तुम्ही कधी विचार केलाय का, रस्त्यावर शांत बसलेला कुत्रा अचानक तुमच्या बाईक किंवा गाडीच्या मागे का धावू लागतो? आणि नुसता धावत नाही, तर मोठमोठ्याने भुंकायलाही लागतो. हे असं आपण सगळेच अनेक वेळा पाहतो. पण यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण.
कुत्र्यांची वास घेण्याची अद्भुत शक्ती
आपल्याला माहीत आहे की, कुत्र्यांची वास घेण्याची शक्ती माणसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. ते लांबूनही त्यांच्या हद्दीतून गेलेल्या दुसऱ्या कुत्र्यांचा वास ओळखू शकतात. जेव्हा तुमची गाडी दुसऱ्या ठिकाणाहून येते, तेव्हा तिथल्या कुत्र्यांचा वास तुमच्या गाडीच्या टायरला लागलेला असतो. जशी तुमची गाडी एका नवीन भागात पोहोचते, तिथले स्थानिक कुत्रे लगेच टायरवरील हा बाहेरील कुत्र्यांचा वास ओळखतात.
त्यांच्यासाठी ही एक प्रकारची धोक्याची सूचना असते. त्यांना वाटतं की एक अनोळखी कुत्रा त्यांच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. म्हणूनच ते लगेच सतर्क होतात आणि तुमच्या गाडीच्या मागे धावतात.
‘लघवी’ ही कुत्र्याची खास भाषा आहे
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कुत्रे वाहनांच्या टायरवर लघवी करतात. ही काही सहज गोष्ट नसते, तर ही त्यांची एक खास भाषा आहे. असं करून ते त्यांची उपस्थिती त्या भागात नोंदवतात. हा वास इतर कुत्र्यांसाठी एक संदेश असतो, की ‘हा भाग आता माझ्या ताब्यात आहे.’ जेव्हा दुसरी एखादी गाडी त्याच रस्त्यावरून जाते, तेव्हा त्या वासांना ओळखल्यामुळे, स्थानिक कुत्र्यांना कळतं की ‘हा भाग आता त्यांच्या ताब्यात राहिला नाही’. अशा वासांमुळे ते आक्रमक होतात आणि त्या वाहनाच्या मागे धावतात.
हेही वाचा :वाघाची जीभ: ‘खास हत्यार’!
एखादी जुनी जखम सुद्धा कारण असू शकते
काहीवेळेस, कुत्र्यांचं गाडीमागे धावणं यामागे फक्त वास हेच कारण नसते. तर यामागे काही भावनिक कारण देखील असू शकते. कुत्रे खूप संवेदनशील प्राणी आहेत. जर तुमच्या गाडीमुळे त्यांच्या एखाद्या मित्राला किंवा साथीदाराला कधी दुखापत झाली असेल किंवा अपघातात त्याचा मृत्यू झाला असेल, तर ते त्या वाहनाला ओळखू शकतात आणि लक्षात ठेवू शकतात. पुढच्या वेळी जेव्हा तीच गाडी त्यांना दिसते, तेव्हा त्यांना त्या घटनेची आठवण होते. त्यामुळे रागाच्या भरात किंवा सूड घेण्यासाठी ते त्या गाडीचा पाठलाग करतात.
हलणारं वाहनच का ठरतं लक्ष्य?
कुत्रे चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या मागे धावत नाहीत, पण गाडी किंवा बाईकच्या मागे मात्र धावतात. कारण, कुत्रे सहसा स्थिर वस्तूंना दुर्लक्षित करतात. पण एखादी गोष्ट जेव्हा वेगाने धावते किंवा हलते, तेव्हा ती त्यांना एक आव्हान वाटते. आणि त्यांच्या शिकारी स्वभावामुळे, ते वेगाने जाणाऱ्या गोष्टींचा पाठलाग करू लागतात. म्हणूनच, चालत जाणाऱ्या व्यक्तीमुळे त्यांना काही त्रास होत नाही, पण बाईक किंवा गाडीचा आवाज आणि वेग त्यांना सतर्क करतो.
अशा परिस्थितीत काय करावे?
अशा वेळी घाबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही.
घाबरू नका आणि वेग वाढवू नका, अचानक वेग वाढवल्यास गाडीवरून तुमचा तोल जाऊ शकतो.
शक्य असल्यास वाहनाचा वेग कमी करत, हळू थांबवा आणि काही सेकंद न हलता थांबा. कुत्रे सहसा पाठलाग करतात, पण त्यांना जास्त चिथावले नाही तर ते हल्ला करत नाहीत.
तुमच्या परिसरातील कुत्र्यांना चांगली वागणूक दिल्यास, त्यांना खायला दिलं तर, ते तुमचं वाहन ओळखायला लागतील आणि तुमचा पाठलाग करणार नाहीत.