पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी आणि अन्य जीवसृष्टीच्या वजनापेक्षा मानव निर्मित वस्तूंच्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पृथ्वीवरील इमारती, कार आणि इतर साहित्यांचं वजन हे 2040 पर्यंत तीनपटीने वाढण्याची शक्यता आहे.
पृथ्वीवर दरवर्षी 30 गीगाटन वजन वाढतेय
2020 साली पृथ्वीवर निर्माण केलेल्या इमारती, प्लास्टिक आणि धातूमय वस्तूंचं वजन हे पृथ्वीवरच्या इतर सर्व सजीवांच्या एकत्रित वजनापेक्षा जास्त होतं.
1900 सालापासून दर 20 वर्षांनी हे मानवनिर्मित वस्तूंचं वजन दुप्पटीने वाढत असायचं. मात्र, आता हेच वजन दरवर्षी 30 गीगाटनने वाढत आहे. म्हणजे दर आठवड्याला एका व्यक्तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाची निर्मिती ही होत असते.
जागतिक बायोमास (पृथ्वीवर राहणारे सजीव) पैकी 90 टक्के वनस्पतीजन्य पदार्थ आहेत. यामध्ये माननिर्मित वस्तूच्या वजनात वाढ होत आहे तर निसर्गनिर्मित वनस्पतीच्या वजनात घट होत आहे. पृथ्वीवरील शेती क्षेत्र, जंगल क्षेत्रामध्ये घट होत आहे. जंगलतोड आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जमिनीचा वापर केला जात असल्यामुळे हे वनस्पती क्षेत्र कमी होत आहे. काँक्रीटचं जंगल उभं करण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. परिणामी पृथ्वीवर झाडांपेक्षा अशाच सगळ्या वस्तूचं वजन अवाजवी पद्धतीने वाढत आहे.
प्लास्टिकचं वजन सर्वाधिक
पृथ्वीवर जास्त भार हा इमारती आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण तसं नाहीये. पृथ्वीवर सर्वाधिक जास्त भार आहे तो प्लास्टिक पासून निर्माण केलेल्या वस्तूंचा. या प्लास्टिक निर्मित वस्तूंंचं वजन हे सर्व जमिनीवर राहणाऱ्या आणि समुद्री जीवांच्या वजनापेक्षा जास्त आहे.
निसर्गनिर्मितीपेक्षा भौतिक युग
या अभ्यासाचे लेखक या युगाचं किंवा या स्थितीचं वर्णन “एन्थ्रोपोसीन” असा करतात. एन्थ्रोपोसीन म्हणजे मानवी युग. किंवा मानवामुळे होणारे भूवैज्ञानिक बदल यालाही एन्थ्रोपोसीन असं म्हणतात. थोडक्यात माणसांच्या विविध कृत्यांमुळे पृथ्वीच्या भूविज्ञान आणि परिसंस्थेमध्ये बदल होतात त्याचं वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. यातून एक नवीन भूवैज्ञानिक कालखंड सुरू झाला आहे, असं समजलं जातं.
या बदलामध्ये निसर्गनिर्मित सजीव टिकवून ठेवण्याऐवजी भौतिक वस्तूंचं निर्माण करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे 2040 पर्यंत या मानवनिर्मित बायोमास पातळीत तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय घटकांवर खोलवर परिणाम होतील.