घराघरात चैतन्य, प्रसन्नता आणि आनंदी वातावरण निर्माण करणारा आपला लाडका बाप्पा आपल्या घरात विराजमान होणार आहे. आरास आणि सजावटीची धावपळ सुरू असेल. बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. यासाठीचा मुहूर्त, पूजा विधी करण्याची पद्धत आणि गणेश चतुर्थीसाठी घरात बाप्पाची कोणत्या पद्धतीची मूर्ती आणायची हे आज आपण पाहणार आहोत.
गणेश चतुर्थीला कोणती गणेशमूर्ती चांगली आहे?
गणेश चतुर्थीला आपण आपल्या आवडीनुसार गणेश मूर्ती आणत असतो. काही जणांच्या घरात दरवर्षी एकाच पद्धतीची, रंगाची मूर्ती आणली जाते. तर काही जणांच्या घरात दरवर्षी वेगवेगळ्या आकारातली मूर्ती आणण्याचा कल असतो. त्यातही आता प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीऐवजी पर्यावरण पूरक अशी शाडूची मूर्ती आणण्यावर भर दिला जातो. मूर्ती ही कोणत्याही मातीने तयार केलेली असली तरीही त्याचं रुप, रंग हा उचित असला पाहिजे.
पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती ही शांतता आणि समृद्धीचं प्रतीक असते. त्यामुळे गणेश चतुर्थीला पांढऱ्या रंगाची बसलेल्या स्थितीतली (ललितासन) गणेश मूर्ती आणि डावीकडे सोंड असणारी मूर्ती समृद्धीसाठी योग्य मानली जाते. उत्सवासाठी आणलेल्या गणपतीचं विसर्जन कुटुंबाच्या ठरलेल्या दिवसांनुसार दीड, तीन किंवा 10 दिवसांनी केलं जातं.
चिकणमाती, सेंद्रिय माती, बिया आणि नैसर्गिक रंगांनी, हळदीने तयार केलेली पर्यावरणपूरक मूर्ती निवडल्याने निसर्गाला नुकसान होत नाही. त्यामुळे शक्यतो अशा प्रकारची मूर्ती निवडण्याचं आवाहन गणेश भक्तांना करतो.
प्राणप्रतिष्ठा कधी करावी ?
हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01 वाजून 54 मिनिटांनी सुरू होणार आहे. ही तिथी 27 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 44 मिनिटापर्यंत असणार आहे. हिंदू परंपरेनुसार उदयाची तिथी महत्वाची मानली जाते. त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025, बुधवारी साजरी केली जाणार आहे.
त्यानुसार, सकाळी 11वाजून 23 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनीटे असा 2 तास 31 मिनिटाचा अवधी प्रतिष्ठापनेसाठी योग्य आहे. तर विसर्जन हे दहा दिवसानंतर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी 5 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या वेळी गणपतीची पूजा कशी करावी?
गणेशमूर्ती उत्तर, उत्तर-पूर्व, पूर्व किंवा पश्चिम दिशेला, उंच ठिकाणी ठेवावी.
पूजेची जागा ही स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवावी.
पितळेच्या तेलाचा दिवा आणि उदबत्ती गणेश मूर्तीजवळ ठेवावी.
पूजेच्या ताटामध्ये फुले, तांदूळ, तूप, आणि कुंकू सोबतच गणपतीचं आवडतं फूल लाल जास्वंद असावं.
गणेशमूर्तीला चंदन आणि कुंकवाचा टीळा लावून, गळ्यात फुलांची माळ आणि दुर्वांचा हार घालावा आणि गणेश मंत्र जपावा.
पूजा पूर्ण झाल्यावर गणेशाच्या चरणी लाडू आणि मोदक अर्पण करावा.
गणेशमूर्ती घराबाहेर ठेवता येईल का?
गणेशमूर्ती ही घरात शांतता, स्थैर्य, सुख-समृद्धी साकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवसातही गणेश प्रतिष्ठापना ही घरात केली पाहिजे. घरात मूर्ती ठेवताना ती संपूर्ण घराच्या बाजूला पाठ असेल अशी ठेवू नये. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर किंवा घराकडे पाठ करुन मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं. कारण गणपती बाप्पा आपल्या पाठीवर गरिबी, तणाव, पीडा असा सगळा भार घेऊन असतो. या तर्काने आपल्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती ही घरात पाठ दाखवणारी नसून, घरात पाहत असणारी असावी.