आपण सगळेच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो, मग ते पुरुष असो वा महिला. यासाठी कोणी महागडे प्रोडक्ट वापरतं तर कोणी योगा आणि घरगुती उपाय करतात. पण तुम्ही एक गोष्ट विसरता आहात, ती म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं, तसतशी आपल्या त्वचेची गरजही बदलते. बऱ्याचदा आपण बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स किंवा सीरमच्या मागे धावतो, पण चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग करणं विसरून जातो.
आपले वय जसं वाढतं, तसं आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. प्रदूषण आणि उन्हामुळे आपली त्वचा कोरडी होते, बारीक सुरकुत्या येतात आणि त्वचा सैल पडते. पण काळजी करू नका. काही सोप्या टिप्स आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या वयात त्वचेची काळजी कशी घ्यायची.
तिशीत आहात? हायड्रेशन आणि संरक्षणावर भर द्या
वयाच्या तिशीत त्वचेतील कोलेजन नावाचं प्रोटीन कमी व्हायला लागतं. हे प्रोटीन त्वचा लवचिक आणि मऊ ठेवतं. त्यामुळे, ते कमी झालं की त्वचा कोरडी होते. म्हणून या वयात त्वचेला मॉइश्चरायझिंग करा. आणि त्वचेची जास्त काळजी घ्या.
त्वचेसाठी तुम्ही हायल्युरॉनिक ऍसिड, ग्लिसरीन आणि युरिया असलेले मॉइश्चरायझर निवडा. हे घटक तुमच्या त्वचेत पाणी टिकवून ठेवतात आणि त्वचा दिवसभर हायड्रेटेड ठेवतात. तुम्ही घरी असाल किंवा बाहेर, सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हातील हानिकारक UVA आणि UVB किरणांबरोबरच फोन आणि लॅपटॉपमधून निघणारा ब्लू लाइटसुद्धा त्वचेला नुकसान पोहोचवतो. त्यामुळे SPF 30+ आणि PA ++++ असलेले सनस्क्रीन नक्की वापरा.
रात्रीच्या वेळी त्वचेतील पेशी दुरुस्त होतात. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार एक चांगला नाईट क्रीम किंवा नाईट ऑइल नक्की वापरा.
चाळीशीत असाल तर… त्वचेचा सैलपणा आणि कोरडेपणा दूर करा
चाळीशीत आपली त्वचा अधिक कोरडी होते. त्वचेतील लवचिकता कमी होते आणि पेशींची वाढ देखील हळू होते. हार्मोन्सच्या बदलांमुळे त्वचेवरचा थर पातळ होतो, ज्यामुळे त्वचेवरचे मॉइश्चर जास्त वेळ टिकत नाही.
यासाठी तुम्ही लाइट मॉइश्चरायझरच्या ऐवजी थोडे थिक आणि क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. सेरामाइड्स, पेप्टाइड्स आणि युरिया असलेले प्रॉडक्ट्स निवडा. हे घटक त्वचेचा नैसर्गिक थर परत आणतात आणि कोलेजन वाढवण्यास मदत करतात.
त्वचेतील नवीन पेशी लवकर तयार होण्यासाठी रेटीनॉल किंवा व्हिटॅमिन ए असलेले प्रोडक्ट्स तुमच्या रूटीनमध्ये ॲड करा. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होतात आणि त्वचेत मॉइश्चर टिकून राहतं. व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग एकसारखा करतो आणि निस्तेजपणा घालवतो, ज्यामुळे चेहरा उजळ दिसतो.
हेही वाचा : सदैव तरुण राहण्यासाठी ‘या’ 10 सोप्या टिप्स!
पन्नाशीनंतर: त्वचेला पोषण द्या आणि जुना ग्लो परत आणा
पन्नाशीनंतर, म्हणजेच मेनोपॉजच्या काळात शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. ज्यामुळे त्वचा खूप कोरडी आणि सेन्सिटिव्ह होते. त्वचेतील नैसर्गिक तेल जवळपास पूर्ण कमी होतं. यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. म्हणूनच या वयात सातत्याने त्वचा मॉइश्चरायझिंग करणं खूप गरजेचं आहे.
यासाठी तुम्ही हायल्युरॉनिक ऍसिड, सेरामाइड्स, ग्लिसरीन आणि युरिया असलेले प्रोडक्ट वापरा, जे त्वचेतील मॉइश्चर टिकवून ठेवतात. पन्नाशीच्या वयातही नाईट क्रीम लावणे खूप महत्वाचं आहे. यासाठी रेटीनॉल, पेप्टाइड्स आणि व्हिटॅमिन सी असलेले खास प्रॉडक्ट्स निवडा.
रोजहिप, जोजोबा आणि आर्गन ऑइल सारखे फेशियल ऑइल तुमच्या रूटीनमध्ये नक्की ॲड करा. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळतं. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि ग्रीन टी चा वापर करा. यामुळे त्वचा पर्यावरणातील प्रदूषणापासून सुरक्षित राहते.
रोजच्या सवयी ज्या सगळ्यांसाठी महत्वाच्या आहेत
– दिवसभर पुरेसं पाणी प्या, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड राहते.
– चेहरा धुण्यासाठी हलके क्लींजर वापरा.
– आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलकं एक्सफोलिएशन करा, ज्यामुळे डेड स्किन निघून जाते.
– ऊन, एसी आणि प्रदूषणामुळे त्वचेतील मॉइश्चर कमी होतं. त्यामुळे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावा.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि कोणत्याही वयात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवू शकता.