गवारीची भाजी ताटात किंवा डब्यात दिसली की तुमच्यापैकी अनेकांचं तोंड वाकडं होत असेल ना.. पण ही गवार अमेरिकेची आवडीची भाजी आहे.. म्हणूनच गवारीला अमेरिकेनं चक्क टॅरिफमधून सूट दिली आहे. पण काय वाटतं अमेरिकन लोक दाण्याचं कूट किंवा खोबरं किंवा ताकातली गवार असा आस्वाद घेत असतील… अमेरिकेने गवारीला टॅरिफमधून सूट देण्यामागचं नेमकं कारण काय, चला समजून घेऊया.
भारतातील शेतीमालाची चर्चा जगभरात होते आणि यातीलच एक महत्त्वाचं उत्पादन म्हणजे गवार. राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये पिकणारं हे पीक, आज केवळ भारतातच नाही तर जगभरात या गवारीची मागणी वाढत आहे. याच कारण आहारात नसून चक्क या गवारच्या बियांपासून गवार गम (cluster bean) तयार करतात. या गवार गमची मागणी इतकी वाढली आहे की, अमेरिकेला त्यांच्या आयात टॅरिफच्या यादीतून त्याला वगळावं लागलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अनेक वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी ते वाढवून 50 टक्के केलं. पण यामधून ‘गवार गम’ला मात्र सूट मिळाली आहे.
गवार गम नेमकं काय आहे, त्याचा वापर कुठे होतो?
गवार हे एक खरीप पीक आहे. याला कमी पाणी लागतं, म्हणून राजस्थान, हरियाणा आणि गुजरातसारख्या कोरड्या हवामानाच्या ठिकाणी याची लागवड जास्त होते. आपण गवारच्या शेंगांची भाजी खातो. पण याच शेंगांमधील बियांपासून एक खास प्रकारची पावडर तयार केली जाते, जिला ‘गवार गम’ म्हणतात. ही पावडर म्हणजे एक नैसर्गिक घटक आहे. जी कोणत्याही द्रव पदार्थाला घट्ट बनवण्यासाठी वापरली जाते. गवारगम अनेक उद्योगांमध्ये खूप महत्त्वाचा आहे.
गवार गमचा वापर कुठे होतो?
आईस्क्रीम, सॉस, सॅलड ड्रेसिंग, बेकरी उत्पादनांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी गवार गम वापरतात. औषधं, क्रीम्स आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये बाइंडिंग एजंट म्हणून याचा उपयोग होतो. कागद आणि कापड उद्योगात ही पावडर वापरली जाते. तसंच, क्रूड ऑईल आणि नैसर्गिक वायू काढण्यासाठी याचा वापर होतो.
अमेरिकेचा नाईलाज आणि गवार गमची गरज
अमेरिकेने गवार गमला टॅरिफमधून सूट देण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्यांची स्वतःची गरज. अमेरिकेत जमिनीतून तेल आणि वायू काढण्यासाठी हाइड्रॉलिक फ्रॅक्चरिंग (Hydraulic Fracturing) नावाची एक खास पद्धत वापरली जाते. या पद्धतीत, जमिनीखालील खडकांमध्ये उच्च दाबाने पाणी आणि इतर रसायनांचं मिश्रण सोडलं जातं. यामुळे खडकांना तडे जातात आणि त्यातून तेल आणि वायू बाहेर काढले जातात. हे मिश्रण घट्ट करण्यासाठी गवार गमचा वापर केला जातो. गवार गममुळे हे मिश्रण घट्ट होतं, आणि यामुळे तेलाचा प्रवाह अधिक चांगला होतो.
गवार गमशिवाय अमेरिकेतील तेल आणि वायू उद्योग व्यवस्थित चालू शकत नाहीत. त्यामुळे अमेरिकेकडे गवार गमला दुसरा कोणताही सोपा आणि स्वस्त पर्याय नाही. जर अमेरिकेने भारतातून येणाऱ्या गवार गमवर जास्त टॅरिफ लावला, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्याच तेल आणि वायू कंपन्यांवर होईल.
टॅरिफमुळे कंपन्यांना गवार गम महाग मिळेल. त्यामुळे तेल उत्पादनालाही याचा फटका बसेल. कंपन्या हा वाढलेला खर्च शेवटी त्यांच्या ग्राहकांकडून वसूल करतील. परिणामी, अमेरिकेतील लोकांना तेल आणि वायूसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे, ट्रम्प प्रशासनाला नाइलाजाने का होईना, पण गवार गमला टॅरिफमधून वगळावं लागलं.
हेही वाचा : अमेरिकेचा भारतावर 25 टक्के अतिरिक्त (दंडात्मक) टेरिफ
‘भारत’ गवार गमचा जगातील सर्वात मोठा उत्पादक
गवार गमच्या उत्पादनात भारत हा जगात सर्वात पुढे आहे. जगात एकूण गवार गमच्या जवळपास 80 टक्के उत्पादन फक्त भारतात होतं. यामध्येही, एकट्या राजस्थान राज्यातून 60 टक्के गवार पीक घेतले जातं. भारत हा गवार गमचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. यामुळे, अमेरिकेतील तेल कंपन्या गवार गमसाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. पाकिस्तानसारख्या काही देशांमध्येही गवारचं उत्पादन होतं, पण ते खूप कमी आहे.
अमेरिकेला गवार गमची गरज आहे आणि भारताचं त्यातील मोठं उत्पादन यामुळेच गवार गम हे भारतासाठी एक महत्त्वाचं निर्यात उत्पादन बनलं आहे. भविष्यातही या उत्पादनाला जगभरात मागणी वाढत राहणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक मोठी संधी आहे.