आपण अनेकदा कपड्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने वापर करतो. पुरूषांपेक्षा स्त्रियांचे कपडे हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. साडीपासून कुर्ता, गाऊन, पंजाबी सूट आणि आता तर कॉर्ड सेट पर्यंतचे कपडे तयार केले जातात. साडीचा पुनर्वापर बऱ्यापैकी होतो. पण साडीशिवाय इतर कपडे मात्र कालांतराने फेकून दिले जातात. अशा या कपड्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात होतो. भारतात दरवर्षी सुमारे 3.9 दशलक्ष टन कापडाचा कचरा तयार होतो.
हे टाळण्यासाठी दिल्ली आयआयटीने विशेष प्रयोग केला आहे. दिल्ली आयआयटीने डेनिमच्या कपड्यापासून नवीन कापड निर्मिती केली आहे. यामुळे डेनिमसारखं कापडही पुन्हा वापरता येणं शक्य झालं आहे. आणि बरं का हा प्रयोग फक्त डेनिम पुरताच मर्यादित नाही तर याच तंत्रांने इतर वापरलेलं कापड ही पुन्हा वापरात आणता येणार आहे.
जाणून घेऊयात डेनिम आणि अन्य कापडांचा पुनर्वापर कसा करता येणार आहे?
तयार कपड्यांनाही पुनर्जीवन
जगामध्ये सध्या शाश्वतीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे जे काही निर्माण करू ते दीर्घकाळ टिकेल आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही यावर विशेष लक्ष दिलं जात आहे. यामुळे कापड उद्योगातही शाश्वत, दीर्घकाळ टिकेल असं फॅशनेबल कापड निर्माण करण्याचा प्रयत्न दिल्ली आयआयटीमधील संशोधकांनी केला आहे. याचा एक भाग म्हणून त्यांनी वापरलेल्या डेनिमच्या कचऱ्याचा पुनर्वापर करून उच्च दर्जाचं, विणलेलं कापड निर्माण करण्याची पद्धत विकसित केली आहे.
वस्त्रोद्योग आणि फायबर अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक अभिजित मजुमदार आणि प्राध्यापक बीएस बुटोला यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन केलं आहे.
कपड्यांना पुनर्जीवन आणि गुणवत्ता
जेव्हा तयार कपड्यांपासून पुन्हा नवीन कापड तयार केलं जातं तेव्हा त्यातले धागे हे कमकुवत होतात. त्यांची लांबीही कमी होते. त्यामुळे निकृष्ट दर्जाचं कापड तयार होतं. पण दिल्ली आयआयटीने या संपूर्ण प्रक्रियेचं अवलोकन करुन कापड्यातील धागे कमकुवत होऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न करत त्यांनी डेनिमची मुळ गुणवत्ता टिकवून ठेवली.
सीमलेस होल-गारमेंट तंत्रज्ञान
त्यानंतर या प्रक्रियेतून तयार केलेल्या कापडाला शिलई मशीनद्वारे कपडे शिवले जात नाहीत. तर त्यासाठी सीमलेस होल-गारमेंट तंत्रज्ञानाचा वापर केला.
सीमलेस होल-गारमेंट तंत्रज्ञान हे टेक्सटाईल क्षेत्रातलं अभिनव तंत्रज्ञान आहे. नावाप्रमाणेच या यंत्रामध्ये कपडे हे एकाच वेळी तयार होऊन येतात. जेव्हा आपण शिलाई मशीनवर कपडे शिवतो, तेव्हा कापडाचे वेगवेगळे भाग कापून ते वेगवेगळे शिवले जातात आणि मग ते एकत्र जोडले जातात. पण या सीमलेस होल-गारमेंट यंत्रांमध्ये कापड हे एका नळीमध्ये रुपांतरीत करून ते माणसाच्या त्वचेला घट्ट आणि आरामदायी बसेल अशा पद्धतीने तयार होऊन येतं. अशा पद्धतीने कपडे शिवल्यामुळे त्यातले धागे हे तुटत नाहीत. त्यांची गुणवत्ता राखण्यास मदत होते.
या पद्धतीने कपडे तयार केल्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत फरक न पडता 50 टक्क्यांपर्यंत पुनर्प्रक्रिया केलेले धागे वापरले जाऊ शकतात.
तसेच या पुनर्प्रक्रिया केलेल्या धाग्यांचा खडबडीतपणा कमी करण्यासाठी, कापडावर सॉफ्टनिंग ट्रीटमेंट केलेली आहे. त्यामुळे या कापडापासून तयार केलेले कपडे हे पूर्णत: मूळ कापडांपासूनचं तयार केले आहेत असा अनुभव येतो.
डेनिमशिवाय अन्य प्रकारच्या कापडांवरही हा प्रयोग करता येऊ शकतो असं संशोधक मुजूमदार यांनी सांगितलं आहे.
या संशोधनातून पर्यावरणाचा फायदा
या पद्धतीचा वापर करून डेनिम कचऱ्याचा पुनर्वापर केला तर हरितगृह वायू उत्सर्जन, आम्ल पाऊस (अॅसिड रेन) आणि जीवाश्म इंधनाचा ऱ्हास 30 ते 40 टक्के कमी होतो. ओझोन थराचा ऱ्हास 60 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो.
याशिवाय या तंत्रांमुळे नवीन कापसावरील अवलंबित्व कमी होते. जगाची वाढती लोकसंख्या पाहता कापड निर्मितीसाठी प्रचंड कापूस उत्पादन केलं जातं. या कापसांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असताना कीटकनाशके, खते आणि पाण्याचा जास्त वापर केला जातो. या सगळ्यामुळे जागतिक तापमान वाढीत 24 टक्क्याची भर पडते.
पण जर एकदा तयार केलेल्या कापडापासून पुन्हा नवीन कापड तयार करुन त्याचा पुनर्वापर करत राहिलो तर कापसांचं अतिरिक्त उत्पादन घेण्याची गरज कुठेतरी काही प्रमाणात का होईना कमी होईल. आणि याचा थेट परिणाम हा पर्यावरण वाचवण्यासाठी होईल.