भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार: भारत आणि ब्रिटनने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 112 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) म्हणजेच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारतीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्डस् यांनी गुरुवारी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या व्यापारी करारामुळं भारताकडून ब्रिटनला होणाऱ्या निर्यातीमधील 99% वस्तू ड्युटी-फ्री असणार आहे.
भारतीय वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दोन देशांतील द्विपक्षीय व्यापारी करारामुळं साधारण 50 अब्ज कोटी रुपयांचा व्यापार अपेक्षित आहे. आणि 2030 पर्यंत हा आकडा दुप्पट होण्याची आशा आहे.
या करारामुळं टेक्सटाईल, चामडे या भारतातील कामगार केंद्रीत उद्योगांतून निर्यात वाढेल आणि ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या ऑटोमोबाईल्स आणि व्हिस्की यांच्या किंमती कमी होतील.
या करारामुळं ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?
- सॉफ्ट ड्रिंक, सौंदर्य प्रसाधने, चॉकोलेट, बिस्किट, साल्मन मासा, बोकडाचं मटण
- काही विशिष्ट इलेक्ट्रिक वाहनांवरील इंपोर्ट ड्युटी 110 % वरून 10% करण्यात आली आहे.
- रोल्स रॉईस, जाग्वार लँड रोव्हर, बेन्टली आणि एस्टॉन मार्टिन यासारख्या प्रिमियम ब्रिटिश गाड्यांच्या किंमतींमध्ये घट
- ब्रिटनमधून आयात होणारी वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस सुटे भाग याकरता भारतीय ग्राहक व कारखान्यांना आयात शुल्क कमी द्यावं लागणार.
- ब्रिटिश व्हिस्कीवरील आयात शुल्क 150% हून 75% करण्यात येणार. पुढच्या दशकात हे आयात शुल्क 40% वर येईल.
- अल्कोहोलिक पेयांवरील आयात शुल्क कमी केल्यानं भारतीय बाजारपेठांमध्ये उच्च आंतरराष्ट्रीय ब्रांडचे मद्य कमी किंमतीत मिळणार
ब्रिटन दौऱ्याचं फलित
मोदींचे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या चेकर्स इथं ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी स्वागत केले होते. यावेळी मोदींसोबत परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.
“एक अतिशय महत्त्वाचा युके दौरा संपवत आहे. या भेटीचे परिणाम आपल्या भावी पिढ्यांना लाभदायक ठरतील आणि सामायिक विकास आणि समृद्धीला हातभार लावतील. पंतप्रधान केयर स्टारमर, युके सरकार आणि जनतेने दिलेल्या उबदारपणाबद्दल त्यांचे आभार,” असे मोदींनी सोशल मीडियावरील एका निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ब्रिटन दौऱ्यात पूर्व इंग्लंडमधील नॉरफोक येथील सँडरिंगहॅम इस्टेटमध्ये राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली. मोदी यांनी किंग चार्ल्स यांना पर्यावरणीय उपक्रम ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत शरद ऋतूमध्ये रॉयल इस्टेटमध्ये लावण्यासाठी रोप भेट दिले.
भारत आणि ब्रिटन पंतप्रधानांच्या संयुक्त निवेदनातील मुद्दे –
- नेत्यांनी आज स्वाक्षरी झालेल्या ऐतिहासिक यूके-भारत मुक्त व्यापार कराराचा आनंद साजरा केला आणि देशाच्या प्रत्येक भागात वाढ दिसून येईल.
- नेत्यांनी यूके-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वावरही चर्चा केली, ज्यामध्ये व्यापार, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये जवळचे सहकार्य दिसून येईल.
- दोन्ही देशांच्या नेत्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघातावरही चर्चा केली आणि मृतांच्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसोबत त्यांच्या सहानुभूती असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत बाधित झालेल्या सर्वांना युके पाठिंबा देत राहील.
पंतप्रधान मोदी यांनी स्टारमर यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) हे आमंत्रण स्वीकारले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ऐतिहासिक द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावर (फ्री ट्रेड एग्रीमेंट) स्वाक्षरी केल्यानंतर दोन दिवसांच्या ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्याचा समारोप केला. ब्रिटननंतर पंतप्रधान मोदी आपल्या परदेश दौऱ्याचा दुसरा टप्पा असणाऱ्या मालदीवला रवाना झाले. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून ते 25 ते 26 जुलै दरम्यान मालदीवचा दौरा करत आहेत.
मोदी यांचा मालदीवचा तिसरा दौरा असेल आणि राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही राष्ट्रप्रमुखाचा किंवा सरकारचा पहिलाच दौरा असेल. राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. मध्यंतरी भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये मालदीवच्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळं कटूता आली होती. त्यामुळे या दौऱ्यामुळं द्विपक्षीय संबंधांना पुन्हा दृढ होण्याची अपेक्षा आहे.