आंघोळ न करण्याची दहा कारणं लहानपणी किती जणांनी तरी दिली असतील. ‘आंघोळीची गोळी’ तर किती ठिकाणी शोधून, सांगून झाली असेल. सुट्टीच्या दिवशी तर मोठ्यांनाही आंघोळीला जायचा कंटाळा येतो ना.. रोज रोज काय आंघोळ करायची, असा आंघोळीचा कंटाळा काही जणांना रोजही येत असतो की नाही.. कपडे आणि भांडी धुवायला जशा मशीन आल्या आहेत. तसंच माणसाच्या आंघोळीचंही मशीन आलं तर असं आपण गंमतीनं अनेकदा म्हणतो. पण ही गंमत आता प्रत्यक्षात आली आहे. जपानमधील संशोधकांनी एआयवर आधारीत हे आंघोळीचं मशीन तयार केलं आहे.
मिराई निंगेन सेंताकुकी
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्याचं एक प्रोग्रामिंग सेट केलेलं असतं. यात कोणत्या प्रकारचे कपडे आहेत, मग किती वेळ धुवायचे आणि त्या वेळेचा पर्याय निवडणं त्यानंतर ते वाळून हवे असतील तर तोही पर्याय निवडून कपडे धुण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होते. जसं कपडे धुण्याचं हे मशीन आहे, तसं माणसाला धुण्यासाठीही जपानने मशीन तयार केली आहे. या मशीनचं जपानी भाषेतलं नाव ‘मिराई निंगेन सेंताकुकी’ असं आहे. याचा अर्थ मानवी वॉशिंग मशीन. ओसाका सायन्स कंपनीने ही मशीन तयार केली आहे.
ही मशीन कसं काम करते?
ही ‘मानवी वॉशिंग मशीन’ एका कॅप्सूलसारखी दिसते. ती पारदर्शक असते. त्यामध्ये माणसाला बसता येईल अशा पद्धतीची व्यवस्था केलेली असते. अंघोळ करु इच्छिणाऱ्या व्यक्तिला त्यामध्ये जाऊन दिलेल्या जागेवर बसायचं आहे. या सीटला लावलेले सेन्सर माणसाच्या नाडीचं परिक्षण करते. त्याच्या शरीराचं तापमान तपासून त्यानुसार त्या कॅप्सूलमध्ये गरम पाणी भरायला सुरूवात करतं. त्या माणसाचं अर्ध अंग भिजेल इतकं पाणी त्या कॅप्सूलमध्ये भरलं जातं. त्यानंतर, मशीन सुरू होते आणि विशेष असे मायक्रो एअर बबल्स येऊन माणसाच्या त्वचेतील घाण काढून टाकतात. हे मशीन शरीरातील इलेक्ट्रोड्स तपासून त्यानुसार पाण्याचं तापमान नियंत्रित करते. त्यामुळे शरीरातली संपूर्ण घाण निघून जाते, असा दावा ओसाका कंपनीने केला आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागतो. या 15 मिनिटांत ही मशीन तुमचं अगं फक्त धुवून नाही तर सुकवूनही देते.
शारीरिक स्वच्छतेसह मानसिक शांती
ओसाका कंपनीने असाही दावा केला आहे की, या मशीनमध्ये असलेले एआय सेन्सर हे माणसाच्या मानसिकतेचा ठाव घेतात. आणि त्या मानसिक स्थितीशी सुसंगत असे फोटो दाखवून त्यांच्या मनाला शांत करत असते. यातून अंघोळीसह त्या व्यक्तिला एक मानसिक शांतीही मिळते. त्यामुळे ही मशीन स्वच्छतेसह एक सुखद अनुभव देते असा दावा कंपनीने केला आहे.
मानवी वॉशिंग मशीनची संकल्पना जुनी
1970 साली जपानच्या वर्ल्ड एक्स्पोझिशनमध्ये या स्वरुपाचं एक मशीन प्रदर्शनासाठी ठेवलं गेलं होतं. हे मशीन सान्यो इलेक्ट्रिक कंपनी म्हणजे सध्याच्या पॅनसोनिक होल्डिंग्ज कॉर्प.चं होतं. ती कंपनी अल्ट्रासोनिक बाथ कंपनी होती. यामध्ये शरीराच्या मालिशसाठी अल्ट्रासाऊंड लाटा आणि प्लास्टिक बॉल वापरणारे एक उपकरण होतं. यातूनच प्रेरणा घेत ओयामा यांनी हे ह्युमन वॉशिंग मशिन निर्माण केली आहे.