भारताच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, भारत सरकारने एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. ‘डिजिटल इंडिया दशक-रील स्पर्धा’ (A Decade of Digital India – Reel Contest) या नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेत तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव देऊ शकता. आणि डिजिटल इंडियाने आपल्या दैनंदिन जीवनात काय क्रांती घडवली आहे, हे या व्हिडिओमधून मांडू शकता. या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही केवळ रोख बक्षिसे जिंकणार नाही, तर तुमचे काम सरकारी व्यासपीठांवर प्रदर्शित होण्याची अनोखी संधीही तुम्हाला मिळेल.
स्पर्धेचे स्वरूप आणि विषय
डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक व्यवहार आणि ई-गव्हर्नन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवले आहेत. या बदलांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन किती सोपे झाले आहे, हेच या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवायचे आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये खालीलपैकी कोणत्याही विषयावर व्हिडिओ करू शकता.
UPI पेमेंट: तुम्ही रोजच्या जीवनात UPI चा वापर कसा करता, त्याने तुमचे आयुष्य किती सोपे झाले आहे हे सांगा. किराणा दुकानातून खरेदी करण्यापासून ते मित्राला पैसे पाठवण्यापर्यंत, UPI ने आर्थिक व्यवहार कसे बदलले आहेत, याविषयी तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलू शकता.
ऑनलाइन शिक्षण : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचा अनेकांना फायदा झाला. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणामुळे कसा फायदा झाला, नवीन गोष्टी कशा शिकायला मिळाल्या, हे सांगा
सरकारी ॲप्स : DigiLocker, UMANG यांसारख्या सरकारी ॲप्सने तुमचे कोणते काम सोपे केले? कागदपत्रे कशी सुरक्षित ठेवतात येतात किंवा सरकारी सेवांपर्यंत पोहोचणे कसे सुलभ झाले, हे तुमच्या अनुभवातून सांगा.
आरोग्य आणि तंत्रज्ञान : आरोग्य सेवेत तंत्रज्ञानामुळे काय बदल झाले? डॉक्टरांचा सल्ला ऑनलाइन कसा मिळवला, डिजिटल आरोग्य नोंदींचा कसा फायदा झाला किंवा इतर काही आरोग्यविषयक तंत्रज्ञानाचे अनुभव तुम्ही मांडू शकता.
हे सर्व विषय असे आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपले आयुष्य सोपे केले आहे. याच अनुभवांना तुमच्या क्रिएटिव्ह रीलमधून समोर आणण्याचे आवाहन सरकार करत आहे.
कधीपासून सुरू होणार ही स्पर्धा
ही स्पर्धा 1 जुलै 2025 पासून सुरू झाली असून ती 1 ऑगस्ट 2025 पर्यंत रात्री 11:45 वाजेपर्यंत सुरू राहील. कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा, आकर्षक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ (रील) तयार करायचा आहे.
रील बनवताना कोणते नियम पाळायचे?
- व्हिडिओ पोर्ट्रेट म्हणजेच उभा असावा आणि त्याची क्वालिटी MP4 स्वरूपात असावी.
- व्हिडिओ 1 मिनिटाचा असावा त्यापेक्षा जास्त नसावा. वेळेचे बंधन पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- तुम्ही कोणत्याही भाषेत व्हिडिओ बनवू शकता. परंतु हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील व्हिडिओंना जास्त प्राधान्य दिले जाईल.
सहभाग कसा घ्याल?
- सर्वात आधी तुम्ही MyGov च्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://www.mygov.in/task/reel-competition-walk-monuments-or-sites-indian-independence/
- तिथे ‘डिजिटल इंडिया दशक – रील स्पर्धा’ हा पर्याय शोधा आणि ती स्पर्धा निवडा.
- तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटने लॉग इन करा.
- दिलेल्या नियमांनुसार तुमचं रील अपलोड करा आणि सबमिट करा.
- तुमचे रील सबमिट झाल्यावर तुम्हाला ईमेल किंवा मेसेजद्वारे कन्फर्मेशन मिळेल.
आकर्षक बक्षिसे आणि सन्मान
- या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत:
- सर्वात चांगल्या 10 रील्सना: प्रत्येकी 15 हजार मिळतील
- पुढील 25 रील्सना: प्रत्येकी 10 हजार मिळतील.
- पुढील 50 रील्सना: प्रत्येकी 5 हजार मिळतील.
एकूण 85 विजेते निवडले जातील आणि बक्षिसांची एकूण रक्कम 2 लाख रुपये आहे. एवढेच नाही, तर तुमचे रील आणि तुमचा चेहरा सरकारी अधिकृत प्लॅटफॉर्मवर उदा. MyGov, डिजिटल इंडियाचे सोशल मीडिया पेजेसवर दाखवला जाईल. भारतासाठी काहीतरी चांगले काम करण्याची आणि तुमची ओळख निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे.