केंद्र सरकारनं संसदेत गुरुवारी एका निवेदनाद्वारे सांगितलं की, 260 प्रवासी बळी पडलेल्या अहमदाबाद एआय-171 अपघातानंतर, दिनांक 16 जूनला एअर इंडियाच्या 112 पायलटनी आजारी असल्याचं सांगत रजा घेतली.
नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं की, “एअरलाईनच्या सर्व फ्लाईटमध्ये आजारपणाच्या वैद्यकीय रजेचं प्रमाण वाढलं आहे.” पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादच्या भयंकर अपघातानंतर एकाच वेळी P1 दर्जाचे 51 कमांडर आणि P2 दर्जाचे 61 फर्स्ट ऑफिसर्स वैद्यकीय रजेवर होते. खासदार जय प्रकाश यांनी अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया वैमानिकांच्या ‘मास सिक लीव्ह’बद्दल सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना नागरी हवाई उड्डाणमंत्र्यांनी एयर इंडिया पायलटच्या ‘मास सिक लीव्ह’ला दुजोरा दिला.
दिनांक 12 जूनला अहमदाबाद-लंडन गॅटविक या बोईंग 787-8 या विमानाला अपघात झाला होता. हे विमान अहमदाबाद इथून उड्डाण केल्यावर अगदी काही क्षणातचं एका इमारतीवर कोसळलं होतं. यात विमानातील 241 प्रवासी आणि अपघातस्थळावरील 19 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात केवळ एकच प्रवासी बचावला होता. भारताच्या विमान अपघातांतील एक अतिशय दुर्दैवी अपघात म्हणून याची नोंद झाली आहे.
या अपघातानंतर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी 2023 सालचं परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश पुन्हा एकदा सर्व विमानकंपन्यांना दिले आहेत. या परिपत्रकानुसार प्रत्येक क्रू कर्मचाऱ्याला त्याच्या गरजांनुसार मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षण आणि समवयस्क समर्थन कार्यक्रम (Peer Support Program) राबवणे. तसेच फ्लाईट क्रूला तणाव, एनझायटी आणि ट्रॉमामधून सावरण्यासाठी गोपनीय पद्धतीनं कार्यक्रम आखून त्यानुसार त्यांना मदत उपलब्ध करून द्यावी.
एका लेखी उत्तरात नागरी हवाई उड्डाणमंत्री यांनी म्हटलं आहे की, विमान क्रॅश होऊन झालेल्या अपघातात जर जमिनीवर बळी पडलेल्या लोकांना भरपाई देण्याबद्दल सरकारचं काहीच धोरण नाही.
हेही वाचा – विमान प्रवास होणार जास्त सुलभ; बोर्डिंग पास आणि चेक-इन सेवा बंद होणार ?
दरम्यान, काही ब्रिटिश माध्यमांनी दावा केला आहे की, या अहमदाबाद विमान अपघातात बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांच्या डिएनएशी जुळले नाहीत. या कुटुंबांना इतर कोणत्यातरी मृतदेहाचे अवशेष देण्यात आले आहेत.