दिवसभर खुर्चीवर बसून किंवा कामाच्या धावपळीमुळे कंबर दुखणे, सकाळी उठताना पाठीत कळ येणं, हा त्रास आपल्यापैकी बहुतेक लोकांना होतो. या दुखण्यामुळे रोजचं काम करणंही अवघड होतं. अनेकदा या कंबरेच्या दुखण्यावर उपाय म्हणून मसाज किंवा फिजिओथेरपीचा सल्ला दिला जातो. पण रोजच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसच्या कामातून वेळ काढून मसाजसाठी जाणं किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स घेणं जमत नाही.
पण, आता काळजी करू नका, तुमच्या घरातला एक साधा टेनीस बॉल तुम्हाला या दुखण्यातून आराम देऊ शकतो. होय, छोटासा टेनीस बॉल तुमच्या कंबरेच्या दुखण्यावर एक सोपा, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे. जो तुम्हाला नक्कीच आराम देऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया कसं ते.
हा छोटासा टेनीस बॉल कंबरेचं दुखणं कसं बरं करेल?
तर, यामागे एक साधं पण वैज्ञानिक कारण आहे. अनेक अभ्यास आणि रिसर्च असं सांगतात की, आपण टेनीस बॉलचा वापर करतो, तेव्हा तो आपल्या स्नायूंमधील मऊ पेशींवर (soft tissues) हळूवार दाब देतो. अनेकदा आपल्या शरीरातील स्नायू आखडून जातात. त्यात गाठी तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला दुखायला लागतं. अशावेळी टेनीस बॉलचा वापर करून त्याच्या दाबामुळे हा ताण सुटतो आणि स्नायू मोकळे होतात.
यामुळे स्नायूंमधील ताण कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात नैसर्गिकरित्या वेदना कमी करणारे घटक तयार होतात, त्यांना ‘एंडोर्फिन’ म्हणतात. टेनीस बॉलच्या दाबामुळे हे एंडोर्फिन बाहेर पडतात आणि आपल्याला वेदनेपासून आराम मिळतो.
मसाज पायांपासून सुरु करा
तुम्ही विचार करत असाल की कंबर दुखतेय तर पायांचा काय संबंध? तर, आपल्या शरीरातले सगळे स्नायू हे एकमेकांशी जोडलेले असतात. बऱ्याचदा असं होतं की, कंबरेचं दुखणं हे पायांमधील स्नायूंच्या ताणामुळेही येतं. मांड्यांच्या मागील बाजूचे स्नायू ज्यांना ‘हॅमस्ट्रिंग्ज’ म्हणतात किंवा पोटऱ्यांचे स्नायू आखडले असतील, तर त्याचा परिणाम कंबरेवर होतो आणि दुखणं वाढतं.
म्हणूनच, टेनीस बॉलचा वापर तुम्ही पायांच्या तळव्यापासून सुरू करू शकता. एका वेळी एक टेनीस बॉल पायाच्या तळव्याखाली ठेवा आणि हळूवारपणे त्यावर पुढे-मागे करत पाय फिरवा. यामुळे तुमच्या पायाचे स्नायू आणि टेंडन्स मोकळे होतात. यामुळे पायांमधील ताण कमी झाल्याने कंबरेवरील दाब कमी होतो आणि दुखण्यापासून आराम मिळतो.
हेही वाचा:डिप्रेशनवर डान्स आहे सर्वात भारी उपाय!
पाठीच्या मणक्यासाठी देखील उपयोगी
आपला पाठीचा मणका हा आपल्याला शरीराचा तोल सांभाळायला आणि हालचाल करायला मदत करतो. या मणक्याच्या आजूबाजूला अनेक लहान-मोठे स्नायू असतात, जे आपल्या प्रत्येक हालचालीत महत्त्वाचे असतात.
जेव्हा आपण टेनीस बॉलवर झोपून हळूवारपणे शरीर हलवतो, तेव्हा या स्नायूंना मसाज मिळतो. यामुळे मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू मोकळे होतात, त्यांच्यातील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारतं. आणि मणक्यावर येणारा अनावश्यक दाब कमी होऊन पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
कसा वापराल टेनीस बॉल?
यासाठी, दोन टेनीस बॉल एकत्र टेपने चिकटवून घ्या. आता ते जमिनीवर ठेवा आणि त्याच्यावर पाठीचा मधला भाग येईल अशा पद्धतीने आरामात झोपा. तुमचे हात हळू हळू वर उचला आणि पुन्हा खाली आणा. त्याचबरोबर, तुमच्या शरीराचं वजन सावकाश डावीकडे आणि उजवीकडे हलवा. यामुळे टेनीस बॉल तुमच्या पाठीच्या दुखत असलेल्या भागांना मसाज देतील. यामुळे त्या भागातील स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.
कंबरेच्या खालच्या भागात दुखत असेल, तर तुम्ही एक टेनीस बॉल घ्या आणि तुमच्या पाठीच्या मणक्याशेजारील स्नायूंच्या खाली ठेवा. आणि जिथे दुखत आहे, त्या भागावर बॉलचा दाब येईल अशा पद्धतीने झोपून हलके शरीर हलवा.
ऑफिसमध्ये किंवा घरी असताना खुर्चीत बसून तो बॉल तुमच्या पाठीमागे दुखत असलेल्या जागी, खुर्ची आणि पाठीच्या मध्ये ठेवा. आता खुर्चीला टेकून हलका दाब द्या आणि हळूवारपणे इकडे-तिकडे सरका. यामुळे बसल्या बसल्याही दुखण्यापासून आराम मिळेल.
हा एक सोपा, कमी खर्चातला आणि घरच्या घरी करता येणारा उपाय आहे. जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल, तर टेनीस बॉलचा वापर करून पाहायला काहीच हरकत नाही.
 
				 
											 
								 
								 
								


