भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात पहिल्यांदाच फिडे महिला विश्वचषकात विजेता भारताचाच असणार आहे. कारण जॉर्जियामध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात फिडे महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भारतीय अंतिम फेरीत एकमेकांसमोर येत आहेत. अंतिम फेरी गाठल्यानंतर हम्पी आणि दिव्या या दोघीही पुढील वर्षी होणाऱ्या महिला उमेदवारांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. मोठे सामने खेळण्याच्या निव्वळ अनुभवामुळे हम्पी अंतिम फेरीत दिव्या देशमुखविरुद्ध फेव्हरिट म्हणून उतरेल.
कोनेरु हम्पीचा अनुभव ठरणार सरस ?
उपांत्य फेरीत हम्पीने टायब्रेकरमध्ये चीनच्या टिंगजी लेईवर मात करत विजय मिळवला, तर देशमुखने शेवटच्या चार टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या चीनच्याच झोंगी टॅनला पराभूत केले होते. 38 वर्षीय ग्रँडमास्टर हम्पी जागतिक महिला रॅपिड स्पर्धेची विजेती होती. आणि अलिकडच्या काळात महिला ग्रांप्रीमध्येही तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वय ही फक्त एक संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांत तिची जिद्द आणि दृढनिश्चय कमी झालेला नाही. बुद्धिबळ चाहत्यांसाठी हा सर्वात आनंदाचा क्षण आहे कारण आता जेतेपद निश्चितपणे भारताकडेच येणार आहे. पण अर्थातच एक खेळाडू म्हणून अंतिम सामनाही हम्पीसाठी खूप कठीण असेल. कारण दिव्याने या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे.
दिव्याची युवा प्रतिभा हम्पीच्या अनुभवापेक्षा ठरणार वरचढ ?
कोनेरु हम्पीच्या वयाच्या अर्ध्या वयाची असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने या स्पर्धेत टॉप टेनमध्ये असलेल्या तीन बुद्धिबळपटूंना आधीच धक्का दिला आहे. तिन सर्वप्रथम चीनच्या दुसऱ्या मानांकित जिनर झूला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिव्याने भारताच्याच हरिकाचं आव्हान मोडित काढत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. 19 वर्षीय नागपूरच्या दिव्याने उपांत्य फेरीत माजी महिला विश्वविजेत्या चीनच्या झोंगी टॅनला चेकमेट करत इतिहास रचला होता. या विजयानंतर “मला फक्त थोडी झोप आणि काही अन्न हवे आहे. हे दिवस माझ्यासाठी खूप कठीण आहेत,” असं अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर दिव्याने म्हटले होते.
हेही वाचा- 64 घरांचा राजा
दिव्या, भारतीय बुद्धिबळाची नवी राणी
2005 मध्ये नागपूरमध्ये डॉक्टर नम्रता आणि जितेंद्र देशमुख यांच्या पोटी जन्मलेल्या दिव्याने वयाच्या 5 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यापासून तिची प्रगती अभूतपूर्व आहे. तिने 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर बनण्यापूर्वी 10 वर्षांखालील आणि 12 वर्षांखालील जागतिक विजेतेपदे जिंकली. तिने 2022 मध्ये भारताचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. त्यानंतर आशियाई आणि 20 वर्षांखालील जागतिक विजेतेपदे जिंकली आणि 2020, 2024 आणि 2025 मध्ये भारताच्या सुवर्णपदक विजेत्या ऑलिंपियाड संघांची ती एक महत्त्वाची सदस्य होती. 2025 तिच्यासाठी एकदम विशेष ठरले आहे. तिने वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमांक 1 वर असणाऱ्या हौ यिफानला चकित केले आणि नंतर या वर्ल्ड कपमध्ये जगातील टॉप 10 महिलांपैकी तीन महिलांना पराभूत केले. ही किमया तिने साधली ती केवळ वयाच्या 19 व्या वर्षी. हे सर्व शक्य झालं आहे ते तिच्या दृष्टिकोनामुळे आणि दबावाखाली संयमाने खेळल्यामुळे. तिला बुद्धिबळाच्या दुनियेत सर्वात बहुमुखी आणि निर्भय नवीन चेहऱ्यांपैकी एक म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे. लिंगभेदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आणि व्यापक मुद्द्यांवर बोलण्याची दिव्याची तयारी तिला अनेकांसाठी आदर्श बनवते.
भारत : बुद्धिबळाच्या दुनियेतील नवे हब
फिडे महिला विश्वचषकाचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळासाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. अलिकडच्या काळात भारत एक शक्तिशाली बुद्धिबळ राष्ट्र म्हणून उदयास आला आहे.नियमितपणे ऑलिंपियाडमध्ये पदके जिंकत आहे. आणि आता दोन महिला जागतिक अंतिम स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकवत आहेत. जागतिक रॅपिड चॅम्पियन असलेली कोनरु हम्पी ही वैशाली रमेशबाबू आणि डी गुकेश यासारख्या युवा पिढीला प्रेरणा देत आहे. दिव्याची प्रगती भारतीय खेळाडूंना उपलब्ध असलेला वाढता पाठिंबा आणि स्पर्धात्मक संधी तसेच मार्गदर्शनाचा शक्तिशाली प्रभाव प्रतिबिंबित करत आहे. तिने जी एम आर बी रमेश यांच्या बुद्धिबळ गुरुकुलमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. आणि आनंदच्या अकादमीमध्ये सत्रांना हजेरी लावली आहे. भारताच्या बुद्धिबळ परिसंस्थेतील परिवर्तन हे जागतिक मानकांना आव्हान देणाऱ्या आणि भारतीय खेळाडूंसाठी काय शक्य आहे ते अधोरेखित करत आहे. कोनेरु हम्पी आणि दिव्या देशमुखमध्ये फिडे महिला बुद्धिबल विश्चषक कोण जिंकणार यासाठी लढत होते. आणि त्याचवेळी भारतीय बुद्धिबळ एका आनंदी आणि परिवर्तनकारी वळणावर उभे आहे. दोन्ही खेळाडू धैर्य, शिस्त आणि समावेशकतेच्या भावनेचे प्रतीक आहेत. तर त्यांचा प्रवास देशभरातील सर्व तरुणांना विशेषतः मुलींना आशा आणि प्रेरणा देतो. त्यांच्या यशाने हे पुन्हा सिद्ध होते की, राष्ट्रीय प्रगतीसाठी सतत प्रयत्न, संधीची उपलब्धता आणि सामूहिक अभिमान आवश्यक आहे.