2024 मध्ये कन्नड भाषेत एक उपहास किंवा सरकाईझम असणारा ‘नाळे रजा कोळी मजा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. नावाचं भाषांतर करायचं झालं तर ‘उद्या सुट्टी, कोंबडी मजा(आनंद)’ कर्नाटकातील मँगलोर जवळच्या एका निमशहरी भागातली कथा. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, आपल्या आवडीच्या गोष्टी खाण्यापिण्याचा दिवस. तर या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी स्नेहा नावाच्या अकरा वर्षाच्या मुलीला कोंबडी हल्लीच्या भाषेत चिकन खायला खूप आवडतं. दर रविवारचं जेवण चिकन हवंच. रविवार जसजसा जवळ येतो तसं तिच्या आणि मैत्रिणीच्या गप्पांमध्ये चिकन येत राहतं. एका रविवारी त्यांना ‘गांधी जयंती’निमित्त अर्धा दिवस शाळेत जावं लागणार असतं. अर्धा दिवसच आहे ना ठिक आहे, मग नंतर तर कोळी म्हणजे कोंबडी खायला मिळणार या आनंदात दोघी मुली घरी येतात. स्नेहा शाळेतून आणि तिचे बाबा बाजारातून साधारण एकाच वेळी घरी पोहचतात. स्नेहा मोठ्या उत्साहानं त्यांच्या हातातल्या पिशव्या घेते आणि पिशव्यांमधलं सामान काढू लागते. पण हायरे! पिशव्यांमधून भाज्याच हाती लागतात. ‘कोळी इल्ले!’ आणि मग स्नेहाची तगमग सुरू होते.
स्नेहाला जशी रविवारी कोंबडी हवी तसा तिच्या बाबांना दारूचा घोट. स्नेहा कोंबडीसाठी वडिलांची दारूची बाटली कमोडमध्ये रिकामी करते. जेणेकरून वडिल दारू आणायला बाहेर पडतील आणि आपणही त्यांच्यासोबत जाऊन कोणत्या तरी चिकन सेंटरमधून कोंबडी घेऊ. स्नेहाचा प्लान यशस्वी होतो. बाप-लेक दोघंही आपली ध्येय शोधायला एकत्र बाहेर पडतात. पण ‘गांधी जयंती’मुळं कुठेच त्यांच्या गोष्टी मिळत नाहीत. एका ठिकाणी चौपट किंमतीला उपलब्ध असतं. बाबाला त्याची दारू मिळते पण स्नेहाला मात्र शेवटी हात हलवत परत यावं लागतं. मग स्नेहा जवळच्याच खेड्यात तिच्या आजोळी जायचं ठरवते. कारण मांसाहार करणाऱ्यांच्या घरी वाराच्या दिवशी पाहुणे त्यातूनही नातवंड आले तर कोंबडं कापलं जातंच. खेड्यात लोकांच्या घरीच कोंबड्या पाळतात. त्यामुळं दुकानातून घ्यायचा प्रश्न नाही. आपल्या खुराड्यातलं एखादं तयार कोंबडं सहज कापता येतं. एका नातेवाईकासोबत स्नेहा आजोळी येते. पण इथं सर्वच कोंबडे देवाच्या नावाने सोडलेले असतात. आजोबा आणि नात बरेच प्रयत्न करतात. संध्याकाळी शेवटी एक कोंबडं गावात हाती लागतं. पण जेवण वाढताना आजीच्या हातून त्यात चिमणीच्या दिव्यातलं रॉकेल पडतं.
तर बिचाऱ्या स्नेहाला एवढे उपद्व्याप करूनही गांधी जयंतीच्या दिवशी ताटापर्यंत आलेला कोंबडीचा घास मिळतच नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारमुळंही पुढे गोष्ट लांबते. स्नेहाला कोंबडी खायला मिळाली की नाही हे चित्रपटात कळेलच. पण या सिनेमाच्या निमित्तानं दिग्दर्शक अभिलाष शेट्टी यांनी कित्येक लोकांच्या मनातली खदखद समोर मांडलीय.
हा सिनेमा आठवण्याचं कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी काही दिवसांपूर्वी काढलेला आदेश. कडोंमपानं स्वातंत्र्यदिनी कोंबडी, शेळी, मेंढर कापण्याची थोडक्यात मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश काढलाय. कडोंमपासह नागपूर, अमरावती आणि मालेगाव इथेही स्वातंत्र्यदिनी मटमाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कित्येक लोकांना हा आदेश रुचलेला नाही. पण यात एक गोची अशी झालीय नेमकी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गोकुळअष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्मदिन आल्यानं याला हिंदू धर्मियांकडून फारसा विरोध होत नाहीये. त्यातूनही काही लोकांचा श्रावण म्हणजेच शाकाहार महिना सुरू आहे. पण हे दोन्ही दिवस न पाळणारेही बहुसंख्य हिंदू आहेतच की. शिवाय इतर धर्मीय लोकांचं काय? इथं धर्म हा मुद्दाच नाहीये. इथं एखाद्याला त्याच्या आवडीचं खाणं खायला अटकाव होत आहे. हिंदू खाटिक महासंघानं महापालिकेनं हा आदेश मागं न घेतल्यास स्वातंत्र्यदिनी महापालिकेसमोरचं खाटिकखाना उघडण्याचा इशारा दिला आहे.
जवळपास एका शतकाच्या लढ्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यावर आपल्याला काही मुलभूत अधिकार मिळाले आहेत. पण गेल्या काही काळापासून हे अधिकार नियंत्रित करणं किंवा हिरावून घेणं सुरू आहे. एखाद्याच्या ताटात कोणते पदार्थ असावेत किंवा व्यक्तिनं काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. चिकन-मटण खाण्यामुळं एखादी महामारी येत नाहीये किंवा कोणतीही साथ सुरू आहे आणि ते खाणं आरोग्यास अपायकारक आहे, या दोन्ही परिस्थिती नसताना प्रशासन ही बाब कशी काय ठरवू शकते? एखाद्या सणाच्या निमित्तानं, एखाद्या थोर पुरुषाच्या जयंतीनिमित्तानं असं लोकांच्या खाण्यावर बंधनं आणण्याची सरकारला काय गरज आहे? ज्याच्या त्याच्या खाण्याच्या भावना ज्यानं त्यानं आपापल्या घरात पाळण्यात कोणाला हरकत घ्यायचा काय अधिकार आहे. कल्याण महापालिकेचा आदेश तर सरळसरळ स्वातंत्र्यदिनीच एखाद्याच्या खाण्याच्या स्वातंत्र्यालाच हरताळ फासत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभागांमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळं स्थानिक लोक कित्येक वर्ष मेटाकुटीला आले आहेत. याबाबत अनेकदा आंदोलनं होतं असतात. काही भागात तर खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागतो. इथल्या रिक्षा वाहतूक, ट्राफिकची समस्या या गोष्टी तर इथल्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. कित्येक महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर काम करण्याची गरज असताना महापालिका प्रशासनाच्या सुपीक डोक्यात स्वातंत्र्यदिनी चिकन, मटण विक्री केंद्र आणि खाटीकखाने बंद ठेवण्याची कल्पना सुचली आहे.
हा प्रश्न फक्त लोकांच्या आवडीच्या आहाराबद्दलचाच नाहीये. तर या उद्योगातून उत्पन्न मिळणाऱ्या लोकांच्या रोजगाराचाही आहेच. सुट्टीचा दिवशी बरेचसे मांसाहार करणारे लोक मांसाहार करतात. फुरसतमध्ये बाजारहाट करून वेगवेगळे मांसाहारी पदार्थ करून त्यावर ताव मारून छान सुट्टी घालवावी असा अनेकांचा बेत असतो. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी मांसाची विक्री चांगल्यापैकी होते. अजूनही बहुतांश लोक कोंबडी, मटण आणि मासे ताजे आणणंच पसंत करतात. फ्रोझन किंवा आदल्या दिवशी आणून ठेवणे त्यांना पटत नाही. स्वातंत्र्यदिनी किंवा अशा कोणत्याही विशेष दिनी चिकन, मटणाची दुकानं बंद ठेवल्यास या गोष्टींची विक्री करणाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं. मुळातचं आठवड्यातले काही ठराविक दिवस यांचा व्यापार होतो आणि त्याही दिवशी अशा प्रकारची बंदी घातल्यास या समुदायाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळं प्रशासनानं मुख्य नागरी समस्या सोडवणं, लोकांना सुविधा देणं याकडं आपलं लक्ष्य केंद्रीत करावं. स्वातंत्र्यदिनी फक्त जिलेबी, फाफडा खायचा की चिकन, मटण खायचं हे लोकांना ठरवू देत.