संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) बैठक झाली. या बैठकीत सुमारे 67 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी देण्याची घोषणा केली. या खर्चातुन लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी हेव्ही ड्युटी ड्रोन, ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांसारखी शस्त्रास्त्रे खरेदी केली जाणार आहेत.
यामधून लष्करांच्या बीएमपी चिलखती वाहनांसाठी थर्मल इमेजर-आधारित ड्रायव्हर नाईट साईट्सच्या यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. या यंत्रामुळे रात्रीच्या वेळी लष्कराला सीमावर्ती भागात संरक्षण करण्यासाठी किंवा रात्रीच्या वेळी सीमेवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं सोपं जाईल.
संरक्षण अधिग्रहण परिषदने दिलेल्या माहितीनुसार, या यंत्रामुळे लष्करी वाहन चालकाला रात्रीच्या वेळी व्यवस्थितपणे दिसू लागेल. यामुळे रात्रीच्या वेळी कोणतंही सर्च ऑपरेशन राबवणं सोईस्कर होईल.
भारतीय नौदलासाठी, AoN ला कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सरफेस क्राफ्ट, ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टम आणि लाँचर्स तसेच BARAK-1 पॉइंट-डिफेन्स मिसाइल सिस्टमच्या अपग्रेडेशनसाठी देखील मंजुरी दिली आहे. या सरफेस क्राफ्टचा उद्देश सागरी सीमा भागातील धोके शोधून काढून त्यांची क्षमता पाहून त्यानुसार ते निष्प्रभ करून पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढविण्यासाठी वापरली जाणार आहेत.
सीमेवरील पर्वतीय प्रदेशांमध्ये हवाई देखरेख प्रणाली सुधारण्यासाठी हवाई दलासाठी रडार आणि सक्षम/स्पायडर (SAKSHAM/SPYDER ) ही शस्त्र प्रणाली अपग्रेड करण्यासाठी मान्यता दिली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून हवाई सुरक्षा कमांड आणि नियंत्रण प्रणालीमध्ये अधिक सुधारणा करता येईल.
मानवरहित प्रणालींच्या क्षमतेला चालना देण्यासाठी, तिन्ही सेवांमध्ये मध्यम उंचीवरील दीर्घकाळ टिकणारा (MALE) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (RPA) खरेदी केले जाणार आहेत. अनेक पेलोड वाहून नेण्यास आणि विस्तारित श्रेणींमध्ये ऑपरेट करण्यास सक्षम, हे ड्रोन 24/7 देखरेख आणि लढाऊ तयारी वाढवतील अशी अपेक्षा आहे.
शिवाय, संरक्षण अधिग्रहण परिषदेने C-17 आणि C-130J वाहतूक विमानांच्या ताफ्यांसाठी देखभाल कार्यक्रमांना तसेच S-400 लाँग रेंज एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमसाठी व्यापक वार्षिक देखभाल कराराला मान्यता दिली आहे. यामुळे या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मची सतत कार्यरत उपलब्धता सुनिश्चित होईल.
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर दहशतवाद आणि पाकिस्तानच्या कुरापतींना योग्य उत्तर देण्यासाठी भारतीय संरक्षण दल हे अधिकाधिक आधुनिक शस्त्रास्त्रे मिळवून सुसज्ज राहत आहेत.