तुम्ही कधी विचार केलाय का, की आपले दात आणि आपला मेंदू यांचं काही कनेक्शन असू शकतं? थोडं विचित्र वाटेल, पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आपल्या दातांचं आरोग्य आणि आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुमचे दात खराब असतील किंवा त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर याचा परिणाम तुमच्या मेंदूवरही होतो. यामुळे तुमच्या मेंदूचा आकार कमी होऊ शकतो. खासकरून आपल्या आठवणी आणि शिक्षणाच्या संबंधित गोष्टी लक्षात असतात, मेंदूच्या त्या भागावर परिणाम होऊ शकतो. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
नेमकं काय आहे हे नवीन संशोधन?
‘न्यूरोलॉजी’ नावाच्या एका मोठ्या सायन्स मासिकात प्रसिध्द झालेल्या नवीन अभ्यासानुसार, जर तुम्ही तुमच्या दातांची नीट काळजी घेतली नाही किंवा तुम्हाला हिरड्यांचे काही आजार असतील, तर तुमच्या मेंदूतला ‘हिप्पोकॅम्पस’ नावाचा भाग वेगाने लहान होऊ शकतो.
हिप्पोकॅम्पस या भागात आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायला आणि नवीन काहीतरी शिकायला मदत करतो. आपली स्मरणशक्ती आणि नवीन गोष्टी शिकण्याची शक्ती या हिप्पोकॅम्पसवर अवलंबून असतात.
या रिसर्चमध्ये एकूण 172 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. शास्त्रज्ञांनी या सगळ्यांच्या दातांची तपासणी केली,
त्यांच्या स्मरणशक्तीच्या टेस्ट घेतल्या गेल्या आणि तब्बल चार वर्षं त्यांच्या मेंदूचे स्कॅनही काढले गेले. या सगळ्या माहितीचा अभ्यास करूनच संशोधकांनी हे महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत.
मेंदूसाठी ‘रेड अलर्ट’?
या अभ्यासात एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे, ज्या लोकांना हिरड्यांचे आजार होतात किंवा दात पडले होते , आणि काहीजणांना हे दोन्ही प्रॉब्लेम्स एकत्र होते, त्यांच्या डाव्या हिप्पोकॅम्पसचा आकार खूप लवकर कमी होत होता. डावा हिप्पोकॅम्पस हा आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो ‘अल्झायमर’ म्हणजे गोष्टी हळू हळू विसरणे , स्मृती जाणे या आजरामध्ये सर्वात आधी मेंदूचा हा डावा हिप्पोकॅम्पस भाग खराब व्हायला लागतो. याचा अर्थ , आपल्या तोंडाच्या स्वच्छतेचा आणि आरोग्याचा संबंध आपल्या मेंदूवर वयानुसार होणाऱ्या बदलांशी असू शकतो.
पण यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यात आली की, दात खराब झाले म्हणजे तुम्हाला ‘अल्झायमर’ होतोच असं नाही. दात खराब झाले तर मेंदूवर परिणाम होतो हे शास्त्रज्ञांना दिसतंय पण, हे नेमकं का होतं, यावर अजूनही त्यांचं संशोधन सुरू आहे.
हेही वाचा : दात पुन्हा येण्यासाठी नवीन औषधाचा शोध!
हिरड्यांचा गंभीर आजार
या रिसर्चमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग गोष्ट समोर आल्या आहेत. ज्या लोकांना हिरड्यांचा आजार कमी प्रमाणात होता, त्यांचे जर दात पडले तर त्याचा परिणाम मेंदूवर दिसायचा. पण, ज्या लोकांना हिरड्यांचा आजार गंभीर होता, त्यांच्यासाठी जास्त दात तोंडात टिकवून ठेवले तर मेंदूचा आकार उलट जास्तच कमी होताना दिसत होता.
यासंदर्भात संशोधकांनी यावर एक सोपं स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा हिरड्यांचे आजार खूप वाढतात, तेव्हा आपल्या शरीरात सतत सूज (Inflammation) तयार होते. ही सूज आपल्या मेंदूलाही त्रास देऊ शकते. जर तुमचे खराब दात तसेच तोंडात असतील आणि त्यामुळे तुमच्या शरीरात सूज वाढत असेल, तर ही सूज मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. फक्त दात तोंडात असणे पुरेसं नाही, तर ते निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे.
यावर उपाय काय?
आपल्या तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवणं हे फक्त छान हसण्यासाठी किंवा फ्रेश श्वासासाठी नाही, तर ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, नियमितपणे दातांची काळजी घेणं, रोज नीट दात घासणे, फ्लॉसिंग करणे आणि दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन तपासणी करणे या सर्व गोष्टी नियमित केल्या तर स्मृतिभ्रंशचा धोका नक्कीच कमी होईल.
अनेकदा आपण फक्त मोठ्या आजारांवर लक्ष देतो आणि दातांसारख्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण असं न करता आपल्या दातांनाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. आजपासूनच आपल्या दातांची काळजी घ्यायला सुरुवात करा. सकाळी आणि रात्री दात घासणे, गोड पदार्थ कमी खाणे, आणि नियमितपणे डेंटिस्टकडे जाणे या सवयी लावून घ्या.