आपल्याकडं कोणतंही कार्य असलं तरी सर्वात आधी गणेशपूजन केलं जातं. एवढंच काय तर रोजच्या दिवसाची सुरुवातही गणेशाला स्मरुनच कित्येक जण करतात. लहान मुलांचा तर गणपती अतिशय लाडका. त्याचं हत्तीच तोंड, गोल मोठ्ठं पोट, हातात मोदक, पायाजवळ उंदीर असं सौंदर्याच्या सर्वसामान्य व्याख्यांमध्ये न बसणारं तरीही अतिशय लोभसं रुप, सर्वांनाच आपलंस करतं. पण आपला गणपती बाप्पा फक्त ‘मनोकामना’ पूर्ण करणारा नाही तर त्यासोबतच बरंच काही आहे.
विघ्नहर्ता म्हणजेच वाटेतल्या सर्व अडचणी तो दूर करतोच. त्यासोबत तो शिक्षक, कथाकथन करणारा, संरक्षक आणि खोडकरही आहे. गजमुख या पलीकडंही गणपती आपल्याला जीवन कसं जगावं याचा मार्ग सांगतो. गणपतीच्या प्रत्येक अवयवामध्ये आपण आयुष्य समतोलानं आणि अर्थपूर्ण कसं जगावं याचं सार आहे. पाहुयात गणपतीच्या सर्व अवयवांचा अर्थ.
मोठे कान
गणपतीचे मोठे कान आपल्याला एखाद्याचं म्हणणं किंवा गोष्ट नीट लक्ष देऊन ऐकण्याचं सुचवतं. अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. पण या गोष्टींमागचा विचार किंवा उद्देश लक्षात घ्यायला हवा. म्हणजेच भरपूर ऐका आणि गरज असेल तरच बोला. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात हे कौशल्य आपल्याला खूपच उपयोगी आहे.
लहान डोळे
गणपतीचे लहान डोळे हे सहज दिसतं त्यापलीकडचं सत्य सूक्ष्म दृष्टीनं पाहण्याचं सुचवतात. एकाग्रता ही फार महत्त्वाची आहे. एखादी घटना किंवा गोष्टीकडं वरवरचं न पाहता कारणमिमांसा, स्पष्टता असायला हवी.
हत्तीचं डोकं
आपली बुद्धीमत्ता, विचारपूर्वकता, चातुर्य आणि स्मरणशक्तीसाठी हत्ती ओळखला जातो. गणपतीचं गजमुख हेही बुद्धीमत्तेचा प्रत्यक्ष वापर आणि उपयोग यांची सांगड घालायला शिकवतं.
सोंड
अनुकुलता आणि लवचिकता हे दोन्ही गुण सोंडेमध्ये आहे. हत्ती आपल्या सोंडेने उंच मोठ्या झाडाला मुळापासून उपटू शकतो आणि जमिनीवरचा तांदळाचा दाणाही टिपू शकतो. त्यामुळं गणपतीची सोंड ही आपल्याला लवचिकता, ताकद आणि आयुष्यातील लहान आणि मोठ्या आव्हानांनाही कसं सामोरं जायचं हे शिकवते.
तुटलेला दात
तुटलेला दात हा त्याग आणि एका विशिष्ट उद्देशाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. एका आख्यायिकेनुसार, महाभारत लिहिताना श्रीगणेशाने लेखणीकरता त्याचा दात तोडला. यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम पूर्ण झाले. आपल्या उच्च ध्येयांचा पाठलाग करण्याकरता आवश्यक असणाऱ्या समर्पण, निस्वार्थीपणा आणि वैयक्तिक सुखाकडे दुर्लक्ष करणे याचा धडा यातून मिळतो.
गोल गरगरीत पोट
कोणाचं पोट मोठं गोल गरगरीत असेल तर त्याची त्यावरून थट्टा केली जाते. पण गणपतीचं मोठं पोट हे जीवनातील सुख आणि दुःख हे दोन्ही पचवण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे. आयुष्यात अनेकदा चढ-उतार येतात. या सर्वांनाच आपण समर्थपणं स्वीकारावं.
मूषक वाहन
मूषक अर्थातच उंदीर. एवढ्या मोठ्या गणपती बाप्पाचं वाहन एवढासा उंदीर कसा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण हा एवढासा उंदीर आकारानं लहान असला तरी नियंत्रणात राहीला नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आपल्या इच्छांचंही तसंच आहे ना. उंदीर वाहन असल्यानं गणपती आपल्या इच्छांवर प्रभुत्व दाखवतो. इच्छांवर नियंत्रण राखण्याऐवजी त्यांना संतुलित कसं करायचं हे दर्शवतो.
गणपतीची जन्मकथा आणि परिवर्तनाचा संबंध
गणपतीच्या जन्माची कथा तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पार्वतीनं मातीपासून तयार केलेलं मूल तिनं आंघोळीला जाताना पहाऱ्याकरता दारावर बसवलं. भगवान शंकराला घरात जायला अडवल्यामुळं प्रचंड राग येतो. त्याच रागात भगवान आपल्याच मुलाचा शिरछेद करतात. पार्वतीच्या आक्रंदनानंतर आपली चूक त्यांच्या लक्षात येते. आणि मग भगवान शंकर हत्तीचं मस्तक या मुलावर बसवून त्याला पुनर्जीवन देतात. ही कथा आपल्याला लवचिकता, परिवर्तन आणि शक्ती या तिन्हींचा पाठ देते. गणपतीचे हत्तीचे मस्तक हे शारीरिक बदलासोबतच वाढ, अनुकूलता आणि स्वतःच्या उत्क्रांतीचे रुपक आहे. चांगलं ज्ञान व शक्तीच्या मार्गानं कितीही अडथळे आणि आव्हानं आली तरी ती दूर करता येतात. पार्वतीनं निर्व्याज भक्तीनं गणेशाची निर्मिती केली. पालक आणि मुलांमधील अतूट बंध, निष्ठा आणि काळजी या मूल्यांवरही ही कथा भर देते.
गणपतीला फक्त पूजेतच अग्रक्रम नाही तर टी-शर्टवर मिरवण्यापासून ते घरात, ऑफिसमध्येही वेगवेगळ्या आकारात गणपती आपल्या सभोवताली पाहतो. म्हणजे गणपती प्रत्येक पिढीला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेरणा देत असतो. आध्यात्मिक मार्गदर्शन, सांस्कृतीक प्रतीक किंवा आनंददायी काहीही म्हणा, गणपती हा कालातीत आणि सार्वत्रिक आहे. आता तुम्हांला गणपतीच्या अवयवांबद्दलही कळलं आहेच. तर आता श्री गणेशाला नमस्कार करताना त्याच्या बुद्धी, नम्रता, धाडस, कलात्मकता, कौशल्य, दूरदृष्टी, श्रवण या सर्व गुणांचा आपल्या जीवनात आपल्याला अंगिकार करता येऊ देत हीच मनोकामना करुयात.