हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. 21 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने टीम इंडियाला शेवटचा एकदिवसीय सामना जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात तिने एकूण 6 विकेट्स घेतल्या. क्रांतीच्या इनस्विंग गोलंदाजीचे इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंना शेवटपर्यंत उत्तर सापडले नाही.
सायबांच्या देशात घुमला क्रांतीचा आवाज
इंग्लंडमध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी क्रांती गौड ही दुसरी भारतीय महिला वेगवान गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात टीम इंडियाची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने साउथगेटमध्ये 31 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. क्रांती ही वनडे क्रिकेटमध्ये 6 विकेट्स घेणारी केवळ चौथी भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी फिरीकी गोलंदाज दीप्ती शर्माने दोनदा असा पराक्रम केला होता. तर ममता माबेन आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी भारतासाठी केली होती.
टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचा खडतर प्रवास
भारतीय महिला संघाकडून खेळण्याचा प्रवास क्रांती गौरसाठी अजिबात सोपा नव्हता. मध्य प्रदेशातील छिंदवाडा मध्ये राहणाऱ्या क्रांतीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. एकेकाळी शेजाऱ्यांकडून अन्न मागून पोट भरण्याची वेळी तिच्या कुटुंबीयांवर ओढवली होती. छिंदवाडामध्ये क्रिकेट या खेळाकडे केवळ एक आवड म्हणून पाहिलं जात होतं. आर्थिकदृष्ट्या गरीब पार्श्वभूमीतून आलेली क्रांती तीन भाऊ आणि तीन बहिणी अशा सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होती. पोलीस दलात काम करणारे तिचे वडील क्रांतीचा क्रिकेट प्रवास सुरु होण्यापूर्वी आपली नोकरी गमावून बसले होते. यामुळे कुटुंबाला स्थलांतर करावे लागले. आणि मर्यादित गोष्टींमध्ये त्यांना काम करावे लागले. या अडचणी असूनही तिच्या वडिलांनी तिला स्थानिक क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले होते. क्रांतीमधील जलद गोलंदाजीची जन्मजात प्रतिभा हेरण्याचे काम त्यांनी केले होते. तिचा मोठा भाऊ मयंक सिंग यानेही तिला भावनिक आधार दिला. तिच्या WPL निवडीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांदरम्यान तिला प्रोत्साहन द्यायला तो नेहमी तिच्यासोबत असायचा.
हेही वाचा- गोठलेल्या बर्फातून पोडियमपर्यंत…
हार्दिक पंड्या क्रांतीचा आदर्श
क्रांतीने टेनिस बॉलने खेळायला सुरुवात केली. ज्यामध्ये ती मुलांसोबत खेळायची आणि जिथे कोणीही फिरकी गोलंदाजी करत नव्हते. म्हणून तिने तिचे संपूर्ण लक्ष वेगवान गोलंदाजीवर केंद्रित केले होते. हार्दिक पंड्याला क्रांती खूप फॉलो करते. आणि जेव्हा त्याने वेगवान गोलंदाजी सुरू केली तेव्हा ती हार्दिक पंड्याचे गोलंदाजीचे व्हिडिओ पाहत होती. आणि त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होती. क्रांती गौडने महिला क्रिकेटच्या स्पर्धात्मक जगात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. एक आशादायक वेगवान गोलंदाज म्हणून ती उदयास आली आहे. गौडच्या व्यावसायिक क्रिकेटमधील प्रवेशामुळे मध्य प्रदेशच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती झाली. तिने 23 वर्षांखालील आणि वरिष्ठ संघांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि एक विश्वासार्ह वेगवान गोलंदाज म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली. 2024-25 च्या वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडकात तिने 15-17 बळी घेतले होते. बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात 25 धावा देत 4 विकेट्स ही सामना जिंकून देणारी तिची कागमरी होती. यामुळेच मध्य प्रदेशला विजय मिळवून देण्यात तिला यश आले होते. या कामगिरीने WPL च्या स्काउट्सचे लक्ष तिने वेधून घेतले होते.
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये पाडली वेगळी छाप
महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL मध्ये तिने सर्वप्रथम आपला ठसा उमटवला. आणि यानंतर भारतीय संघात तिची निवड करण्यात आली होती. आपल्या भेदक इनस्विंग गोलंदाजीमुळे तिने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतेले होते. ग्रामीण भागातील महिलांसाठी संधी कमी असलेल्या खेळात अडचणींवर मात करण्याची करण्याची किमया तिनं केली आहे. 2025 च्या WPL हंगामात युपी वॉरियर्सकडून खेळताना गौडला यश मिळाले. तिने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चार विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली. या चमकदार कामगिरीमुळेच तिच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्गही मोकळा झाला होता. उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आणि तळाच्या फळीतील फलंदाज म्हणून गौड भारतीय क्रिकेटपटूंच्या नवीन लाटेचे प्रतीक आहे. जे आक्रमकतेसह रणनीतिक कौशल्याचे मिश्रण म्हणता येईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपात संघाच्या विकसित होत असलेल्या गतिमानतेत ती आपले मोलाचे योगदान देते आहे. भारतीय क्रिकेटमधील या उदयोन्मुख क्रिकेटपटूमुळे संघाला एक नवी वेगवान गोलंदाज मिळाली आहे. क्रांतीमध्ये भारतीय क्रिकेटची अनेक वर्ष सेवा करण्याची क्षमता आहे.
भारतीय संघात क्रांतीला संधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर 2025 हे वर्ष क्रांतीसाठी आपल्या क्रिकेट कारकीर्दीला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे ठरले आहे. श्रीलंकेतील महिला तिरंगी मालिकेत जखमी काश्वी गौतमच्या जागी निवड झालेल्या गौडने 11 मे रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर 12 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात पदार्पण केले. साउथहॅम्प्टन येथे झालेल्या इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने वाईडची हॅटट्रिक घेतल्यानंतर एमी जोन्सला एका सुंदर इनस्विंगरने बाद केले. आणि त्यानंतर टॅमी ब्यूमोंटला पायचीत केले. आपल्या या कामगिरीने क्रांती क्रिकेटप्रेमींसह क्रिकेट समीक्षकांचीही दाद मिळवली आहे. इंग्लंड दौऱ्यामधील तिची कामगिरी ही स्वप्नवत वाटावी अशीच झाली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये क्रांतीने नऊ विकेट्स घेत भारतीय संघातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. सध्या भारतीय महिला संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करत आहे. आणि इंग्लंडच्या या दौऱ्यात एक नवी वेगवान गोलंदाज मिळाल्याने भारतीय संघाच्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.