आपल्या पृथ्वीवर कितीतरी प्राणी असे आहेत जे आता दिसत नाहीत. खूप वर्षांपासून अस्तित्वात असलेले कितीतरी प्राणी काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. काही मानवी चुकांमुळे, तर काही नैसर्गिक बदलांमुळे नाहीसे झाले. पण कधी कधी, अचानक एखादा प्राणी, ज्याला आपण कायमचं हरवलंय असं समजतो, तो पुन्हा दिसतो. असं काही घडलं तर आपल्यासाठी आशेचा किरणच आहे.
ज्या प्राण्यांच्या प्रजाती आपण गमावून बसलो आहोत असं समजतो, कदाचित ते प्राणी अजूनही जगाच्या कुठल्यातरी दूरच्या किंवा आपल्याला माहिती नसलेल्या कोपऱ्यात लपलेले असू शकतात. आणि अशीच एक कमाल गोष्ट नुकतीच घडली आहे.असाच एक प्राणी जो सुमारे 30 वर्षांपासून जगातून नाहीसा झालाय असं वाटलं होतं, तो पुन्हा एकदा दिसला आहे.
30 वर्षांनी कॅमेरात कैद झाला ‘सिल्व्हर-बॅक्ड शेवरोटेन’
जवळपास 30 वर्षांपासून जगातून नाहीसा झालाय असं वाटणारा एक दुर्मिळ आणि आकर्षक प्राणी व्हिएतनामच्या घनदाट जंगलात कॅमेरात कैद झाला आहे. या प्राण्याचं नाव आहे सिल्व्हर-बॅक्ड शेवरोटेन, त्याला लोक ‘टू-टोन माऊस डीअर’ असंही म्हणतात. कारण तो सशासारखा छोटा आणि दिसायला हरणासारखा असतो. जंगलात लावलेल्या खास कॅमेरा ट्रॅपमध्ये याचा फोटो पहिल्यांदाच टिपण्यात आला.
ग्लोबल वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन (GWC) चे वैज्ञानिक आणि या मोहिमेचे प्रमुख, अॅन गुयेन (An Nguyen) यांनी या शोधाबद्दल आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘या कॅमेरामध्ये असं काही दिसेल अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. पण, जेव्हा आम्ही कॅमेरा ट्रॅप तपासले आणि सिल्व्हर बाजू असलेल्या शेवरोटेन प्राण्याचे फोटो पाहिले तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले आणि आनंद देखील झाला.’
ते पुढे म्हणाले, ‘तो खरंच अजूनही जिवंत आहे, हे शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्याला पुन्हा गमावू नये आणि सर्वोत्तम पद्धतीने त्यांना कसं वाचवता येईल याचा शोध घेण्यासाठी आम्ही वेगाने काम करत आहोत.’
हेही वाचा : साडेबारा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला लांडगा पुन्हा जिवंत!
‘माऊस डीअर’ दिसतो कसा?
सिल्व्हर-बॅक्ड शेवरोटेन प्राणी दिसायला खूपच खास आहे. हा एक छोटासा, खूर असणारा सस्तन प्राणी आहे. तो साधारणपणे सशाच्या आकाराचा असतो. त्याचं डोकं आणि पुढचे पाय लालसर-तपकिरी रंगाचे असतात. शरीर आणि मागचे पाय चांदीसारख्या राखाडी रंगाचे असतात. आणि त्याचा पाठीमागचा भाग पांढरा-राखाडी रंगाचा असतो.
हा प्राणी दिसायला खूप लहान आणि नाजूक असतो त्यामुळं त्याला बिबट्या आणि शिकारीकुत्र्यांसारख्या शिकारी प्राण्यांकडून धोका असतो. पण, त्यापेक्षाही सर्वात जास्त धोका असतो तो शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यांचा. ज्याला आपण फांदे म्हणतो. हे फांदे खूप धोकादायक असतात आणि त्यामध्ये अनेक निष्पाप प्राणी अडकतात.
माऊस डीअर’ला शोधण्यासाठी घेतलेली मेहनत
या हरवलेल्या प्राण्याला शोधण्यासाठी, अॅन गुयेन आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली. त्यांनी आधी गावातील लोकांशी आणि जंगलात काम करणाऱ्या वनरक्षकांशी बोलून माहिती गोळा केली. या लोकांनी सांगितले होतं की त्यांनी असा प्राणी पाहिला आहे. याच माहितीच्या आधारे, टीमने दक्षिण व्हिएतनाममधील एका सखल जंगलात कॅमेरा ट्रॅप लावले.
जवळपास पाच महिने हे कॅमेरे तिथे होते. आणि या काळात त्यांनी 275 फोटो क्लिक केले, त्यामध्ये 72 वेळेस वेगवेगळ्या वेळी हा प्राणी दिसल्याचं कळलं. या यशामुळे उत्साहात येऊन, आणखी 29 कॅमेरे जंगलामध्ये लावले. यातून त्यांना जवळजवळ 1,900 नवीन फोटो मिळाले.आणि पुन्हा 208 वेळा हा प्राणी दिसला.
हे सगळे फोटो पाहून सिल्व्हर-बॅक्ड शेवरोटेन प्राण्यांची संख्या किती आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. पण या शोधाचे निष्कर्ष ‘नेचर इकोलॉजी ॲन्ड इव्होल्यूशन’ नावाच्या एका महत्त्वाच्या मासिकात छापण्यात आले आहेत.या मागचा मुख्य उद्देश हा आहे की, जंगलात शिकारींनी लावलेले सापळे कमी व्हावेत.
कारण या सापळ्यांमुळे फक्त या ‘माऊस डीअर’लाच नाही, तर या मोठ्या जंगल परिसरात ‘ग्रेटर अनामईट्स इकोरिजन’ नावाच्या अनेक इतर दुर्मिळ प्रजातींनाही धोका आहे. म्हणून जर हे सापळे लावणं बंद केलं, तर इतर अनेक प्राणी आणि पक्षी देखील वाचतील. या जंगलामध्ये असे अनेक प्राणी पक्षी आहेत जे फक्त याच भागात आढळतात आणि आता ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.