कुत्रा या पाळिव प्राण्याला ‘माणसांचा मित्र’ म्हणून गणलं जातं. त्यांच्या या मित्रत्वाच्या गुणामुळेच दिव्यांग लोकांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यासाठी काही श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. अशा श्वानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी ‘असिस्टंट डॉग डे’ साजरा केला जातो.
दिव्यांग लोकांना मदत करण्यासाठी या श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. हे विशेष प्रशिक्षित कुत्रे महत्त्वाचा आधार देतात. त्यांच्या मालकांना स्वयंपूर्ण जगण्यास आणि जीवनमान उंचवण्यास मदत करतात.
दिव्यांग लोकांचा आधार
दिव्यांग लोकांना पूर्ण वेळ आधार देण्यासाठी कोणताही व्यक्ती 24 तास उपलब्ध असणं काही वेळेला शक्य होऊ शकत नाही. अशावेळी दैनंदिन कामात, प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी काही कुत्र्यांना विशेष पद्धतीने प्रशिक्षित केलं जातं. विशेषतः प्रवास करताना हे प्रशिक्षित श्वान दिव्यांग माणसांना रस्त्याविषयी मार्गदर्शन करतात.
या श्वानांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वतंत्रपणे आणि दिनचर्या उत्तमरित्या जगण्यासाठी मदत होते.
विशेष श्वानांची निवड
असिस्टंट श्वानांसाठी जर्मन शेफर्ड आणि पूडल्स या जातीच्या श्वानांची निवड केली जाते. या दोन जातीतले श्वान हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि क्षमतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे दिव्यांग लोकांना मदत करण्यासाठी या जातीतल्या श्वानांची प्रामुख्यांना निवड केली जाते. या दोन जातीशिवाय इतर पाळीव श्वानांनाही योग्य पद्धतीने प्रशिक्षिण देऊन त्यांना दिव्यांग लोकांना साहाय्य करण्यासाठी सक्षम करता येते.
या श्वानांकडून कोणत्या दिव्यांगाना मदत केली जाते?
दृष्टिहीन व्यक्ती, जे व्यक्ती पूर्णत: बहिरे आहेत किंवा कमी ऐकू येते अशा व्यक्ती, ज्यांना डायबेटिस आहे किंवा फिटस् येतात अशा रुग्णांसोबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रशिक्षित श्वानांना ठेवलं जातं. याशिवाय कोणत्याही आघातानंतर येणारा मानसिक ताण आणि इतर मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांसोबत या श्वानांना ठेवता येतं. तसेच विविध हॉस्पिटल्स आणि वृद्धाश्रमांमध्येही वृद्ध माणसांचा एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांना सोबत व्हावी यासाठी या श्वानांची नेमणूक केली जाते. प्रत्येक गरजेनुसार या श्वानांना प्रशिक्षिण दिलं जातं. त्यामुळे रुग्णांच्या वा व्यक्तिच्या गरजेनुसार योग्य त्या श्वानाची निवड केली जाते.
हे प्रशिक्षण कसं दिलं जाते?
श्वानांना मानवी मदतीसाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया दीर्घ आणि हळूहळू होत असते. हे श्वान लहान पिल्लं असतात तेव्हापासून त्यांना हे प्रशिक्षण द्यायला सुरूवात होते. सुरूवातीला त्यांना समाजिक वातावरणात मिसळणे आणि आज्ञा पाळणे इथून सुरूवात केली जाते. त्यानंतर या श्वानांना भविष्यात ते कोणत्या रुग्णांच्या मदतीसाठी पात्र ठरु शकतात त्यानुसार त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरूवात करतात. यासाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी लागतो. या दोन वर्षात या श्वानांकडून दररोजचा दैनंदिन कामांचा सराव करुन घेतला जातो, त्यांना संयमी राहायला आणि सकारात्मक वर्तन करण्यासाठी शिकवलं जातं.
तसेच या श्वानांना केवळ कामांसंबंधित प्रशिक्षण जरी दिलं जात असलं तरी हळूहळू हे श्वान त्या-त्या रुग्णांसोबत खूप जवळीक साधतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेता येतात. ते त्यांच्याशी (रुग्णांशी) खूप प्रेमाने, आपुलकीने वागत असतात.
असिस्टंट डॉगचे हक्क
अनेक सार्वजनिक ठिकाणी श्वानांना प्रवेश नाकारला जातो. मात्र अनेक देशात अशा प्रशिक्षित असिस्टंट श्वानांसाठी विशेष कायदा केलेला आहे.
आपल्या देशातही या असिस्टंट डॉगसाठी विशेष कायदा तयार केलेला आहे. अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, 2016 (RPWD कायदा) अंतर्गत या असिस्टंट श्वानांना संरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग लोकांशी भेदभाव होऊ नये, त्यांना समान वागणूक मिळावी आणि त्यांचे हक्क – अधिकार अबाधित राहावेत यासाठी या कायद्याची निर्मिती केलेली आहे.
या कायद्यानुसार अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी त्यांना असिस्ट करणाऱ्या श्वानांना सोबत ठेवता येतं. हा कायदा केवळ सेवा देणाऱ्या प्राण्यांसाठी नाही तर RPWD या कायद्यामुळे या प्राण्यांना ओळख आणि कायदेशीर संरक्षण मिळतं. दुकाने, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक वाहतूक अशा सार्वजनिक सेवा देणाऱ्या ठिकाणांवर या श्वानांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (DGCA) या श्वानांना विमान प्रवास करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय या श्वानांसाठी विशेष व्यवस्था करण्याची जबाबदारी सुद्धा या विमान कंपन्यांवर असते.
अमेरिकेमध्ये या असिस्टंट डॉगना डिसॲबिलीटी कायद्यांतर्गत संरक्षण दिलं आहे. या कायद्यामुळे या श्वानांना त्यांच्या रुग्णांसोबत शाळा, दुकानं, हॉटेल अशा अनेक ठिकाणी प्रवेश दिला जातो.