अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर ‘टॅरिफ किंग’ असल्याचा आरोप करत 30 जुलै 2025 रोजी 25% अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. 1ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या धोरणामुळे केवळ भारतालाच नाही, तर अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या खिशालाही फटका बसणार आहे. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ धोरणांचा अमेरिकन लोकांवर आणि भारतावर कसा परिणाम होईल, हे सविस्तरपणे समजून घेऊया.
ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ धोरणांमुळे अमेरिकेतील लोकांना का मोजावी लागतेय जास्त किंमत?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकन लोकांनाच जास्त किंमत मोजावी लागत असल्याचं अनेक अहवालांतून समोर आलं आहे. या टॅरिफमुळे अमेरिकेतील वस्तूंच्या किमती वाढणार आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम अमेरिकन कुटुंबांच्या खिशावर होणार आहे.
येल विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला दैनंदिन वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे साधारणपणे 2 लाख रुपये उत्पन्न कमी झाल्याचा अनुभव येईल. 2023 सालच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील टॅरिफ दर हा सरासरी 18.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1930 सालानंतरचा हा अमेरिकेतील सर्वात जास्त टॅरिफ दर आहे.
येल विद्यापीठाच्या अहवालानुसार, सरासरी टॅरिफ दरात झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत अल्पावधीत 1.8 टक्क्यांनी महागाई वाढू शकते. या टॅरिफचा फटका सर्व अमेरिकन कुटुंबांना सारख्या प्रमाणात बसणार नाही. तर, सर्वात कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचं त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत तीनपट जास्त नुकसान होईल, म्हणजेच त्यांना साधारणपणे 1.08 लाख रुपये तोटा होऊ शकतो. तर श्रीमंत कुटुंबांना सुमारे 4.15 लाखा रुपयांचा तोटा होऊ शकतो.
कोणत्या वस्तू महाग होतील?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 25% टॅरिफमुळे अमेरिकेत दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते इतर वस्तूंपर्यंत सगळ्याच वस्तू महाग होतील.
शूज आणि हँडबॅगच्या किमतीत 40 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर, कपडे आणि कपड्याशी संबंधित वस्तुंच्या किंमती 38 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. टेक्स्टाईल वस्तू या 19 टक्के महाग होतील. 2025 वर्षात सुमारे 20,750 कोटीं रुपये कापड निर्यात भारताकडून अमेरिकेला केली जात होती.
तसेच, खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये देखील 3.4 टक्क्यांची वाढ होईल. ताजी फळे आणि भाज्या 7 टक्के महाग होतील.मोटार वाहनांच्या किंमतीत साधारणपणे 12.3 टक्के वाढ होईल. यामुळे एका नवीन गाडीच्या किमतीत सुमारे 4.90 लाख रुपयांची वाढ होऊ शकते.
2023 मध्ये भारताने अमेरिकेला 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किंमतीचे ऑटो पार्ट्स अमेरिकेत पाठवले होते. यात गाडीच्या इंजिनचे भाग, ब्रेक, गिअर असेंब्ली आणि वायरिंग हार्नेस यांचा समावेश होता. पण सध्याच्या नव्या टॅरिफमुळे गाडी दुरुस्त करण्याचा खर्च वाढू शकतो आणि यामुळे अमेरिकेतील ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो.
अमेरिका हा भारताकडून हिरे आणि सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत अमेरिकेला रत्न आणि तयार दागिने दोन्ही पाठवतो. जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्या मते, अमेरिका त्यांच्या उद्योगाच्या एकूण जागतिक व्यापाराच्या जवळजवळ 30 टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात करते. अशा मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यास याचा अजून खर्च वाढेल, शिपमेंटला उशीर होईल, किंमतीवर परिणाम होईल आणि याचा संपूर्ण व्यापार साखळीवर दबाव येईल.
हेही वाचा : भारत-अमेरिका व्यापार संबंध
औषधांवर परिणाम?
सध्या फार्मा क्षेत्राला या टॅरिफमधून सूट असली तरी, तज्ञांचे म्हणणे आहे की हे कधीही बदलू शकते. जर ट्रम्प यांनी औषधांवर टॅरिफ लावला, तर कॅन्सर, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या महत्त्वाच्या औषधांसह जेनेरिक औषधांच्या किंमती अमेरिकन ग्राहकांसाठी वाढू शकतात. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानुसार अमेरिकेतील सुमारे 40 टक्के जेनेरिक औषधे भारत पुरवतो. भारताची औषध निर्यात सुमारे 62,250 कोटी रुपये इतकी आहे.
केवळ किंमतीच नाही, तर अर्थव्यवस्थेवरही परिणाम
तज्ञांनी ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जर या टॅरिफमुळे इतर देशांनी प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर टॅरिफ लावले, तर अमेरिकेचा GDP वाढीचा दर 2025-26 मध्ये सुमारे 0.5 टक्के कमी होईल. आणि 2025 मध्ये बेरोजगारी 0.3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, 2026 मध्ये ती आणखी वाढू शकते.
जे.पी. मॉर्गन या मोठ्या बँकेने केलेल्या वेगळ्या अभ्यासातही हेच सिद्ध झाले आहे की, टॅरिफमुळे महागाई वाढेल, लोक खर्च कमी करतील आणि यामुळे अमेरिकेच्या जीडीपीवर दबाव येईल. टॅरिफमुळे सरकारला कर मिळतो खरा, पण त्यामुळे आर्थिक वाढ आणि लोकांचे कल्याण मात्र कमी होते.
ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावर काय परिणाम होईल?
तज्ञांचे म्हणणे आहे की, या टॅरिफमुळे भारताचा GDP 0.2 ते 0.5 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. भारतावर लावलेला 25 टक्के टॅरिफ हा इंडोनेशिया (19%), फिलिपिन्स (20%) आणि व्हिएतनाम (20%) सारख्या भारताच्या प्रतिस्पर्धी देशांपेक्षा जास्त आहे.
अमेरिकेत होणाऱ्या कापड आणि कपड्यांच्या आयातीमध्ये भारताचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. पण, या टॅरिफमुळे भारत या क्षेत्रात बांगलादेश आणि व्हिएतनामशी स्पर्धा करू शकणार नाही. ज्यामुळे कपडे, चादरी आणि टॉवेलच्या निर्यातीवर फटका बसू शकतो.
या टॅरिफमुळे अमेरिकेतील मागणी कमी झाल्यामुळे टाटा मोटर्स आणि भारत फोर्जसारख्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागू शकते. स्मार्टफोन आणि सोलर पॅनल जोडणाऱ्या कंपन्यांनाही याचा फटका बसेल.
वस्तुंच्या किंमतीतील वाढ आणि आर्थिक समस्यांमुळे हे स्पष्ट होतं की, टॅरिफमुळे अमेरिकेतील लोकांच्या खिशातून थेट पैसे जात आहेत. त्यांच्या जगण्याचा खर्च वाढतोय, गरीब कुटुंबांना जास्त फटका बसतोय, नोकऱ्या कमी होत आहेत आणि 2025 मध्ये आर्थिक वाढ मंदावणार आहे.
म्हणूनच, जरी टॅरिफ इतर देशांवर लावले जात असले तरी, त्याचा परिणाम शेवटी टॅरिफ लावणाऱ्या देशातील सामान्य लोकांनाही भोगावा लागतो. ट्रम्प यांनी भारतावर लावलेले टॅरिफ फक्त एक ‘वाटाघाटीची युक्ती’ म्हणून लादले आहेत, असे तज्ञांचे म्हणणं आहे. मात्र, त्यांनी असा इशाराही दिला आहे की, भारताला अमेरिकेसोबत करार करणे गरजेचे आहे. भारत आणि अमेरिकेने 25 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा चर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे, भारत आणि अमेरिका करार करतील का? की दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.