डोळे बंद करून जेव्हा आपण गणेशांचं चित्र नजरेसमोर आणायचा प्रयत्न करतो तेव्हा गळ्यात दुर्वांचा हार, हातात लाल जास्वदाचं फुल, पायाशी उंदीरमामा आणि समोर मोदकाचं भरलेलं ताट हमखास दिसतं.
मात्र, गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं का इतर फुलं का वाहिली जात नाहीत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत.
दुर्वांच्या मागची कथा
गणपती बाप्पाच्या गळ्यात 21 दुर्वांच्या जुड्या असलेला हार आणि त्याच्या माथ्यावरही दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. दुर्वा हे एक प्रकारचं गवत असतं. त्यामुळे बाप्पाला हे गवत का अर्पण केलं जातं यामागे एक आख्यायिका आहे.
ऋषी मूनी आणि देवतांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरूवात केली होती. अनल म्हणजे अग्नी. देवतांनी गणेशाकडे त्यांचा बचाव करण्याची विनंती केली. त्यामुळे गणपतीने अनलासूराला गिळून टाकलं. यामुळे गणेशाच्या पोटात फार जळजळ होऊ लागली. खूप उपाय केले पण ही जळजळ थांबतच नव्हती. तेव्हा तिथं उपस्थित ऋषी आणि मुनींनी प्रत्येकी 21 हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी 21 जुड्या गणेशाला खायला दिल्या. या दुर्वांमुळे गणपतीच्या पोटातली जळजळ थांबली. त्यावेळी गणपती बाप्पांनी म्हटलं की, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल. त्यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
गणपती बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा या कोवळ्या असल्या पाहिजेत. त्यांना ‘बालतृणम्’ असं म्हटलं जातं. या दुर्वांच्या पाती या एकाच फुटव्यातून निघालेल्या तीन अशा विषम संख्येत असल्या पाहिजेत. या दुर्वांच्या 21 जुड्या करून त्या गणपती बाप्पाच्या मस्तकावर किंवा चरणी अर्पण केल्या जातात.
दुर्वाचे औषधी गुणधर्म
ही दुर्वा केवळ कथेपुरता मर्यादित नाही. कथेत सांगितल्याप्रमाणे दुर्वा खाल्याने गणपतीच्या पोटातली जळजळ थांबली. कारण या दुर्वामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
आयुर्वेदामध्ये दुर्वांला ‘औषधाची खाण’ म्हणून महत्त्व दिलेलं आहे. दुर्वाच्या गवतावर अनवाणी पायाने चालल्यावर आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो, मायग्रेनचा त्रास दूर होतो, ताणतणाव कमी होतो, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच पोटासंबंधित जर काही आजार-दुखणं असेल तर त्यावरही या गवतावर चालल्यास चांगले फायदे मिळतात. या दुर्वांचा रस प्यायल्यावर एनीमियाची समस्या दूर होते.
जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाचं आवडतं फूल का आहे?
वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळी फूलं अर्पण केली जातात. गणपती बाप्पाच्या हातात आपण आवर्जून लाल जास्वदाचं फूल पाहतो. गणपतीला लाल जास्वंदाचं फूल हे अतिप्रिय असल्याचं म्हटलं जातं. पण जास्वंदाच्या इतर रंगातील फुलापेक्षा लाल रंगाचंच जास्वंद का असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे लाल रंगामध्ये गणपतीची तत्वे, शक्ती आकर्षित करण्याची क्षमता जास्त आहे.
गणपतीचा वर्ण लाल आहे. त्यामुळे त्याची पूजा करताना लाल वस्त्र, तांबड्या रंगाचं फूल आणि रक्तचंदन वापरलं जातं. पूजेच्या ठिकाणी असणाऱ्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे मूर्ती जागृत होते. त्यामुळे जास्वंदाचं लाल रंगाचंच फूल गणपती बाप्पाच्या हातात किंवा चरणाशी आपल्याला पाहायला मिळते.
मोदकाचा नैवेद्य का?
गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. यासोबत फळं आणि अन्य मिठाई असते. पण इतर देवतांना जसं जेवणाचा नैवेद्य दाखवितात, तसं गणपती बाप्पाला प्रामुख्याने मोदकांचाच नैवेद्य दाखविला जातो. कारण, ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे लहानसा भाग. थोडक्यात मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार हा नारळासारखा असतो. हा आकार ‘ख’ (अनंत) या ब्रह्मरंध्रातील पोकळीसारखा असतो. आनंदाचा अनुभव हा ‘ख’ पर्यंत पोहोचल्यावर येतो. त्यानुसार, मोदक म्हणजे आनंद देणारी शक्ती आहे.
यासोबतच मोदक हा ज्ञानाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे त्याला ज्ञानमोदक असंही म्हटलं जातं. आपल्याला वाटतं की ज्ञान हे थोडंस आहे हे मोदकाच्या टोकावरून दर्शवलं जातं. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण शिकायला सुरूवात करतो तेव्हा ज्ञानाची व्याप्ती आपल्याला कळते. हे मोदकाच्या खालच्या फुगीर भागावरून प्रतिबिंबीत होते. मोदक हा जसा चवीने गोड असतो. तसंच ज्ञान मिळाल्यावर त्याचा आनंदही गोड असतो.
एवढा मोठ्या गणरायाचं वाहन लहानसा उंदीर का?
प्रत्येक देवता ही कोणत्या ना कोणत्या वाहनावर आरुढ असल्याचं आपण पाहत असतो. त्याप्रमाणे गणपती बाप्पाचं वाहन हे मूषक म्हणजे उंदीर असल्याचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीच्या पायाशी उंदीर असतोच. मात्र गणेश पुराणामध्ये सिंह, मोर हेही गणेशाचं वाहन असल्याचं वाचायला मिळते.
गणेशपुराणामध्ये कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग अशी चार युगे सांगितली आहेत. या चारही युगात गणेशाच्या मूर्तीचं रूप आणि वाहन हे वेगवेगळे आहे. कृतयुगात गणेशाचं वाहन सिंह असून गणेशाला दहा हात आहेत. या मूर्तीचं नाव विनायक असं होतं. त्रेतायुगात गणपतीचं वाहन मयूर म्हणजेच मोर होता आणि गणेशमूर्तीला सहा हात दाखवलेले होते. या युगात मोर हा गणपतीचं वाहन होतं म्हणून त्याला मयूरेश्वर म्हटलं जातं. द्वापारयुगात मूषक म्हणजे उंदीर हा गणेशाचं वाहन असून या मूर्तीला चार हात दाखवलेले असतात. त्याला गजानन असं संबोधलं जातं. तर कलियुगात घोडा हे गणपतीचं वाहन असून या अवतारात गणपतीला दोन हात आहेत. याला धूम्रकेतू असं नाव आहे.
सामान्यपणे अन्य वाहनांपेक्षा उंदीर हाच गणपतीचं वाहन म्हणून ग्राह्य धरला जातो. उंदीर आपल्या मनाच्या आणि भौतिक इच्छांचं प्रतीक आहे. जरी तो लहान असला तरी त्याच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे मोठी हानी करू शकतो. आपल्यातील ‘इच्छांचा उंदीर’ आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा तो आपल्यातील चांगुलपणा नष्ट करू शकतो. उंदीर हा अज्ञान कापून टाकणाऱ्या मंत्राचा प्रतीक मानला जातो, जो सत्य आणि ज्ञानाकडे नेतो.