संयम आणि पापक्षालनाच्या कावडयात्रेचं बदलतं रूप!

मनाला लोभ, माया, अहंकार, क्रोध यासारख्या षड्रीपुंवर विजय मिळवण्याचा मार्ग म्हणजे कावड यात्रा आहे. पापातून मुक्त होण्यासाठी ही कावडयात्रा करतात अशीही काही भाविकांची भावना आहे.
[gspeech type=button]

गेल्या काही वर्षांपासून आपण कावड यात्रा आणि त्या दरम्यान या यात्रेकरुंच्या झुंडींकडून होणारी हुल्लडबाजी किंवा मारहाणीच्या अनेक घटना सोशल मिडियावर पाहत आहोत. नुकताच एका रेल्वे स्टेशनवर बीएसएफच्या एका जवानाला 5-6 तरुण लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडियोही खूप व्हायरल झाला. या तरुणांना नंतर अटकही झाली. महाराष्ट्रातही काही ठिकाणी ही कावड यात्रा दिसू लागली आहे. पंढरपूरच्या वारीची शांतता आणि भक्तीपूर्ण परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात ही कावडयात्रा हुल्लडबाजी वाटत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की, ही कावड यात्रा काय प्रकार आहे आणि ही यात्रा करणारे एवढी दहशत का पसरवतात?

 

उत्तरेत 15 दिवस आधी श्रावण

विविधतेनं नटलेल्या भारतात प्रदेशागणिक विविध परंपरा आणि संस्कृती दिसून येतात. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्य केली जातात. श्रावण महिन्यातल्या व्रतवैकल्यांचे मूळ हे निसर्गपूजा आहे. निसर्गाची जपणूक करणे, वनस्पती आणि वृक्षांची जोपासना करणे हा उद्देश आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रांतात श्रावण महिना हा महाराष्ट्राहून पंधरा दिवस आधी सुरू होतो. संपूर्ण भारतातच श्रावण महिन्यात शिवाची आराधना केली जाते. महाराष्ट्रात सोमवारी दुग्धाभिषेक करतात तर उत्तरेत शिवाला पाणी वाहिलं जातं. आणि तेही जर गंगेचं पाणी असेल तर आणखीनच विशेष.

 

 

कावड यात्रेचे पौराणिक संदर्भ

कावड यात्रेशी संबंधित अनेक कथा आहेत. समुद्रमंथनाच्या दरम्यान हलाहल विष बाहेर आलं. हे हलाहल भगवान शंकरांनी गिळलं आणि त्यांच्या कंठात ते साचवलं. ही कथा तर आपल्या सर्वांना माहीत आहे. हे विष कंठात ठेवल्यानं शिवाला प्रचंड जळजळ होऊ लागली. या वेदनादायक विषाची जळजळ कमी होण्यासाठी भक्तांनी गंगा नदीतील पाणी भगवान शंकरावर ओतण्यास सुरुवात केली. एका कथेनुसार श्रीरामानं देवघरच्या वैद्यनाथ मंदिरात शंकराला गंगेचे पाणी अर्पण केले होते. तर आणखी एका कथेनुसार भगवान परशुरामानं प्रायश्चित्त घेताना शिवलिंगावर गंगेचे पाणी अर्पण केलं होतं.

 

कावड यात्रेत गंगेचं महत्त्व

कावड यात्रेत भाविक लोक नदीचे पाणी आपल्याकडील कावडीमध्ये भरतात. खांद्यावर या दोन कावडी घेऊन अनवाणी चालत, तोंडाने ‘बमबम भोले’चा जप करत शिव देवस्थानात येतात. आणि मग हे कावडीमधील पाणी शिवलिंगावर अर्पण करतात. काही ठिकाणी तर जवळपास शंभर किलोमीटर अंतर पायी चाललं जातं. हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला अतिशय महत्त्वाचं स्थान आणि पवित्र मानलं जात असल्यानं साहजिकच गंगा नदीचं पाणी कावडीमधून आणलं जातं. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी हे पाणी अर्पण केलं जातं. ज्योतिर्लिंगाशिवाय हरिद्वार, गौमुख, सुलतानगंज, देवघर इथल्या शिव देवस्थानांनाही कावड यात्रेत महत्त्वाचं स्थान आहे. सामुहिकरित्या साजरे करणं हा मनुष्यस्वभाव असल्यानं एकेकटे या यात्रेला जाण्याऐवजी समुहानेच ही यात्रा केली जाते.

 

पूर्वी कावड यात्रा स्थानिक पातळीवरच

प्राचीन काळी कावड यात्रा ही स्थानिक पातळीवर केली जायची. गंगेच्या आसपास राहणारे संन्यासी कावडीतून पाणी आणून शिवलिंगाला अर्पण करायचे. मध्ययुगीन काळात शैव धर्माचा विस्तार झाला आणि काही प्रमुख शिव देवस्थानांची निर्मिती झाली. त्यामुळं कालांतरानं या कावडयात्रेचं क्षेत्रही विस्तारू लागलं. सध्या उत्तर भारताच्या बाहेरही ही कावड यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. उत्तरेतल्या प्रमुख धार्मिक उत्सवात ही कावड यात्रा गणली जाते. महाराष्ट्रात जशी पंढरपूर वारी सांस्कृतिक मानबिंदू आहे. काहीसा तसाच मान या कावड यात्रेला उत्तरेत आहे. पण या दोन्हींची शिस्त यात जमीन आस्मानाचा फरक पाहायला मिळतो.

पापक्षालनाच्या यात्रेचा प्रवास उन्माताकडे

श्रावण महिन्यात बहुतांश हिंदू धर्मिय मांसाहार सेवन करत नाहीत. या यात्रेत अनवाणी चालावं लागतं. पूर्वीच्या काळी आतासारखे रस्त्यांच्या सुविधाही नव्हत्या. खडतर मार्गावरून या जड कावडी घेत सांभाळून चालणे हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लावणारं होतं. या दरम्यान सात्विक जेवणचं सेवन करायचं असतं. मनाला लोभ, माया, अहंकार, क्रोध यासारख्या षड्रीपुंवर विजय मिळवण्याचा मार्ग म्हणजे कावड यात्रा आहे. पापातून मुक्त होण्यासाठी ही कावडयात्रा करतात अशीही काही भाविकांची भावना आहे. मात्र उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली इथल्या या कावड यात्रांचं स्वरुप धार्मिक न राहता हुल्लडबाजी आणि दहशत पसरवण्याचं झालं आहे. बेरोजगार तरुणांचे गट या यात्रेत सामील होत आहेत. केशरी रंगाचे कपडे परिधान करून कावडयात्रेचा मार्ग चालतात. यातील काही गटांना आपल्या वाटेत कोणी आलं तर त्यांना खपत नाही. संयमाच्या कसोटीच्या या यात्रेचा रुपांतर अहंकार व क्रोधात होतं.  रस्ते यांच्यासाठी फक्त राखीव ठेवावेत अशी अपेक्षा ते करतात. वाटेत येणाऱ्या लोकांवर दमदाटी प्रसंगी हिंसाचारही हे गट करतात. पोलीस आता अशा यात्रेच्या नावाखाली दमदाटी आणि हिंसाचार करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. पण सहिष्णु धर्म अशी ओळख असणाऱ्या हिंदू धर्म आणि एका चांगल्या यात्रेला गालबोट लावण्याचं काम ही मंडळी करत आहेत.

हेही वाचा – निवडणुकांची वर्दी घेऊन आलेला ‘मोफत चिकन’चा आखाड!

 

कावड यात्रांचे प्रसिद्ध मार्ग

वाराणसी ते काशी विश्वनाथ मंदिर

बिहारमधील सुलतानगंज ते झारखंडमधील वैद्यनाथ धाम

हरिद्वार, गोमुख, गंगोत्री ते ऋषीकेश

हरिद्वार ते दिल्ली, मेरठ, मुझफ्फरनगर

हरिद्वार ते उत्तरप्रदेश व हरियाणातील स्थानिक मंदिरे

 

आधुनिक कावड यात्रा

वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कावड यात्रेच्या मार्गावरून चालत असतात. जागोजागी यात्रेकरुंसाठी अन्नछत्र असतात. गटागटाने जाणारे यात्रेकरू सामुदायिक स्वयंपाकघरातही रांधतात. रात्री तंबू उभारून तिथंच रात्रीचा मुक्काम केला जातो. यात्रेच्या मार्गावर अनेक तात्पुरती दुकानं उभारली जातात. मोफत आरोग्य तपासणीही होत असतात. काही भाविक प्रत्यक्ष कावड घेत नसले तरी या काळात तीर्थ यात्रेकरता या प्रसिद्ध मंदिरांना भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून लोकांची वाढती संख्येचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पोलीस, आपत्कालीन व्यवस्था, वाहतूक सुविधा, स्वच्छता याकडे लक्ष दिलं जात आहे. लाखोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर चालत असल्यानं वाहतूक वळवली जाते.

 

कावड यात्रेच्या मूळ तत्वाचं खरोखर पालन केलं तर, या यात्रेची चांगली बीजं नव्या पिढीत रुजतील. अन्यथा पापक्षालनाची ही यात्रा उन्मत्तेतेच्या प्रवासाची होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संक्रातींचं वाण, मार्गशीर्ष गुरुवार फळवाटपानंतर आता आखाडालाही राजकीय नेत्यांनी आपल्या कब्ज्यात घेतलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आखाडानिमित्त मोफत चिकन वाटप’
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात मोबाइलवर चक्क ‘जंगली रमी’ खेळतानाचा
शिक्षकांनी त्यांच्या वागण्यानं विद्यार्थ्यांना गोडी लावायची की विद्यार्थांना शाळेपासून दूर करायचं, असा प्रश्न शहाडमधील शाळेतील शिक्षिकांमुळे निर्माण झाला आहे. 8

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ