पूर्वीच्या काळी ज्ञानाचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत करण्यासाठी सुभाषितं किंवा वचनं पुढच्या पाठ करून पुढच्या पिढयांपर्यंत पोहचवली जात असतं. प्रवचन, कीर्तन, पोवाडा यांचा उपयोग इतिहास किंवा महिमा पसरवण्याकरता केला जायचा. हा सगळा ठेवा जतन करण्यासाठी महापुरूषांची वचने, त्यांनी दिलेला उपदेश, सामाजिक संदेश,वास्तूनिर्मितीची माहिती, युद्धकथा, विजय हे सर्व शिलालेख, ताम्रपट याच्या रुपात जतन करायला सुरूवात झाली. पुढे कागद निर्मिती झाली आणि हस्तलिखितं तयार होऊ लागली.
विशिष्ट शाईनं अनेक पुस्तकं लिहून त्यांच्या प्रती निर्माण केल्या जायच्या. पण या पुस्तकांच्या वा माहितीच्या खूप साऱ्या प्रती निर्माण करणं शक्य नव्हतं. म्हणून ज्ञान प्रसाराला मर्यादा यायच्या. पण प्रिटिंगचा शोध लागला आणि ही अनेक प्रती एकाच वेळी प्रकाशित करणं शक्य झालं. पण हे सारं करताना एका कागदावर मजकूर लिहिणं आणि मग ते छापण्यासाठी दिलं जायचं. कालांतराने टाईप रायटर आले पण याचा हाताने लिहिण्याच्या क्रियेवर फारसा काही त्याचा परिणाम झाला नाही. टाईप रायटरनंतर आलेल्या संगणक आणि स्मार्ट मोबाईल डिव्हाईसचा मात्र खूप नकारात्मक परिणाम हाताने लिहिण्याच्या क्रियेवर होऊ लागला.
टाईपिंग, टॅपिंग आणि आता आलेल्या एआय तंत्रज्ञानामुळे तर पेन, पेन्सिल आणि प्रिंट हे शब्दच जणू आपल्या शब्दकोशातून विस्मरणात जात आहे. या शब्दांसोबतच घरातून बाहेर पडताना खिशात वा बॅगेत पेन ठेवणं, घरात निदान एक पेन – पेन्सिल असणं या सवयी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिहिण्याची सवय नामशेष होत आहे.
हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत असतो. मोटर स्किल्स सुधारत असतात, मनातले विचार, मेंदू आणि हात यांच्या हालचालीतला समन्वय विकसीत होत असतात. मात्र, कीबोर्डच्या प्रभावामुळे या कौशल्याचा विकास होण्याचा मार्ग खुंटत आहे. पण बाजारात नव्याने ब्लू बुक्सचा ट्रेंड आल्यामुळे हाताने लिहिण्याची सवय पुनर्जिवित होण्याची आशा आहे.
हाताने लिहिण्याची सवय का कमी होत आहे?
टाईपिंग आणि टॅपिंग या दोन तंत्रज्ञान शोधामुळे लिहिण्याच्या क्रियेवर पहिला परिणाम झाला. घराघरात संगणक आणि मोबाईल पोहोचल्यावर लिहिण्याची क्रिया कमी होऊ लागली. कागद पेन घेऊन लिहिण्याऐवजी कीबोर्डवर टाइप करण्यावर भर दिला गेला.
कामाच्या ठिकाणी डिजिटलायझेनमुळे लिहिण्याची पद्धत कमी होत गेली. मात्र, अनेक शाळेमध्येही मुलांना छापिल स्वरुपातील अभ्याससाहित्य पुरवलं जातं. तिथेही लिहिण्याऐवजी टॅब वापरले जातात. त्यावर मुलांनी टाईप करावं अशी शिकण्याची पद्धत वापरली जात आहे. त्यामुळे शाळेतून, कॉलेजमधून बाहेर पडल्यावर लिहिण्याची जी सवय कमी कमी होत जायची, ती आता काही शाळेपासूनच लिहिण्याची सवय बंद केली जात आहे.
त्यातही एआयचा आविष्कार झाल्यापासून काय लिहायचं याचाही विचार करावा लागत नाही. फक्त आपल्याला नेमकं काय हवं आहे हे माहीत हवं. जे हवंय त्याला साजेसे तीन चार शब्द कीवर्ड एआयला दिले की, सगळा मजकूरचं तयार स्वरुपात आपल्याला मिळतो. यामुळे तर लिहिण्याच्या सवयीसह विचार करण्याची सवय ही बंद होत चालली आहे.
हाताने लिहिण्याची सवय का महत्त्वाची आहे?
हाताने लिहिणे ही केवळ एक क्रिया नाही. जेव्हा आपण हाताने काही लिहत असतो तेव्हा ते लिहून पूर्ण झाल्यावर एकवार आपण ते वाचून काढतो. त्यामुळे वाचन होतं. आपण ते आपल्या हाताने लिहिल्यामुळे तो मजकूर आपल्या लक्षात राहतो, साक्षरतेचा विकास होतो. जेव्हा आपण एखादा मजकूर लिहून काढतो तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. त्याशिवाय टाईपिंगपेक्षा हाताने लिहत असताना आपल्या मेंदूतील वेगवेगळे भाग अधिक चांगल्यारितीने काम करायला लागतात.
‘मोटार’ कौशल्यांचा विकास
मुळात ‘मोटार’ कौशल्य म्हणजे एखादं काम करण्यासाठी सांधे आणि शरीराच्या भागांच्या हालचालींवर स्वेच्छेने नियंत्रण आवश्यक असणं. जसं की सायकल चालवणे, चालणे, सर्फिंग करणे, उडी मारणे, धावणे आणि वेटलिफ्टिंग.
2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये नमूद केलं आहे की, जी मुलं जास्त वेळ मोबाईल वा अन्य डिव्हाईसवर घालवतात अशा मुलांंचं ‘मोटार’ कौशल्य खूप कमी प्रमाणात विकसीत होतं.
जेव्हा आपण हातात पेन-पेन्सिल घेऊन लिहत असतो तेव्हा आपल्या मेंदूचा, विचार करण्याच्या प्रक्रियेचा आणि हातांचा योग्यप्रकारे समन्वय साधला जातो. आपल्या विचार करण्याचा वेग आणि हाताने लिहिण्याचा वेग नियंत्रित राहतो. त्यामुळे कितीही कठीण समस्या सोडवायची असते, तेव्हा ती कागदावर उतरवत जातो. त्यावर आपला मेंदू वेगाने विचार करु लागतो आणि आपल्याला समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू लागतो.
सुबक अक्षर विचाराचं प्रतिक
देवनागरी लिखाणात समानता आहे. मात्र इंग्रजी भाषेमध्ये साधी लिखाण पद्धत आणि कर्सिव्ह अशा दोन पद्धती आहेत. कॅलिग्राफी ही देखिल लिखाणाची पद्धत असली तरी ती एक आर्ट म्हणून वापरली जाते. काही शाळांमध्ये साधी लिखाण पद्धत प्रमाण मानली जाते तर काही शाळांमध्ये कर्सिव्ह लिखाण पद्धत सक्तीची केली जाते. यावरुनही काही वर्षांपूर्वी वाद सुरू होते. कोणत्याही पद्धतीत लिहिलं तरी एकूणच लिहिण्यामुळे जे परिणाम होतात ते सारखेच असतात. त्यामुळे कोणत्या पद्धतीत लिहतो याचा काही फरक पडत नाही.
मात्र, अलीकडे लिहणंच कमी केलं जात आहे. आणि हे धोकादायक आहे. जेव्हा आपण सुबक अक्षरात विचारपूर्वक लिहत असतो, तेव्हा आपल्या मनातले विचार त्यातून प्रतिबिंबित होत असतात. चांगल्या अक्षरातलं लिखाण हे वाचण्यास प्रवृत्त करतात. आजही इंजिनियरींग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितीय क्षेत्रातील लोक हे त्या त्या क्षेत्रासंबंधित समस्या सोडवताना किंवा माहिती घेण्यासाठी कागद पेनचा वापर करतात.
कॅरेक्टर ॲमनेशिया
कॅरेक्टर ॲमनेशिया हा एक आजार आहे. यामध्ये लोकांना भाषा माहीत असते. ते ती भाषा, अक्षरं बोलत असतात मात्र, ती त्यांना लिहिता येत नाही. हे बहुतांशवेळी लोगोग्राफी लिपीमध्ये होत आहे. जसं की, चायनिज, जापनीज लिखित भाषेमध्ये होत आहे. 2021 च्या अभ्यासानुसार, चायनामधील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 42 टक्के चायनीज अक्षर लिहायची कशी याचा विसर पडल्याचं समोर आलं आहे. मोबाईल, संगणकावरील कीबोर्डचा अतीवापर करत असल्यामुळे प्रत्यक्षात अक्षर लिहिण्याची सवय पूर्णत: सुटलेली आहे.
ब्लु बुक्समुळे लिहिण्याची सवय परतेल याची आशा
एआयचा वाढता वापर पाहून आता पुन्हा एकदा लिखाण कौशल्याकडे लक्ष द्यायला काही प्रमाणात सुरुवात होत आहे. पण तरीही काहिही मजकूर हवा असेल तर लगेच चॅटजीपीटीवर प्रश्न टाकून उत्तर, माहिती मिळवली जाते. तर काही ठिकाणी पर्याय निवडा, ऑबजेक्टिव्ह स्वरुपात परिक्षा घेतल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना किती समजलं आहे, त्यांचे विचार काय आहेत याची काहिच माहिती शिक्षकांना मिळत नाही. याची जाणीव झाल्यावर आता पुन्हा एकदा लिखित स्वरुपात परिक्षा घेण्याचा कल सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा लिहिण्याची सवय लागून पारंपरिक पद्धत पुन्हा येण्याची आशा पल्लवित झाली आहे.