आपण बाजारात गेल्यावर खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. बिस्किटे, वेफर्स, पॅकबंद मसाले, चॉकलेट्स अशा अनेक पॅकबंद वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, की या सगळ्या वस्तूंवर काहीतरी खुणा असतात, रंगीत ठिपके असतात. यातील लाल आणि हिरव्या रंगाचे ठिपके का असतात? त्यांचा अर्थ काय हे बहुतेक लोकांना माहीत असेल. हिरवा म्हणजे शाकाहारी आणि लाल म्हणजे मांसाहारी. पण तुम्हाला माहीत आहे का, की या दोन रंगांशिवाय अजूनही काही रंगांचे ठिपके खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवर असतात?
हे छोटे छोटे रंगीत ठिपके आपल्याला त्या खाण्याच्या वस्तूविषयी खूप महत्त्वाची माहिती देतात. ही माहिती आपल्या आरोग्यासाठी आणि आपण काय खायला पाहिजे काय नाही, हे निवडण्यासाठी खूप गरजेची असते. पण अनेकदा आपण या रंगांकडे दुर्लक्ष करतो आणि कोणतीही वस्तू घेऊन येतो. आज आपण याच रंगांमागे लपलेला अर्थ समजून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाल, तेव्हा विचारपूर्वक आणि योग्य वस्तू निवडू शकाल. चला तर मग जाणून घेऊया या रंगांचे अर्थ काय आहेत.
1.लाल ठिपका
जर एखाद्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लाल रंगाचा गोल ठिपका असेल, तर याचा अर्थ आहे की त्या पदार्थांमध्ये चिकन, मटण, अंडी, मासे किंवा इतर कोणत्याही मांसाहारी वस्तूचा वापर केलेला असू शकतो. जे लोक शाकाहारी आहेत, त्यांनी खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. नाहीतर, नकळतपणे तुम्ही मांसाहारी पदार्थ खाऊ शकता.
2. हिरवा ठिपका
याउलट, जर पॅकेटवर हिरवा ठिपका असेल, तर ते खाद्यपदार्थ पूर्णपणे शाकाहारी असतात. यात कोणत्याही प्रकारचं मांस किंवा अंडं वापरलेलं नसतं. जे लोक शाकाहारी आहेत, धार्मिक आहेत किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मांसाहारी पदार्थ खाणं पसंत करत नाहीत, त्यांच्यासाठी हा हिरवा ठिपका खूप महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांना पॅकबंद खाद्यपदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी हे लगेच समजतं.
3. निळा ठिपका
जर तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर निळा ठिपका दिसला, तर समजून जा की ते पदार्थ औषध संबंधित आहेत. हे पदार्थ सहसा विशिष्ट आजारासाठी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाल्ले जातात. उदाहरणार्थ, काही खास प्रोटीन पावडर किंवा आजारासाठी बनवलेली बिस्किटे, लहान मुलांचे विशिष्ट फूड यांवर असा निळा ठिपका असू शकतो. हे पदार्थ रोजचे खाण्याचे पदार्थ नसतात, तर ते गरजेनुसार वापरले जातात.
4. पिवळा ठिपका
अनेक लोकांना अंडी खाणं आवडत नाही किंवा काही जण धार्मिक कारणांमुळे अंडी खाणं टाळतात. अशा लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, जर खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर पिवळा ठिपका असेल, तर याचा अर्थ त्यामध्ये अंडं वापरलेलं आहे. केक, बिस्किटं, पेस्ट्री किंवा काही बेकरी उत्पादनांवर हा ठिपका आपल्याला हमखास दिसतो.
5. काळा ठिपका
काहीवेळा, खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर इतर ठिपक्यांप्रमाणे काळा ठिपका आपल्याला दिसतो. हा ठिपका सांगतो की, त्या खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक पदार्थांचं प्रमाण जास्त आहे. हे विशेषतः प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये (processed foods) किंवा जास्त काळ टिकणाऱ्या वस्तूंमध्ये आढळतं. अशा वस्तूंमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज किंवा इतर रासायनिक घटक जास्त प्रमाणात वापरलेले असू शकतात.
या पदार्थांचा खाण्यामध्ये जास्त वापर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. त्यामुळे, काळा ठिपका दिसल्यास, त्या वस्तूचा वापर जपून करावा किंवा शक्य असल्यास टाळावा. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
हेही वाचा: बांधकाम साईटवरच्या हेलमेटच्या रंगांचा अर्थ
तुमच्या आरोग्याशी या रंगांचा काय संबंध
हे ठिपके आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयीनुसार, जसं की शाकाहारी, मांसाहारी, अंडी खाणारे किंवा न खाणारे, यासाठी योग्य खाद्यपदार्थ निवडायला मदत करतात. अनेक लोक धार्मिक कारणांमुळे किंवा वैयक्तिक निवडीमुळे काही पदार्थ खाणं टाळतात. त्यांच्यासाठी हे ठिपके योग्य खाद्यपदार्थ निवडण्यास मदत करतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा पॅकेटवरील आकर्षक फोटो किंवा फक्त किंमत पाहून वस्तू घेतो. पण हे छोटे छोटे रंगीत ठिपके आपल्याला त्या वस्तूमध्ये काय आहे, त्यात कोणते घटक आहेत, याची महत्त्वाची माहिती देतात.