विकास साधताना पर्यावरणपूरक गोष्टींच्या वापराला प्राधान्य देलं पाहिजे, असं मत सगळ्याच व्यासपीठांवरून आता व्यक्त केलं जातं आहे. हवामान बदल, पूरपरिस्थिती, भूस्खलन, पृथ्वीवरचा प्लास्टिकचा वाढता वेढा अशा अनेक समस्यांना आज जग सामोरे जात आहे. पृथ्वीचा नाश होऊ नये, पर्यावरणाची काळजी घ्यावी यासाठी जागतिक पातळीवरील विविध व्यासपीठांवर विशेष काळजी घेतली जात आहे.
भारत सरकारकडूनही हवामान बदलांचा परिणाम ध्यानात घेऊन ‘मिशन लाईफ’ चळवळ राबवली जात आहे. ही जागतिक स्तरावरची चळवळ आहे. या चळवळी अंतर्गत पर्यावरणापूरक जीवन जगणाऱ्या व्यक्तींना केंद्र सरकार ‘प्रो प्लॅनेट पीपल’ असं संबोधते.
याअंतर्गतच तुम्ही तुमच्या दररोजच्या सवयींमध्ये कोणते आमुलाग्र बदल करून ‘प्रो प्लॅनेट पीपल’ होऊ शकता हे जाणून घेऊयात.
‘मिशन लाईफ’ मागचा सरकारचा उद्देश
केंद्र सरकार मिशन लाईफ या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक, निसर्गाशी सुसंगत अशी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करते. दैनंदिन जीवनातून या छोट्या छोट्या सवयींचं पालन करणाऱ्या नागरिकांना ‘प्रो प्लॅनेट पीपल’ म्हणून ओळखलं जातं.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार जगातल्या 8 अब्ज लोकांपैकी 1 अब्ज लोकांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या तरी, जगातील कार्बन उत्सर्जनामध्ये 20 टक्के घट होऊ शकते.
2020 सालच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या द नेक्स्ट फ्रंटिअर : ह्यूमन डेव्हलपमेंट अँड द एन्थ्रोपोसीन’ मध्ये म्हटलं आहे की, माणसांनी पृथ्वीवर पूर्वीपेक्षा जास्त ताबा मिळवलेला आहे. कोविड – 19 नंतर तर तापमानात झालेली वाढ, प्रगतीच्या वेगातील असमानता अशा सगळ्याच गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे माणसांना विकासाची नेमकी व्याख्या काही यावर पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. प्रगती साधत असताना कार्बन उत्सर्जनाच्या माध्यमातून मनुष्य पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत. निसर्गाच्या बेजबाबदार वापराचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत.”
जगात भारताने सुरू केली ‘मिशन लाईफ’ मोहिम
ग्लासगो इथे दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या हवामान बदल परिषदेच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज26 (COP26) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन लाईफ’ या मोहिमेचा उल्लेख केला होता. पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी निसर्गाचा अविचारी आणि विनाशी वापर न करता जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक वापर केला जावा यासाठी ही व्यापक जनचळवळ सुरू केली. माणसांना निसर्गाशी सुसंगत असणारी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन करणारी ही चळवळ आहे.
भारतात राबवले गेलेले सामुहिक कार्यक्रम
भारतात मिशन लाईफ या जागतिक चळवळी अंतर्गत काही विशेष सामुहिक उपक्रमही राबवले गेले आहेत. हे उपक्रम पुढीलप्रमाणे –
स्वच्छ सागर सुरक्षित सागर –
स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमांतर्गत 75 दिवसांमध्ये 75 समुद्रकिनाऱ्यावरील जवळपास 15 हजार टन कचरा गोळा करुन किनारपट्टी स्वच्छता केली होती.
या उपक्रमा नंतरही विविध महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थाकडून वारंवार समुद्र किनारे स्वच्छतेच्या मोहिमा आयोजित केल्या जातात.
स्वच्छ भारत मिशन –
स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये भारतातल्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 7 वर्षात 100 लाख शौचालयांची बांधणी केली. यामुळे उघड्यावरील शौचं करण्याची पद्धत बंद झाली. यामुळं अनेक गावे पूर्णपणे हागणदारमुक्त झालेली आहेत.
उज्ज्वला योजना –
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये ग्रामीण भागातील कुटुंबाना एलपीजी गॅसचं कनेक्शन पुरविण्यात आलं. 2015 ते 2021 या कालावधीत 99.8 टक्के कुटुंबाना स्वयंपाकासाठी एलपीजीची जोडणी करून दिली.
प्रो प्लॅनेट पीपलसाठी दैनंदिन बदल घडवणाऱ्या टिप्स
- एसीचं तापमान 24 अंशावर ठेवावं.
- आरओ / एसीचं वाया जाणारं पाणी भांडी धुण्यासाठी आणि झाडांना घालण्यासाठी वापरावं.
- पेन ड्राइव्हऐवजी क्लाऊड स्टोरेजचा वापर करावा.
- बांबू ब्रश आणि लाकडी कंगव्याचा वापर करावा.
- स्थानिक आणि मौसमी अन्नपदार्थ खाण्यावर भर द्यावा.
- ओला व सुका कचरा वेगळा करावा.
- घरात तुळस, गुळवेल आणि पुदिना कढीपत्ता यासारखी औषधी झाडं लावावीत.
- गिअर बदलत असताना क्लचवर पाय ठेवू नका.
- ट्रेडमिल ऐवजी मोकळ्या मैदानावर, बागेत धावायला, चालायला जावं.
- स्टील किंवा रिसायकल प्लास्टिकचे डब्बे आणि बॉटल वापरा.
- न वापरलेल्या कच्च्या भाज्या जनावरांना खाऊ घाला.
- एलईडी बल्ब-ट्युबलाईटचा वापर करावा.
- इलेक्ट्रोनिक डिव्हाईस खराब झाल्यावर लगेच फेकून देण्याऐवजी दुरूस्त करून वापरण्याचा प्रयत्न करावा.
असे आरोग्य, खाद्यपदार्थ, शेती, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रासंबंधीत पर्यावरणपूरक बदल काय घडवू शकतो हे https://www.niti.gov.in/sites/default/files/2022-11/Mission_LiFE_Brochure.pdf यामध्ये दिलेले आहेत.