मोस्ट ब्युटीफुल गेम अशी क्रीडा विश्वात फुटबॉलची ओळख आहे. या फुटबॉलची लोकप्रियता जगात सर्वाधिक आहे. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. भारतातील फुटबॉलची लोकप्रियता पाहता एकेकाळी फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी भारताला फुटबॉलमधील ‘स्लिपिंग जायंट’ असे संबोधले होते. पण सध्या भारतीय फुटबॉलला घरघर लागली आहे. तरी फुटबॉल असोसिएशनच्या प्रशासनापासून ते अगदी स्थानिक फुटबॉलपर्यंत सारं काही आलबेल असल्याचंच दिसून येत आहे.
इंडियन सुपर लीगचे भवितव्य अंधारात
इव्हेंट आयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्यातील मास्टर राइट्स कराराच्या नूतनीकरणाबाबत अनिश्चिततेमुळे इंडियन सुपर लीगचा 2025/26 हंगाम स्थगित करण्यात आला आहे. 2010 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सध्याच्या एमआरएनुसार एफएसडीएल एआयएफएफला दरवर्षी 50 कोटी रुपये देते. त्या बदल्यात राष्ट्रीय संघासह भारतीय फुटबॉलच्या विविध पैलूंचे प्रसारण, व्यवस्थापन आणि व्यावसायिकीकरण करण्याचे अधिकार मिळवते. दरम्यान, आयएसएलच्या मास्टर राईट्स करारावर एआयएफएफ आणि एफएसडीएलमधील वाटाघाटी थांबल्याने भारतीय फुटबॉलचे भविष्य अनिश्चित आहे. एआयएफएफच्या नवीन घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यास विलंब केल्याने आणि क्लब आर्थिक तोटा आणि खेळाडूंच्या गुणवत्तेशी झुंजत असल्याने लीगचे भविष्य अधांतरी आहे.
बेंगळुरु एफसीकडून फुटबॉलपटू आणि कर्मचाऱ्यांचे वेतन स्थगित
इंडियन सुपर लीग क्लब बेंगळुरू एफसीने देशांतर्गत हंगामातील वाढत्या अनिश्चिततेमुळे खेळाडूंचे वेतन स्थगित करण्याची घोषणा केली. आयएसएलचे भविष्य अनिश्चित राहिल्याने बीएफसीने सोशल मीडियावर घोषणा केली की, ते त्यांच्या फुटबॉलपटू आणि सपोर्ट स्टाफला सध्या तरी पैसे देणे थांबवतील. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्यातील मतभेदांमुळे या वर्षीचा आयएसएल थांबवण्यात आला. पण भारतातील फुटबॉलची सध्याची स्थिती आणि दिशा याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर एआयएफएफ आठ क्लबच्या सीईओंना भेटणार आहेत. ‘’लीगच्या भविष्याबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याने हे पाऊल उचलण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आमचे फुटबॉलपटू, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य व कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, कारण आम्ही तोडगा निघण्याची वाट पाहत आहोत,” असे क्लबने पुढे म्हटले आहे. सध्या भारताचा माजी कर्णधार सुनील छेत्रीसह सर्व फुटबॉलपटूंना वेतन मिळणार नाही. पण त्यांच्या तरुण संघांवर आणि कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे क्लबने पुढे म्हटले आहे. आता भारतीय फुटबॉलला नवी भरारी घेण्यासाठी अनेक अडथळे पार करत आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचावे लागणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाच्या फिफा क्रमवारीत कमालीची घसरण
भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत सध्या 133 व्या क्रमांकावर आहे. गेल्या नऊ वर्षातील फुटबॉल संघाची ही सर्वात खराब कामगिरी आहे. 2025 मध्ये भारतीय पुरुष संघाने चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन गमावले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे. हे सर्व सामने या संघाने त्यांच्यापेक्षा कमी क्रमवारी असलेल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळले होते. विशेष म्हणजे चार सामन्यांमध्ये भारतीय फुटबॉल संघ केवळ दोन गोल करण्यातच यशस्वी झाला होता. गोल करण्याच्या संधींचे रूपांतर करण्यात अथवा बचावात्मक स्थिती राखण्यात संघाला कमालीचे अपयश आले. बांग्लादेशविरुद्धचा सामना तर गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्याबाबत संघाच्या ढासळण्यात कामगिरीवर कमालीची टीका झाली होती.
हेही वाचा: भारतीय महिला फुटबॉल संघाची गगनभरारी
सुनील छेत्रीचे पुनरागमनही संघाला तारण्यात अपयशी
सुनील छेत्रीने जून 2024 रोजी आतंरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला होता. पण 6 मार्च 2025 ला त्याची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. आणि त्याचे संघामध्ये पुनरागमन झाले. पण छेत्रीचे पुनरागमन झाले त्याचवेळी आपल्याला त्याचा पर्याय मिळालेला नाही, हे अधोरेखित झाले होते. ही बाब भारतीय फुटबॉलसाठी निश्चितच आशादायी नव्हती. भारतीय फुटबॉल लिजेंड बायचुंग भुतियानेही छेत्रीचे पुनरागमन भारतीय फुटबॉलच्या भविष्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत खंत व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांत छेत्री हा भारताचा एकमेव विश्वासार्ह सेंटर-फॉरवर्ड फुटबॉलपटू आहे जो गोल करू शकतो. संघ व्यवस्थापनाला छेत्रीसाठी एकमेव स्ट्रायकर भूमिकेत योग्य पर्याय शोधण्यात अपयश आले आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय फुटबॉल संघ मैदानावर खूपच कमकुवत दिसला होता. पाच सामन्यांत फक्त तीन गोल करण्यात संघाला यश आले होते. आणि एकही विजय भारतीय संघ साकारु शकला नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन किती वेळा त्याला पुनरागमनासाठी विनंती करणार हाही प्रश्न आहेच. आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीमध्ये त्याने एकूण 95 गोल केले आहेत. या क्रमवारीत तो क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी आणि अली दाईच्या मागे आहे. या तिघांनी अनुक्रमे 138, 112 आणि 108 गोल झळकावले आहेत.सुनील छेत्रीची कामगिरी पाहता भारताला त्याचा पर्याय तातडीने शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नवे प्रशिक्षक संघाला नवी दिशा देणार का ?
एआयएफएफला मिळालेल्या 170 अर्जांपैकी, अखेर फेडरेशनने भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खालिद जमील हे आदर्श उमेदवार असल्याचे मानले आहे. मागील प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेपेक्षा एआयएफएफने यावेळी स्वतःच्या तांत्रिक समितीच्या शिफारशी ऐकल्या आणि स्टीफन कॉन्स्टँटाईन आणि स्टीफन टार्कोविक यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यांच्या निवड यादीतून जमील यांची निवड केली. उल्लेखनीय बाब म्हणजे 2011 ते 2012 दरम्यान सॅव्हियो मेडेइरा यांच्या 13 सामन्यांच्या कालावधीनंतर जमील राष्ट्रीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारणारे पहिले भारतीय प्रशिक्षक ठरले आहेत. स्पॅनिश फुटबॉलपटू मनोलो मार्केझ यांनी त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात आठ सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवल्यानंतर गेल्या महिन्यात पद सोडल्यापासून भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त होते. खालिद जमिल यांची भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली परीक्षा 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या CAFA नेशन्स कप 2025 मध्ये होणार आहे. फिफा क्रमवारीत सध्या भारतीय फुटबॉल संघ 133 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत जागतिक क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, जागतिक क्रमवारीत 106 व्या क्रमांकावर असलेल्या ताजिकिस्तान आणि गेल्या वर्षी एएफसी आशियाई कप 2027 पात्रता फेरीत ब्लू टायगर्सचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तान संघासह कठीण गटात आहे.