शरीराचा सगळ्यात जास्त दुर्लक्षित भाग असेल तर तो म्हणजे आपलं तोंड. बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी ज्याचा पुरेपुर वापर केला जातो. त्या अवयवाच्या आरोग्याची मात्र, पुरेशी काळजी घेतली जात नाही. सतत होणारा हिरड्यांचा त्रास, दात दुखणे, कीड लागणे अशा काही मौखिक समस्यांमुळे पचनसंस्था किंवा स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता आहे.
सततचा ताण आणि अनियमित देखरेख
जागतिक पातळीवर जवळपास 3.5 अब्ज लोक तोंडाच्या आजारांनी ग्रस्त आहेत. गेल्या काही दशकांमध्ये अनेक देशांमध्ये तोंडाच्या आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. मात्र, भारतात याचा अभाव आढळतो. तोंडाचे विकार हे देशातील अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. दात दुखणे, कीड लागणे, तुटणे असे आजा सर्वच वयोगटातील लोकांना होतात.
भारताचा शेवटचा राष्ट्रीय मौखिक आरोग्य सर्वेक्षण 2007 – 2008 मध्ये केलं होतं. तेव्हापासून, कोणताही अद्ययावत, देशव्यापी डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे नियोजन आणि धोरणात अनेक त्रुटी आणि तफावत आहे. राष्ट्रीय मौखिक आरोग्य धोरण (2021) च्या मसुद्यात 2025 पर्यंत बेसलाइन डेटाची आवश्यकता दर्शविली आहे. आणि 2030 पर्यंत तोंडाच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदरात आणि विकृतीत 15 टक्के घट होणं अपेक्षित आहे. मात्र. या उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, उपक्रम राबवले नाहीत. त्यामुळे ही सगळी उद्दिष्ट फक्त कागदोपत्रिच राहिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने तोंडी आरोग्याला असंसर्गजन्य रोग (एनसीडी) प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे दंत आरोग्य आणि सामान्य आरोग्य सेवेमध्ये समानता ठेवण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे.
हे ही वाचा : मानवी जबड्यातील दातांची संख्या होतेय कमी !
कर्करोगाचा धोका
द लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या “ओरल हेल्थ अँड इट्स एक्सपांडिंग रोल इन सिस्टेमिक डिसीज, कॅन्सर आउटकम्स अँड पब्लिक हेल्थ” या शीर्षकाच्या अलीकडील अभ्यासात तोंडी स्वच्छता कर्करोगात बदल करण्यायोग्य धोकादायक घटक म्हणून कसं काम करू शकते हे स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील एम्समधल्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अभिषेक शंकर आणि वैभव सैनी यांनी हा संशोधन पेपर सादर केला आहे. इंटरनॅशनल हेड अँड नेक कॅन्सर एपिडेमियोलॉजी (INHANCE) कन्सोर्टियमच्या डेटावर आधारित, संशोधकांनी अहवाल दिला आहे की, तोंडाची योग्य पद्धतीने स्वच्छता केली तर डोकं आणि मानेच्या संबंधित असलेल्या कर्करोगाच्या जोखमीत काही प्रमाणात घट होऊ शकते.
हिरड्यांचा आजार आणि रूट कॅनल संसर्गामुळे पचन (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) किंवा स्वादुपिंड कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे कर्करोगापासून बचाव करताना, आहार आणि व्यायाम करण्यावर भर देताना तोंडाची देखील योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान केलं जात आहे.
कर्करोगाच्या जीवशास्त्रात तोंडी रोगजनकांचा ( बुरशी, विषाणू) यांचाही समावेश आहे. सामान्यतः दीर्घकालीन हिरड्यांच्या आजारात आढळणारे पोर्फायरोमोनास गिंगिव्हालिस आणि प्रीव्होटेला इंटरमीडिया, ट्यूमरच्या वाढवण्याला मदत करतात. “पी. गिंगिव्हालिसमुळे रोगप्रतिकारक शक्ती होते, दातांच्या ऊतींवर आक्रमण करतात आणि कर्करोगाच्या प्रसाराला प्रोत्साहन देतात. डॉ. शंकर आणि डॉ. सैनी सांगतात की, दुसरीकडे, पी. इंटरमीडिया हा आजार ट्यूमरच्या वाढीसाठी वातावरण किंचित बदलण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि डाउन ट्यूमर सप्रेसर्स नियंत्रित करते.
एमजीएम कॅन्सर इन्स्टिट्यूट, चेन्नई येथील क्लिनिकल लीड सय्यद इस्माईल नवाब जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसाप, शरीरातील रोगप्रतिकारक प्रतिक्रियांमध्ये बदल करून फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम सारख्या जीवाणूंचा कोलोरेक्टल कर्करोगाशी संबंध असल्याचे दिसून आलं आहे. “ब्युटायरेटसारखे बॅक्टेरियाचे उप-उत्पादन डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात आणि पेशींच्या दुरुस्तीत व्यत्यय आणू शकतात. 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, गंभीर हिरड्यांचा रोग असलेल्या व्यक्तींना स्वादुपिंड आणि कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका 20 ते 50 टक्के जास्त असल्याचं सांगितलं होतं.
बेंगळुरू इथल्या नारायणा हेल्थ सिटीचे वरिष्ठ सल्लागार आणि डोके आणि मानेच्या सर्जिकल ऑन्कोलॉजीचे प्रमुख विजय पिल्लई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौखिक म्हणजे तोंडातील पोकळीमध्ये काही सूक्ष्मजीव हे नैसर्गिकरित्या वाढत असतात. यामध्ये जर असंतुलन निर्माण झालं किंवा त्यात काही अडथळा आला विशेषत: फ्युसोबॅक्टेरियम आणि बॅक्टेरॉइड्स हे सूक्ष्मजीव वाढू लागले तर ते कर्करोगाच्या वाढीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे जर दात दुखत असतील वा तत्सम काही आजार असतील तर त्यावर लवकर उपचार घेणं गरजेचं असते.
कर्करोगाच्या उपचारांवर परिणाम
कर्करोगाच्या उपचाराचा तोंडाच्या आरोग्याचा देखील परिणाम होतो. डोके आणि मानेच्या कर्करोगासाठी रेडिओथेरपी तोंडाच्या सूक्ष्मजीवांमध्ये अडथळा आणते. बहुतेकदा संरक्षणात्मक जीवाणूंना दाबते आणि हानिकारक स्ट्रेन वाढू देते. त्यामुळे जे रुग्ण कर्करोगासाठी रेडिओथेरपी घेतात अशा रुग्णांना हिरड्यांचा आजार असेल तर त्यात गुंता निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्या रुग्णांना कर्करोग आहे अशा रुग्णांनी नैसर्गिक दात टिकवून ठेवणे आणि वारंवार दाताच्या डॉक्टरांकडून सल्लामसलत करणं गरजेचं आहे.
पाश्चात्य देशांमध्ये नियमित स्वरुपात मौखिक आरोग्या संबंधित माहिती संकलित केली जाते. मात्र, भारत आणि आग्नेय आशियातील बहुतांशी देशांमध्ये मौखिक आरोग्यावर जास्त लक्ष दिलं जात नाही.
हे ही वाचा : दात पुन्हा येण्यासाठी नवीन औषधाचा शोध!
प्रतिबंधात्मक उपचार
टूथब्रशिंग कार्यक्रम, फ्लोराईड शिक्षण आणि एमएमपी-8 चाचणी सारख्या कमी किमतीच्या पॉइंट-ऑफ-केअर डायग्नोस्टिक्ससारख्या सारख्या उपक्रमांमुळे तोंडातली जळजळ कमी होऊ शकते आणि कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल पीरियडोंटोलॉजीमधील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, हिरड्यांच्या आजारावरील उपचारांमुळे सीआरपी आणि आयएल-6 चं प्रमाण कमी झालं आहे. सीआरपी आणि आयएल-6 ची वाढ ही कर्करोग वाढीला मदत करते.
दरम्यान, राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण योजना, शालेय आरोग्य कार्यक्रम आणि तंबाखू सेवन बंद करण्याच्या उपक्रमात मौखिक आरोग्याचा समावेश करण्याचा आग्रह तज्ज्ञ करत आहेत. मौखिक आरोग्यात लहानपणी होणारा धोका कमी करण्यासाठी जंक फूडवर त्यातील घटकांची माहिती देणारे पोषण लेबल्स देणं अनिर्वाय करणं, जंक फूड जाहिरातींमध्ये कार्टून पात्रांवर बंदी घालणं यासारखे धोरणात्मक बदल दंत चिकित्सकांकडून सुचवले गेले आहेत.