आपण कोणत्या प्रकारची भांडी वापरतो त्यावरून आपले अन्न खरोखर किती आरोग्यदायी आहे किंवा किती हानिकारक आहे हे ठरवता येते. पिढ्यानपिढ्या, भारतीय स्वयंपाकघरांमध्ये मातीची भांडी, पितळ किंवा तांबे ही पारंपारिक भांडी वापरली जात आहेत. आणि या धातूचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज मोठ्या प्रमाणात आधुनिक साहित्यांचा वापर सर्वच क्षेत्रात होतो. साहजिकच स्वयंपाकघरही त्याला अपवाद नाही. पण बाजारात असलेली स्वयंपाकघरात वापरायची सर्वच भांडी आरोग्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत.
भारतीय कंपनी सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांवर युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने चिंता व्यक्त केली आहे. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये असुरक्षित प्रमाणात शिसे आहे. हा धातू आरोग्यावर गंभीर परिणाम करतो.
तर, शिसे ही इतकी मोठी चिंता का आहे? कोणत्या प्रकारच्या स्वयंपाकाच्या भांड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे? आणि USFDA नेमके काय शिफारस करते? चला समजून घेऊयात.
‘शुद्ध अॅल्युमिनियम भांडी’ म्हणून विकल्या जाणाऱ्या आणि टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना USFDA ने अन्न साठवणूक आणि स्वयंपाकात वापरण्यासाठी असुरक्षित मानले आहे.
अमेरिकन आरोग्य नियामकाने इंडॅलियम/इंडोलिअम किंवा हिंडॅलियम/हिंडोलिअम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पितळ, अॅल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम मिश्रधातूंपासून बनवलेल्या काही आयात केलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांची देखील चाचणी केली. त्यात धोकादायकपणे उच्च पातळीचे शिसे आढळले आहे.
अमेरिकेनं आरोग्य नियामकाच्या मते, “शुद्ध अॅल्युमिनियम भांडी” म्हणून विकल्या जाणाऱ्या आणि टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना अन्न साठवणूक आणि स्वयंपाकात वापरण्यासाठी असुरक्षित मानले गेले.
या भांड्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन, अमेरिकन एजन्सीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, “किरकोळ विक्रेत्यांनी या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि ग्राहकांनी ही भांडी स्वयंपाक किंवा अन्न साठवणूक करण्यासाठी वापरू नये.”
शिशाचा संपर्क हानिकारक का आहे?
शिशे हा एक विषारी जड धातू आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते शिशाचा कोणत्याही प्रकारचा संपर्क सुरक्षित नाही. अगदी कमी प्रमाणात जर नियमितपणे सेवन केले तर, ते शरीरात जमा होऊ शकते आणि दीर्घकालीन नुकसान करू शकते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये शिशाचे प्रमाण अनेकदा 100 भाग प्रति दशलक्ष (ppm) पेक्षा जास्त होते. बऱ्याचदा जेव्हा शिशे असणाऱ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते किंवा साठवले जाते, तेव्हा या भांड्यांमधून शिफारस केलेल्या आहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात शिश उत्सर्जित होते.
शिशाने दूषित अन्न खाल्ल्याने कालांतराने रक्तातील शिशाचे प्रमाण वाढू शकते. लहान मुलांच्या शरीराचा आकार लहान असतो. त्यांच्यात जलद चयापचय आणि जलद वाढ होते. यामुळे मुले आणि विशेषतः बाळे असुरक्षित असतात. कमी पातळीवर देखील शिशाशी संपर्क झाल्यास त्यांच्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, शिकण्यात अडचणी, कमी बुद्ध्यांक आणि वर्तनातील बदल. गर्भवती महिला आणि गर्भांना देखील शिसे धातूचा जास्त धोका असतो.
शिसे केवळ मेंदू आणि मज्जासंस्थेलाच हानी पोहोचवत नाही तर ते रक्त, मूत्रपिंड आणि हृदयावरही परिणाम करते. त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास ते मूत्रपिंडाच्या ऊतींमध्ये साचू शकते. यामुळे मूत्रपिंडांची रक्त शुद्ध करण्याची क्षमता बिघडू शकते. यामुळे शेवटी दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार (CKD) आणि कायमचे नुकसान देखील होऊ शकते.
शिशाचे रक्तातील प्रमाण वाढल्यास लोकांना थकवा, डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या किंवा न्यूरोलॉजिकल बदलांचा अनुभव येऊ शकतो. मुलांमध्ये, बहुतेकदा विकासात्मक विलंब, स्मरणशक्ती समस्या आणि कमी एकाग्रता या गोष्टी दिसून येतात.
USFDA काय शिफारस करते?
USFDA ने ग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीतील कोणतेही स्वयंपाकाचे भांडे ग्राहकांकडे आहेत का ते काळजीपूर्वक तपासावे. जर त्यांच्याकडे असतील तर ते ताबडतोब टाकून द्यावेत. या भांड्याचे दान, विक्री किंवा नूतनीकरण करू नये.
ज्यांना रक्तातील शिशाचे प्रमाण वाढल्याचा संशय आहे त्यांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किरकोळ विक्रेते आणि वितरकांना, शिशाचा समावेश असणाऱ्या उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश एजन्सीने दिले आहेत. सुरक्षित कुकवेअर पद्धतींबद्दल मार्गदर्शनासाठी त्यांना USFDA शी संपर्क साधण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे.
जनतेच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी, USFDA अजूनही अन्न आणि स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये शिशाच्या पातळीवर लक्ष ठेवून आहे.
भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या आयसीएमआरने मातीच्या भांड्यांना मान्यता दिली होती. मातीच्या भांड्याना त्यांनी ‘सर्वात सुरक्षित’ भांड्यांपैकी एक म्हटले होते. यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी कमी तेल लागतेच शिवाय उष्णतेच्या समान वितरणामुळे ते अन्नाचे पौष्टिक संतुलन देखील मोठ्या प्रमाणात राखतात.