रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनांना आळा घालण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून रस्ते सुरक्षा नियम तोडणाऱ्यांविरोधात त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर निगेटिव्ह गुण दिले जाणार आहेत. यामध्ये गाडी चालवताना वेगाची मर्यादा ओलांडणे, सिग्नल तोडणे अशा सगळ्या नियमांच्या उल्लंघनाचा समावेश असणार आहे. यामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्त निगेटिव्ह गुण जमा झाले तर ते लायसन्स रद्द केलं जाणार आहे.
निगेटिव्ह गुण प्रणाली म्हणजे नेमकं काय?
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांकडून आतापर्यंत दंड वसूल केला जायचा. मात्र, दंड भरल्यावर तो चालक यापुढे व्यवस्थित वाहन चालवेल याची खात्री नाही. संबंधित चालकाला नियमांचा धाक रहावा यासाठी परिणामकारक शिक्षा असणं गरजेचं होतं. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर निगेटिव्ह गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. जर नियमांचं पालन करत योग्य पद्धतीने वाहन चालवलं तर त्यांना पॉझिटिव्ह गुण ही दिले जाणार आहेत.
या नियमांनुसार, गाडी चालवताना जो गुन्हा घडेल त्यापद्धतीने गुण दिले जाणार आहेत. यामध्ये मंत्रालयाने ठरावीक मर्यादा आखून दिली आहे. जर एखाद्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर मर्यादेपेक्षा जास्त निगेटिव्ह गुण जमा झाले तर त्या व्यक्तिचं लायसन्स रद्द केलं जाऊ शकते.
‘या’ नियमांचं उल्लंघन केलं तर निगेटिव्ह गुण मिळणार
यानुसार रस्त्यावर बेपर्वाईने गाडी चालवणे, वेग मर्यादा ओलांडणे, मद्य सेवन करुन गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल वापरणे आणि लायसन्सशिवाय गाडी चालवणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक गुन्ह्यांसाठी वेगवेगळे गुण ठरवलेले आहेत.
12 गुणांची मर्यादा ओलांडली तर काय होईल?
जर वाहन चालकांने तीन वर्षात अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं. त्यांच्या लायसन्सवर 12 हून जास्त निगेटिव्ह गुण जमा झाले तर 1 वर्षासाठी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केलं जाणार आहे. जर त्या चालकाकडून वारंवार असे गुन्हे घडतच राहिले तर त्याचं लायसन्स हे कायमस्वरुपी रद्द केलं जाणार आहे.
लायसन्स रद्द केल्यावर ते परत मिळविण्यासाठी त्या चालकाला पुन्हा ड्रायव्हिंगची परिक्षा द्यावी लागणार आहे. निगेटिव्ह गुणांमुळे लायसन्स रद्द झाल्यामुळे ही परिक्षाही खूप काळजीपूर्वक घेतली जाणार आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यावरच त्या व्यक्तिला पुन्हा लायसन्स मिळू शकतं.
तीन वर्षानंतर निगेटिव्ह गुण संपणार का?
या निगेटिव्ह गुणाच्या व्यवस्थेला तीन वर्षाचा कालावधी दिला आहे. म्हणजे तीन वर्षांमध्ये तुमच्या लायसन्सवर 12 पेक्षा जास्त निगेटिव्ह गुण जमा झाले तर लायसन्स निलंबीत केलं जाईल. मात्र, याच तीन वर्षात जर 12 पेक्षा कमी गुण जमा झाले तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. तसेच तीन वर्ष पूर्ण झाल्यावर हे गुण नष्ट केले जातील. पुन्हा नव्याने तीन वर्षाचा कालावधी सुरू होईल. थोडक्यात हे गुण तीन वर्षसाठीचं रेकॉर्डवर राहणार आहेत.
नियम पाळणाऱ्या चालकांसाठी काय?
वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहन चालवणाऱ्या चालकांना या नियमांअंतर्गत गौरविलं जाणार आहे. त्यांना पॉझिटिव्ह गुण किंवा उत्तम पद्धतीने वाहन चालवण्यासाठी विशेष अनुदान दिलं जाणार आहे.
अंमलबजावणी कधी होणार?
केंद्र सरकारने या नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीची पुरेशी तयारी केलेली आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये देशभरात ही व्यवस्था सुरू केली जाणार आहे. हा सगळा रेकॉर्ड, माहिती डिजिटल पद्धतीने सुरक्षित केला जाणार आहे. देशभरात तुम्ही कुठेही वाहन चालवत असाल तर त्यामध्ये एक समानता राहून तुम्ही कशा पद्धतीने वाहन चालवता याची माहिती वाहतुक पोलिसांना मिळावी यासाठी संपूर्ण माहिती ही डिजिटलच्या माध्यमातून संग्रहित केली जाणार आहे.
जगात इतरत्र कुठे अशी पद्धत अस्तित्वात आहे का?
ऑस्ट्रेलिया, यूके, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स आणि कॅनडा या देशांमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे. यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होते. प्रत्येक चालक का जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वाहन चालवून नियमांचे पालन करतो.