोन्समध्ये होणाऱ्या या सततच्या चढ-उताराचा शरीरावर आणि विशेषतः झोपेच्या चक्रावर खूप परिणाम होतो. या हार्मोनल बदलांमुळे कधी झोप कमी येते, कधी तिची गुणवत्ता बिघडते, तर कधी जास्त झोपूनही थकवा जाणवतो. हा हार्मोनल ताण भरून काढण्यासाठी स्त्रियांना जास्त झोपेची आवश्यकता असते.
3. मल्टीटास्किंग आणि जबाबदाऱ्या
सध्याच्या काळात अनेक स्त्रिया घरातील कामं आणि ऑफिसचं काम अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात. त्याचबरोबर मुलांची काळजी घेणे, घर व्यवस्थित ठेवणे, कुटुंबातील कार्यक्रमांचे नियोजन करणे अशा अनेक गोष्टी त्या एकटीने सांभाळतात. खरंतर स्त्री ही एक मल्टीटास्कर आहे. अनेकदा स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या जबाबदाऱ्यांना जास्त महत्त्व देतात. ही सगळी धावपळ त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या थकवून टाकते आणि म्हणून स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते.
पण स्त्रियांना पुरेशी झोप मिळते का?
खरं तर, आजकाल पुरुष आणि स्त्रिया दोघंही झोपेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. बऱ्याचदा त्यांना पुरेशी झोप मिळत नाही किंवा झोपेची गुणवत्ता चांगली नसते. यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ‘स्लीप डिसऑर्डर’ सारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
हेही वाचा : मेंदूच्या मेंटेनन्ससाठी झोप अत्यावश्यक
स्त्रियांमध्ये झोपेच्या समस्यांची कारणे काय आहेत ?
मासिक पाळीच्या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदल स्त्रियांच्या झोपेवर थेट परिणाम करतात. यामुळे कधी चिडचिड होते, तर कधी पोटात दुखते यामुळे शांत झोप लागत नाही.
गर्भधारणेच्या काळात स्त्रियांच्या शरीरात खूप मोठे बदल होतात. पोटाचा आकार वाढणे, लघवीला वारंवार जावे लागणे, पायांना सूज येणे अशा अनेक शारीरिक बदलांमुळे झोप कमी होते.
मेनोपॉजच्या काळात अनेक स्त्रियांना जास्त गरम होतं, रात्री खूप घाम येतो किंवा मूड स्विंग्ज होतात. या लक्षणांमुळे त्यांची झोपमोड होते आणि त्यांना शांत झोप मिळत नाही.
तसंच जसजसे वय वाढते, तसतशी झोप कमी होत जाते वृद्ध स्त्रियांमध्ये हे जास्त दिसून येतं.
थायरॉईड, मधुमेह, संधिवात यांसारखे काही जुनाट आजार किंवा त्यांच्यासाठी घेत असलेल्या औषधांमुळेही झोप व्यवस्थित येत नाही.
रात्री दोन किंवा अधिक वेळा लघवीसाठी उठावे लागल्याने झोपेचे चक्र बिघडते आणि गाढ झोप लागत नाही.
दिवसा जास्त वेळ झोपल्यामुळे काही स्त्रियांना रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो, याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो.
चांगली झोप आणि आजारांवर नियंत्रण
चांगल्या झोपेचा संबंध केवळ थकवा घालवण्याशी नाही, तर अनेक आजार बरे होण्याशीही आहे. आपल्या शरीरातील कुठलेही आजार बरे करण्यासाठी, आपल्या मेंदूमध्ये एक ‘सप्लाय चेन’ सतत काम करत असते. ही साखळी आपल्या शरीरात नवीन आणि निरोगी प्रोटीन्स तयार करते. त्याचबरोबर जे अनावश्यक प्रोटीन्स आहेत त्यांना शरीरातून बाहेर काढण्याचे कामही ही साखळी करते. आणि ही संपूर्ण प्रक्रिया पुरेशी आणि योग्य झोप असेल तरच व्यवस्थित काम करते. कारण हे महत्त्वाचे काम झोपेतच होतं.
आपल्या शरीरातील हार्मोन्सची पातळी ही सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे या नैसर्गिक चक्रावर अवलंबून असते. काही हार्मोन्स सूर्योदयानंतर एका ठराविक पातळीवर पोहोचतात आणि रात्री झोपेला मदत करणारे हार्मोन्स सक्रीय होतात.
आजकाल अनेक तरुण रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि सकाळी उशिरा उठतात. ही जीवनशैली अतिशय चुकीची आहे. यामुळे शरीराचे नैसर्गिक ‘बायोलॉजिकल क्लॉक’ बिघडते. आणि याचा परिणाम फक्त झोपेवरच नाही, तर हार्मोन्सच्या संतुलनावर होतो. अशा अनियमीत झोपेमुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.