तुम्ही कधी विचार केलाय का ? आज आपण सगळे जे घरबसल्या एका क्लिकवर खरेदी करतो, हे कसं शक्य झालं? तर, ही गोष्ट आहे दोन जिगरी दोस्तांची. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी भारतात ऑनलाईन शॉपिंगची सुरूवात केली. त्यांची ही गोष्ट फक्त एका कंपनीच्या यशाबद्दल नाही, तर दोन मित्रांनी पाहिलेल्या मोठ्या स्वप्नाची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या घट्ट मैत्रीची आहे. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल.
मैत्री म्हणजे फक्त सुख-दु:खात साथ देणं आणि त्यासोबतच एकमेकांवर विश्वास ठेवून एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येणं. दोन जिगरी मित्र एकत्र येतात आणि काहीतरी मोठं करायचं ठरवतात. त्यांची ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड, विश्वास आणि एकी त्यांना यशाच्या नव्या वाटेवर घेऊन येते. सचिन आणि बिन्नी यांच्या प्रवासात आपल्याला याच मैत्रीची खरी ताकद दिसते.
‘ॲमेझॉन’मध्ये सुरू झालेली मैत्री आणि ‘फ्लिपकार्ट’ची कल्पना
आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी असलेले सचिन आणि बिन्नी, ॲमेझॉनमध्ये एकत्र काम करत होते. तिथेच त्या दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांची मैत्री घट्ट होतं गेली. ॲमेझॉनमध्ये नोकरी करत असताना त्यांना भारतामध्ये ई-कॉमर्सची खूप मोठी संधी आहे हे लक्षात आलं. 2007 साली दोघांनी त्यांची नोकरी सोडून स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्येच त्यांनी भारतीय ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’ ची स्थापना केली. बेंगळुरूमध्ये एका 2BHK फ्लॅटमध्ये त्यांनी कामाची सुरवात केली.
दोघांनीही आपापल्या कौशल्यानुसार कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. सचिन बन्सल यांच्याकडे मार्केटिंग, वेबसाईट डिझाइन आणि ग्राहकांशी बोलण्याची जबाबदारी होती. तर , बिन्नी बन्सल यांनी कंपनीचे ऑपरेशन्स आणि डिलिव्हरीचं काम सांभाळलं. त्यांच्या कामाच्या या स्पष्ट विभागणीमुळे आणि एकमेकांवरच्या विश्वासामुळे फ्लिपकार्टचा पाया मजबूत झाला.
संकटांवर मात करणारी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’
सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टला अनेक अडचणी आल्या. ई-कॉमर्ससारखी संकल्पना तेव्हा भारतीयांसाठी नवी होती. ऑनलाइन खरेदीवर लोकांचा विश्वास बसत नव्हता. यावर उपाय म्हणून सचिन आणि बिन्नी यांनी एक धाडसी निर्णय घेतला. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ ची सुविधा सुरू केली. या एका निर्णयाने भारतीय ई-कॉमर्सचे चित्रच पालटून टाकले. एका मित्राची कल्पना आणि दुसऱ्या मित्राने ती प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेली मदत, यातूनच फ्लिपकार्ट कंपनी पुढे गेली.
गुगल कंपनीमध्ये बिन्नी बन्सल यांना दोनदा नोकरी नाकारल्यानंतर, त्यांनी निराश न होता स्वतः काहीतरी सुरू करायचं ठरवलं. सुरुवातीला दोघांनी मिळून 2,71,000 रुपये जमा केले. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअरने झाली. नंतर पुढे संगीत, चित्रपट, गेम व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री सुरू झाली.
दोघांना अनेकवेळा अपयशही पहावे लागले. 2007 मध्ये त्यांनी पहिली वस्तू विकली ती ‘लिव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड’ नावाचं पुस्तक. चर्च स्ट्रीटवरील गंगाराम बुक स्टोअरसमोर उभे राहून लोकांना फ्लिपकार्टची माहिती देण्यापासून ते मोबाईल फोनच्या विक्रीमध्ये आलेले अपयश पचवून पुन्हा उभे राहण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेकांना साथ दिली. पुढे 2008 मध्ये दिल्लीत फ्लिपकार्टची अनेक ऑफिसेस उघडण्यात आली आणि 2009 मध्ये कंपनीचे कार्यालय मुंबईत उघडण्यात आले.
2011 मध्ये त्यांनी सुरू केलेलं म्युझिक स्ट्रीमिंग ॲप ‘फ्लाइट’ आणि पेमेंट ॲप ‘पेझिपी’ यशस्वी झाले नाहीत. पण या अपयशांमुळे ते थांबले नाहीत. त्यातून शिकून त्यांनी ‘फोनपे’ सारखं एक मोठं आणि यशस्वी प्रोडक्ट तयार केलं. त्यांचे काही प्रयोग जरी फसले असले, तरी त्यांनी हार मानली नाही. दोघेही एकमेकांच्या चुकीच्या निर्णयांमधून काही ना काही शिकून एकत्र पुढे जात होते.
ॲमेझॉनशी स्पर्धा
2013 मध्ये, जगातली सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘ॲमेझॉन’ भारतात आली आणि फ्लिपकार्टसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. पण सचिन आणि बिन्नी घाबरले नाहीत. त्यांनी त्यांच्या मैत्रीची आणि कामाची ताकद दाखवून दिली. त्यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर लक्ष दिलं.
2014 मध्ये, त्यांनी फॅशनमधील लोकप्रिय कंपनी ‘मिंत्रा’ (Myntra) विकत घेतली. त्यानंतर 2016 मध्ये ‘जबोंग’ (Jabong) सुद्धा त्यांच्या कंपनीत सामील झाली. यामुळे फॅशन ई-कॉमर्समध्ये फ्लिपकार्टचा दबदबा वाढला. त्यांचा हा निर्णय फ्लिपकार्ट कंपनीला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. दोघा मित्रांच्या याच एकजुटीमुळे फ्लिपकार्टने फॅशन ई-कॉमर्समध्ये 60% पेक्षा जास्त वाटा मिळवला.
यशाच्या शिखरावर आणि पुढेही टिकून असलेली मैत्री
2018 मध्ये, जगातल्या सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘वॉलमार्ट’ ने फ्लिपकार्टला 16 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतले. एका गॅरेजमधून सुरू केलेल्या कंपनीची किंमत अब्जावधी डॉलर झाली होती. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचे स्वप्न सत्यात उतरले होतं. त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ होतं.
या करारानंतर सचिन आणि बिन्नी दोघांनीही फ्लिपकार्ट सोडण्याचा निर्णय घेतला. लोकांकडून त्यांच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले असले तरी, त्यांची मैत्री मात्र आजही कायम आहे. फ्लिपकार्टनंतर सचिन यांनी ‘नावी टेक्नॉलॉजीज’ आणि बिन्नीने ‘एक्सटूटेन्एक्स टेक्नॉलॉजीज’ (xto10x Technologies) सारखे नवे उद्योग सुरू केले आहेत. आजही ते दोघे तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करतात.
मैत्रीचे हे नाते फक्त भावनांवर आधारित नसते, तर ते एकमेकांवरच्या विश्वासावर, एकमेकांना समजून घेण्यावर आणि एकत्र काम करण्याच्या क्षमतेवर टिकून असते.