महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका विषय चांगलाच तापलाय. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात मोबाइलवर चक्क ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, आणि कर्जाच्या ओझ्याने महाराष्ट्रातील बळीराजा त्रस्त आहे, तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री विधानमंडळासारख्या पवित्र सभागृहात ऑनलाइन जुगार खेळण्यात मग्न आहेत. कोकाटे यांनी या प्रकरणावर दिलेले स्पष्टीकरण इतकं तकलादू आणि हास्यास्पद आहे की, त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा रोष अधिकच वाढलाय. राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केलाय की चोरी केलीय, असा उलट निर्लज्ज सवालही त्यांनी यावेळी विचारला. एवढी छोटी गोष्ट मोठी का झाली हेच कळत नाही, असंही कोकाटेंना वाटतंय. त्यांची ही विधानं संतापजनक आणि शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलतेचा कळस आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी आज अभूतपूर्व संकटातून जात आहेत. रोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कर्जमाफी, पिक विमा आणि किमान आधारभूत किंमतींची मागणी करणारे शेतकरी उपेक्षित आहेत. काही भागात अतिवृष्टीमुळे पिकं आडवी झाली आहेत. तर अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना, कृषिमंत्री मात्र सभागृहात जुगार खेळण्यात व्यस्त आहेत. हा व्हिडिओ केवळ कोकाटे यांचा बेजबाबदारपणा नाही, तर सत्ताधारी महायुती सरकारच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या उदासीनतेचा पुरावा आहे. ज्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन उपाययोजना सुचवल्या जायला हव्या, तिथे कृषिमंत्री ऑनलाइन जुगारात रममाण होत आहेत. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे टीकेचा भडिमार झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दावा केलाय की, मी रमी खेळत नव्हतो तर त्यांच्या मोबाइलवर कोणीतरी गेम डाउनलोड केला होता आणि ते तो गेम बंद करण्याचा प्रयत्न करत होते. यापुढे जाऊन पुन्हा ते म्हणतात की, विधानसभेचं कामकाज पाहण्यासाठी यूट्यूब उघडलं आणि त्यावेळी काही सेकंदांसाठी रमी गेमची जाहिरात आली. हा दावा इतका हास्यास्पद आहे की ते यातून सगळ्या राज्यालाच वेड्यात काढत असावेत. एका जबाबदार मंत्र्याला आपल्या मोबाइलवर कोणतं ॲप डाउनलोड झालंय याचीही माहिती नसावी? आणि जर गेम चुकून उघडला गेला असेल, तर त्याला बंद करण्यासाठी इतका वेळ का लागावा? यावरून कोकाटे यांचे स्पष्टीकरण पूर्णपणे भंपक आणि खोटं असल्याचं स्पष्ट होतं.
माणिकराव कोकाटे आणि वाद यांचं नातं जुनं आहे. यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्यानं त्यांच्यावर टीका झाली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोर्टानं त्यांना 29 वर्षे जुन्या प्रकरणात सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
त्याआधी कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं विधान केलं होतं. आजच्या काळात भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविमा देतोय अशी उपकाराची भाषाही त्यांनी बोलून दाखवली होती. एवढंच नाही तर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कोकाटे यांनी शेतकरी हे कर्जमाफीच्या आणि पिक विम्याच्या पैशातून घरातील लग्न, साखरपुडे करतात असा नवा जावईशोध माणिकराव कोकाटेंनी लावला होता.
माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. याच कारणामुळे छगन भुजबळ यांना डावलून पवारांनी कोकाटे यांना मंत्री केलं. तेही कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं दिलं. परंतु कोकाटेंमुळे अजित पवारांची चांगलीच अडचण वाढलीय. एवढे दिवस अनेक प्रकरणांवर पवारांनी आणि पक्षाने कोकाटेंची पाठराखण केली. पण या प्रकरणी माध्यमांच्या प्रश्नांना तोंड देत मुख्यमंत्री फडणवीसांसह सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांची चांगलीच दमछाक होतेय. विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेत. मिडिया, सोशल मिडियावरही कोकाटेंवर चहुबाजूने टीका होऊ लागलीय. अशा परिस्थितीत या प्रकरणात महायुती सरकार चांगलंच गोत्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय.
या प्रकरणी लातुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छावा संघटनेत झालेल्या राड्यामुळे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची विकेट पडलीय. पक्षानेही कोकाटेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत. कृषिमंत्र्यांकडून जे घडलं ते अयोग्य आहे आणि पक्ष त्यांच्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल असं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे आजवर कोकाटे यांचे सगळे अपराध पदरात घेऊन त्यांची निर्दोष सुटका करणारे अजित पवार यावेळी त्यांना बाजूला सारतील की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतील हे बघावं लागेल. पण पक्षाने कारवाई करण्यापेक्षा स्वतः कृषिमंत्र्यांमध्ये थोडीशी नैतिकता उरली असेल तर तद्दन बोगस स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा ओसाड गावची पाटीलकी सोडून द्यावी आणि महाराष्ट्राचं भलं करावं हीच काय ती बळीराजाची अपेक्षा.