मुद्गल पुराण हे गणपतीशी संबंधित महत्त्वाचं मानलं जातं. कारण यात गणपतीचा जन्म ते त्याच्या जीवनाशी इतर अनेक संबंधित गोष्टींबद्दल माहिती आहे. महापुराणांसोबतच अनेक उपपुराणं ही हिंदू देवदेवतांसंबंधी दस्ताऐवज मानली जातात. महापुराणं आणि उपपुराणांची संख्या प्रत्येकी 18 आहे. पण मुद्गल पुराणाचा समावेश महापुराण किंवा उपपुराणामध्ये होत नाही. तर ते गणपतीशी संबंधित स्वतंत्र दस्ताऐवज मानले जाते. श्रीगणेश हा कार्यारंभ, ज्ञान, समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचा स्वामी आहे. हिंदू धर्मात त्याला अग्रपूजेचा मान आहे.
मुदगल पुराणाचा कालावधी
मुद्गल ऋषींनी मुद्गल पुराणाची रचना केली. ही रचना ही मूळ संस्कृतमधील आहे. नंतरच्या काळात भारतातील प्रादेशिक भाषांमध्येही यांचं भाषांतर झालं. मुद्गल पुराणात गणेशाभोवती फिरणाऱ्या अनेक कथा आहेत. एकूण 9 खंड मुद्गल पुराणात आहेत. हे नऊ खंड 428 अध्याय आणि 23 हजार श्लोकांमध्ये विभागले आहेत. प्राचीन भारतीय ग्रंथ नेमके कधी रचले गेले आणि लिहिले गेले याबद्दल ठोस सांगता येत नाही. पण उपपुराणं ही साधारण इसवी सन 6 ते 10 व्या शतकादरम्यान रचली गेली आहेत. काही अभ्यासकांच्या मते मुद्गल पुराण हे गणेशावर केंद्रित असलेल्या तात्विक ग्रंथांपैकी शेवटचे होते. तर काहींचे म्हणणे आहे की, मुद्गल पुराण हे गणेश पुराणापूर्वी लिहिले गेले होते.
मुद्गल पुराणाचा आवाका
गणपतीच्या गुणांचा उल्लेख पुराणांमध्ये आणि महाभारतातही आढळतो. या तीन गुणांना सत्त्व (शुद्धता, ज्ञान आणि सुसंवाद), रजस (उत्कटता, क्रियाकलाप, बदल) आणि तमस (अज्ञान, जडत्व, आळस) असे म्हणतात. भगवान गणेश हे ज्ञानाचे व अडथळ्यांचे निर्मूलन करणारे देव असल्याने ते सत्त्व, रजसच्या गुणांवर प्रकाश टाकतात आणि तमस मागे टाकतात. नवीन कार्याचा प्रारंभ करून देणारा देव म्हणून तो क्रियाकलाप आणि बदल यांनादेखील मूर्त रूप देतो. सत्त्व सहसा संरक्षणाचे चित्रण करतो तर रजस निर्मितीचे चित्रण करतो. मत्सरासूर, दंभासूर, क्रोधासूर, कामासूर, लोभासूर आणि मदासूर हे मानवी अंतःकरणातील षड्रीपू आहेत. या मानवी गुणांवर कशी मात करावी हे अप्रत्यक्षरित्या मुद्गलपुराणात विविध रुपककथांच्या आधारावर सांगितलं आहे. यात ज्ञान-विज्ञान कथांचाही समावेश आहे.
गणेशाची आठ रूपे
मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ रूपांबद्दल किंवा आठ अवतारांबद्दल सांगितले आहे. प्रत्येक रूप एका विशिष्ट प्रदेशाशी संबंधित आहे आणि त्याच्याशी एक अनोखी कथा जोडलेली आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये गणेशाच्या या आठ अवतारांच्या आगमनाबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत. गणेशाचा पहिला अवतार ‘वक्रतुंड’ म्हणजे वक्र सोंड म्हणून होता. या अवताराची पौराणिक कथा मत्सर राक्षसाच्या पराभवाशी संबंधित आहे. दुसरे रूप ‘एकदंता’चे आहे, ज्याचे सुळके आहेत. या अवताराभोवती अनेक कथा आहेत. एक म्हणते की हे परशुरामांशी झालेल्या युद्धामुळे घडले, तर दुसरे म्हणते की गणेशाने महर्षी वेद व्यासांसाठी महाभारत लिहिण्यासाठी लेखणी बनवण्यासाठी स्वतःचा दात तोडला. तिसरा अवतार म्हणजे ‘महोदर’ ज्याने मोहासुर राक्षसाचा पराभव केला. पुढचा अवतार म्हणजे ‘गजानन’, ज्याचा चेहरा हत्तीसारखा होता. या अवतारात गजाननाने लोभासुर राक्षसावर त्याच्या लोभामुळे विजय मिळवला. पाचव्या अवतारात, गणेशाने ‘लंबोदरा’चे रूप धारण केले आणि क्रोधासुर राक्षसाचा क्रोध सहन करण्यासाठी पुरेसे मोठे पोट घेऊन प्रकट झाला. इतर तीन अवतार म्हणजे ‘विकट, विघ्नराज आणि धुम्रवर्ण’.
हेही वाचा : गणपतीचे अवयवः समतोल आणि अर्थपूर्ण जीवनाचं प्रतिक
गाणपत्य सांप्रदाय आणि मुद्गल पुराण
गाणपत्य सांप्रदायातील लोक मुद्गल पुराणाला त्यांच्या आचरणाचा गाभा आणि सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ मानतात. ते या पुराणातील शिकवणींचे पालन करतात. श्रीगणेशावर पूर्ण विश्वास ठेवून त्यावर अवलंबून राहतात. त्यांच्या मते गणपती हा एकमेव त्यांच्या समस्या सोडवणारा आणि रक्षक आहे. या पुराणात सांगितलेल्या विधी आणि पद्धतींचे या सांप्रदायातील लोक पालन करतात. गणपती हा ज्ञानाचा अधिपती असल्याने हे पुराण अधिक जागरूक होण्याचे आणि या पुराणाचे चांगल्या प्रकारे पालन करण्याचे महत्त्व पसरवते. विविध 64 कला प्रकारांसह संगीत आणि काव्यावरही गणपतीचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. त्यामुळं कलाकारांमध्येही गणपतीचं खास स्थान असल्याचं पाहायला मिळतं.
गणपती आणि कुबेर
मुद्गल पुराणातील गणपती आणि कुबेर यांची कथा फारच रोचक आहे. आपल्याला माहिती आहेच की गणपती हा खव्वैय्या आहे. एकदा कुबेरानं गणपतीला मेजवानीकरता त्याच्या घरी बोलावलं. खरंतर कुबेराला त्याचं वैभव आणि संपत्तीचं प्रदर्शन गणपतीसमोर करायचं होतं. भोजनप्रिय गणेशानं या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार केला. पण कुबेराला गणेशाच्या भूकेची कल्पना नव्हती. रांधलेला सर्व स्वयंपाक गणपतीनं फस्त केला. मग समोर दिसेल ते सर्व अक्षरशः स्वयंपाकाची भांडी, राजवाड्यातील सामान, राजवाडा असं एकेक करून गणपतीनं सर्वच आपल्या पोटात घेतलं. कुबेराला आता धक्का बसला आणि त्यानं गणपतीकडं दयेची याचना केली. तेव्हा गणपतीनं कुबेराला सांगितलं की, संपत्ती कधीही भूक भागवू शकत नाही. कारण नम्रता आणि भक्तीतून तृप्ती येते. शारीरिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला काय खरंच काय पोषण देतं हे महत्त्वाचं आहे.
मुद्गल पुराणामध्ये जीवनाचा मार्ग सांगणाऱ्या अशा अनेक कथा येतात. मनोरंजनासोबत त्या आपल्याला आपण कसं वागल्यानं समाधानी आणि तृप्त राहू शकू हे सांगतात. धार्मिक पद्धतींसोबतच मुद्गल पुराण हे ज्ञान, सत्य आणि नम्रता यासारख्या नैतिक मूल्यांना देखील शिकवते.