बुधवार दिनांक 30 जुलै रोजी पहाटे रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपा झाला. या भूकंपानंतर अमेरिकेतील हवाई राज्य, रशियातील कुरिल बेटे आणि जपानमधील होक्काइडो बेटावर त्सुनामी आली. जपान आणि अमेरिकेसह प्रशांत महासागरातील अनेक देशांना त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
रशियामध्ये आलेला 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप हा गेल्या दशकभरातला सगळ्यात मोठा भूकंप आहे. भूकंपानंतर कामचटकामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत मृतांची माहिती समोर आलेली नाहीये.
रशियातील भूकंपानंतर कोणत्या भागात त्सुनामीचा तडाखा बसला आहे?
अमेरिकेतील हवाई, रशियातील कुरिल बेटे आणि जपानमधील उत्तरेकडील होक्काइडो बेटावर त्सुनामी आली आहे.
बीबीसीच्या बातमीनुसार, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने हवाईच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ओआहू बेटावरील हेलेवा येथे चार फूट (1.21 मीटर) उंचीची सर्वात उंच लाट आल्याची नोंद केली. ही त्सुनामी जास्त काळ राहू शकते त्यामुळे नागरिकांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाटी तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांच्या मते, जपान आणि हवाई दरम्यानच्या मिडवे अॅटोल बेटावरून सहा फूट उंच लाट गेली. या त्सुनामीमुळे माउईला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
कुरिल बेटांवरील सेवेरो-कुरिलस्क या रशियन पॅसिफिक शहरातील बंदरात त्सुनामी लाट आल्यानंतर पाणी साचले. रशियाच्या पूर्वेकडील सखालिन प्रदेशाने उत्तर कुरिल बेटांवर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. तिथे त्सुनामी लाटांमुळे इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर उंच लाटा आल्या. होक्काइडो बेटावरील हमानाका शहर आणि मुख्य बेटावरील इवाते इथल्या कुजी बंदरात XZ सेंटीमीटर (दोन फूट) उंचीची त्सुनामी आली. टोकियो खाडीत 20 सेमी (7.9 इंच) उंचीची लाट आल्याचे असोसिएटेड प्रेस (एपी) ने जपान हवामान संस्थेच्या हवाल्याने बातमी दिली आहे.
रशियामध्ये आलेल्या या भूकंपामुळे एका दिवसापेक्षा जास्त काळ मोठ्या त्सुनामी येऊ शकतात, अशी माहिती पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने दिली आहे. “अजुनही त्सुनामीच्या लाटा येत आहेत. या त्सुनाम्यांमुळे खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्सुनामी अचानक येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी कृपया इशारा मागे घेईपर्यंत सुरक्षित ठिकाणे सोडू नका,” असं त्यात म्हटलं आहे.
पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा
अलास्का ते न्यूझीलंडपर्यंत पसरलेल्या पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा दिला आहे.
पश्चिम कॅनडातील व्हँकुव्हर बेटाच्या काही भागात 30 सेंटीमीटरपेक्षा कमी (एक फूटाखाली) त्सुनामी येण्याची शक्यता आहे. ब्रिटिश कोलंबिया किनाऱ्यावर ही त्सुनामी लाटा येऊ शकतात असा इशारा ब्रिटिश कोलंबिया प्रांतीय आपत्कालीन तयारी संस्थेने दिला आहे.
एपी वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, फिजी, सामोआ, टोंगा, मायक्रोनेशियाचे संघराज्य आणि सोलोमन बेटांमधील अधिकाऱ्यांनी लोकांना धोका कमी होईपर्यंत किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे .
अमेरिकेतील क्रेसेंट सिटीच्या उत्तर कॅलिफोर्निया समुदायात सायरन वाजवून लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
अलास्का, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियाच्या काही भागात एक फूट ते पाच फूट उंची (30 सेंटीमीटर ते 1.5 मीटरपेक्षा कमी) त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीने पॅसिफिकमध्ये “धोकादायक त्सुनामी लाटा” येण्याचा इशारा दिला आहे. रशिया, उत्तर हवाईयन बेटे आणि इक्वेडोरच्या काही किनाऱ्यांवर तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार, जपान, हवाई, चिली आणि सोलोमन बेटे यासारख्या देशांमध्ये 1-3 मीटर उंचीची त्सुनामी येऊ शकते.
“पॅसिफिक महासागरात झालेल्या मोठ्या भूकंपामुळे, हवाईमध्ये राहणाऱ्यांसाठी त्सुनामी इशारा लागू आहे,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. “अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर त्सुनामी इशारा जारी केला आहे.”
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने शांघाय आणि झेजियांग प्रांतांसह देशाच्या पूर्व किनाऱ्यावर 0.3 ते एक मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मेक्सिकोच्या नौदलाने मेक्सिकन पॅसिफिक किनाऱ्यावर 30 ते 100 सेंटीमीटर (1 ते 3.3 फूट) उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि पेरू या देशांनीही त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.