हयग्रीव – विष्णूच्या दहा अवतारातील एक

विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात हयग्रीवाचा उल्लेख विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक म्हणून केला आहे.
[gspeech type=button]

मूर्तीशास्त्रानुसार हयग्रीवाचे शरीर मानवी असून डोके घोड्याचे आहे.  तो तेजस्वी शुभ्रवर्णाचा असून नेहमी पांढरे वस्त्र परिधान करून पांढऱ्या कमळावर आसनस्थ असतो.  त्याला चार हात असून त्यापैकी एक हात ज्ञानदानाच्या मुद्रेत तर दुसऱ्या हातात तो वेद धारण करतो. त्याने उरलेल्या दोन हातांत शंख आणि चक्र धारण केलेले आहेत जे विष्णुशी साधर्म्य दर्शवितात. त्याचे सौंदर्य स्फटिकासारखे असून तो तेजःपुंज आहे.

हयग्रीवाच्या उत्पतीसंदर्भातील कथा

सृष्टीच्या उत्पतीकाळात मधु आणि कैटभ या दोन असुरांनी ब्रह्मदेवाकडून वेद चोरून नेले. त्यामुळे ते परत आणण्यासाठी विष्णूने हयग्रीव रूप धारण केले. मधु आणि कैटभाचा वध करून हयग्रीवाने वेद परत आणले.  आणखी एका कथेनुसार, सृष्टीच्या उत्पतीच्या काळात विष्णूने हयग्रीवाचे रूप घेवून वेदांचे संकलन केले. हिंदू संस्कृतीत वेद म्हणजेच ज्ञान असल्याने हयग्रीवाला ज्ञानाची देवता मानले आहे.

हयग्रीव नावाचा दानव

आणि एका कथेनुसार विष्णुने हयग्रीव दानवाचा वध केला म्हणून त्याला हयग्रीव असे म्हटले जाते. दानव हयग्रीव हा कश्यप आणि दनु यांचा पुत्र होता. तो दानवांचा पहिला अधिपती बनला. विष्णूने वेदांची निर्मिती करून ते वेद ब्रह्मदेवाला दिले, तेव्हा शिवाने संपूर्ण मानवजातीचा नाश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस शिवाने फक्त मनु आणि त्याच्या पत्नीस वाचवले, कारण उर्वरित मानवजात वेद प्राप्त करण्यास अयोग्य होती. पर्यायाने येणारी मानवजात वेदांमुळे दानवांपेक्षा श्रेष्ठ असेल. हे जेव्हा हयग्रीवाला कळले तेव्हा त्याने मानवांना वेद मिळू नयेत म्हणून प्रयत्न सुरू केले. ब्रह्मदेव अनुपस्थित असताना हयग्रीव सत्यलोकात गेला. त्या वेळी वेद चार बालकांच्या रूपात होते. वेदांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने घोड्यात रूपांतर केले आणि कपटाने त्याने वेदांचे हरण केले. त्यानंतर विष्णूने मत्स्यावतार धारण केला आणि हयग्रीवाचा वध करून वेदांना मुक्त केले आणि शेवटी महाप्रलयानंतर ते मनुला प्रदान केले.

आसाममधील इ.स. 1583 मधील मंदिर प्रसिद्ध

हयग्रीवाच्या मूर्ती भारतभरात विविध मंदिरांमध्ये कोरलेल्या आढळतात. खजुराहो येथील लक्ष्मणमंदिरात कोरलेली हयग्रीवाची मूर्ती विशेष लक्षणीय आहे. हयग्रीवाचे प्रसिध्द मंदिर आसाम मधील कामरूप जिल्ह्यातील मणिकूट टेकडीवर वसलेले आहे. इ.स. अकराव्या शतकात कामरूपमध्ये रचलेल्या कालिका पुराणानुसार विष्णूच्या हयग्रीव रूपाचा उगम आणि मणिकूट पर्वतावरील (जिथे सध्याचे मंदिर आहे) त्याचे अंतिम स्थापन यांचा उल्लेख आहे. दगडात घडविलेल्या ह्या मंदिरात हयग्रीव माधवाची मूर्ती प्रतिष्ठित आहे. सध्याचे मंदिररूप इ.स. 1583 मध्ये राजा रघुदेव नारायण यांनी बांधले.

 

खजुराहोमधील मूर्ती

 

वैष्णव संप्रदायाकरता विशेष

वैष्णव संप्रदायातील वैखानस, श्रीवैष्णव आणि द्वैत ह्या परंपरांमध्ये हयग्रीव प्रमुख देवता आहेत. पवित्र तसेच लौकिक विषयांच्या अध्ययनाची सुरुवात करताना हयग्रीवाची प्रार्थना केली जाते. श्रावण पौर्णिमेला हयग्रीवाचा अवतारदिन मानला जातो. कर्नाटकातील उडुपी, हुबळी, धारवाड प्रांतात वैष्णव समुदायाचं वर्चस्व आहे. श्रावण पौर्णिमेला इथं नैवेद्यात पुरणासारखाच एक खास पदार्थ केला जातो. त्याचं नावही हयग्रीव आहे.

हेही वाचा – ‘ओफिओलाट्री’ सर्पपूजेच्या अभ्यासाचे शास्त्र!

बौद्ध परंपरेशी साधर्म्य

चीनी, तिबेटी आणि जपानी बौद्ध धर्मात सुध्दा हयग्रीव नावाची देवता आहेत. ह्या देवतेचा उगम भारतातील बौध्द परंपरेतील अवलोकितेश्वराचा यक्ष सहचर म्हणून झाला असे मानले जाते. मात्र तिबेटी बौद्ध धर्मात हयग्रीव अवलोकितेश्वराचे रौद्र रूप मानले जाते. वज्रयान बौद्ध धर्मातील हेरुका देवसमूहात हयग्रीव अत्यंत क्रोधित पुरुष देवता म्हणून ओळखली जाते.  आपल्या स्त्री सहचारिणी म्हणजेच वज्रवाराही (दोरजे पाग्मो) सोबत हयग्रीव अडथळे दूर करतो. बौध्द धर्मात हयग्रीवाची मूर्तीशास्त्रातील मांडणी करुणेच्या क्रोधित रूपाची प्रतिकृती आहे. इथे हयग्रीवाला तीन भेदक डोळ्यांसह रागीट चेहरा, हिरव्या रंगाचे घोड्याचे मस्तक, उंचावलेली तलवार, धाकदायक मुद्रा आणि प्रतीकात्मक अलंकार अशा वैशिष्ट्यांद्वारे चित्रित केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून
कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ