2024 साली ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ओळखलं गेलं होतं. डिजिटल क्रांतीच्या नावाखाली कशाप्रकारे सर्वजण तंत्रज्ञानाला पूर्णत: शरण जात आहेत या अवस्थेला ‘रुपक’ म्हणून हा शब्द वापरला जातो. या शब्दाच्या माध्यमातून मानवाचा मेंदू हा संपूर्ण निकामी झाला आहे असं नाही. तर कशाप्रकारे माणसाची विचारशक्ती मंदावत आहे, लक्ष केंद्रीत करण्याची ताकद कमी होत आहे. माणसाची सर्जनशीलता ही कमी होत आहे. या सगळ्यासोबत माणसाला कशाप्रकारे महत्त्वपूर्ण गोष्टिचंही विस्मरण होत आहे हे कथन करण्याचा प्रयत्न केला आहे. आज जगातली कोणतीही माहिती आपल्याला क्षणार्थात उपलब्ध होते. पण या माहितीचा आपण उत्तमप्रकारे उपयोग करुन घेत नाहीत हे वास्तव आहे.
डिजिटल अवलंबित्व
जेव्हा आपल्याला एखादा रिसर्च पेपर, कथा किंवा ईमेल लिहायचा असतो तेव्हा काय लिहायचं याचा विचार करण्याऐवजी लगेच आपण ते आयतं कुठे मिळतं याचा शोध घ्यायला लागतो. आता तर एआयला चार – पाच कीवर्ड्स दिले की सगळा निबंधच समोर येतो. यामध्ये या तंत्रज्ञानाची चूक नाही. तर आपण किती चुकीच्या पद्धतीने आणि गरज नसलेल्या गोष्टींसाठीही या तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत हे स्पष्ट होतं. याच अवस्थेला ‘ब्रेन रॉट’ म्हटलं जातं. या स्थितीमुळेच डिजिटल व्यसन जडलेल्यांना यापासून कशाप्रकारे दूर करायचं हे अलीकडचं मोठं आव्हान आहे. अनेकदा खूपशा गोष्टींची वरवरची माहिती आपल्याकडे असते. मात्र, सतत या डिजिटल आणि माहितीच्या संपर्कात असल्यामुळे अनेकदा आपल्याला सगळं काही ठाऊक आहे, जी जी माहिती, ज्ञान आपल्याला असायला हवं ते आधीच आपल्याकडे आहे, अशी धारणा होते.
या सगळ्या परिस्थितीला काही अंशी आताची शिक्षण पद्धत ही काही प्रमाणात कारणीभूत आहे. आत्ताच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे ज्ञान देण्याऐवजी केवळ औपचारिकता म्हणून शिकवून परिक्षेमध्ये अधिकाधिक गूण मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट झालं आहे. विद्यार्थीही ज्ञान मिळवण्याच्या लालसेने शिक्षणाकडे न पाहता एका स्पर्धेत उतरलेले आहेत. कोणत्याही परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवायचे आणि करिअर करायचं. आपल्याला विषय आवडतो की नाही, आपल्याला समजलं आहे की नाही यापेक्षा एकदाची डिग्री हातात घेऊन करिअर सुरू करायचं. शिक्षण पूर्ण झाल्याचं समाधान मिळवायचं हेच अंतिम ध्येय असतं.
नोकरशाही पद्धत आणि शिक्षणातल्या या स्पर्धमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, त्यांच्यात कुतूहल, विश्लेषण करण्याचं कौशल्य, आकलन क्षमता कमी होत आहे.
या अशा वातावरणामुळे ज्ञान ही बाब आता विद्यार्थ्यांना आकर्षित करत नाही. एआय येण्यापूर्वी कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर लगेच आपण म्हणायचो अरे गुगल कर लगेच समजेल. पण गुगल अस्तित्वात नव्हतं तेव्हा एकादी गोष्ट जाणून घेण्यासाठी पुस्तकं वाचली जायची. एखाद्या तज्ज्ञाची भेट घेऊन त्यांच्याकडून ती माहिती घेतली जायची. काही आठवायचं असेल तर आपण बुद्धीवर जोर देऊन ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचो. मात्र आता एका क्लीकवर माहिती मिळवली जाते. पण ही माहिती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहत नसल्याचंही जाणवतं.
आपल्या याच सगळ्या वागण्यामुळे आपला मेंदू कुजत आहे. पृथ्वीवरील अन्य सजीवांच्या तुलनेत मानवाची जी खासियत आहे त्यावर हल्ला होत आहे. माणसाच्या भावना, संवेदनशीलता नष्ट होत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं लक्ष केंद्रीत करण्याची शक्ती, अंर्तमनाची प्रेरणा आणि माणसाचे मुख्य गुणधर्म जोपसण्यामध्ये अडथळे येत आहेत.
शिक्षण पद्धतीत सुधार
डिजिटलच्या विळख्यात अडकलेल्या अशा लोकांना एका विशेष अभ्यासशास्त्राच्या माध्यमातून सोडवता येऊ शकते. या अभ्यासशास्त्रामध्ये संबंधित व्यक्तीला डिजिटलचं ज्ञानचं नाही तर सद्सद् विवेकबुद्धीने तंत्रज्ञानाचा, डिजिटलचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केलं जातं. त्याचं डिजिटल वापराविषयीचं कौशल्य विकसीत केलं जातं.
यामध्ये मार्गदर्शकांना संबंधित व्यक्तीच्या मानसिक सुस्थपणाची कल्पना, माहिती असली पाहिजे. त्यानुसार त्यांच्यासाठी अभ्यासपूर्ण वातावरण निर्मिती करत त्यांचं लक्ष विचलीत होणार नाही त्याऐवजी ते प्रत्येक गोष्टीवर चिंतन, विचार करु लागतील अशा अॅक्टिव्हिटी त्यांना दिल्या पाहिजेत. या माध्यमातून संबंधित व्यक्तिंना केवळ गुणांपुरता, डिग्रीपुरता शिक्षण न देता, त्यांना उपयुक्त असलेल्या कौशल्यांचाही विकास करता आला पाहिजे.
बौद्धिक सुधारणा
एखादी गोष्ट शिकत असताना किंवा वाचत असताना त्याचं पटकन स्किमिंग किंवा आकलन करुन घेणं या दोन्ही गोष्टी तशा कठीण आहेत आणि त्याचे परिणामही वेगळे आहेत. स्किमिंग म्हणजे एखादं पुस्तक वा मजकूर वाचत असताना त्यातले प्रत्येक शब्द वा ओळ न वाचता वरचेवर वाचणं आणि त्यातून संपूर्ण मजकूराचा बोध करुन घेणं. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण एखादा मजकूर वाचत असतो तेव्हा खरंतर आपण वाचन करीत नसतो तर केवळ स्किमिंग करत असतो. आपल्या या कृतीतून आपण आपल्या बुद्धीला तो मजकूर लक्षात ठेवून त्यातून नवीन निर्मिती करण्याच्या सूचना देत नाही. तर, पुढे जेव्हा कधी पण आपल्याला अशा मजकूराची गरज भासेल तेव्हा पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवर जाणून ती माहिती तिथून घेण्याचं प्रशिक्षण देत असतो. ही सवय मोडून काढण्यासाठी अध्यापनशास्त्रात संशोधनात्मक माहिती वाचने, लक्षपूर्वक आणि हळू गतीने वाचन करणं, शैक्षणिक पुस्तकं वाचणे, संवादात्मक लिखाण करणं अशा गोष्टींवर भर दिला जातो. डिजिटलच्या विळख्यातून बाहेर पडून बौद्धिक विकास साधण्यासाठी या सवयींची मदत होते. जेव्हा शाळेतून, कॉलेजमधून एखादी असाइनमेंट, प्रकल्प दिला जातो तेव्हा ते पूर्ण करताना लगेच गुगल आणि एआयकडे धाव न घेता त्यावर शांतपणे बसून विचार करून ती लिहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आवश्यकता भासली तरच तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे. या सगळ्यासाठी पुरेसा वेळ देणंही गरजेचं आहे. थोडक्यात शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तिने सगळ्यात पहिल्यांदा स्वतंत्र विचार केला पाहिजे.
डिजिटलच्या विळख्यातून मुक्त होण्याची गरज
4 जी आणि 5 जी च्या या युगात आपल्याला डोळ्याची उघडडीप होणार तोच माहिती मिळत असते. पण, हा वेग मानवी विचारांशी तुलना करू शकत नाही. एआयने कितीही मोठा, सुटसुटीत मजकूर लिहीन दिला तरिही, एखादा व्यक्ती जे विचारपूर्वक लिहू शकतो त्याच्याशी एआय मजकूराची तुलना करता येत नाही.
डिजिटल हे आपल्याला जगाशी जोडणारं साधव आहे ते आपलं जग होऊ शकत नाही याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता शिक्षण घेतलेल्या जेन झी किंवा जेन अल्फा पिढीला शिकवताना त्यांच्या आणि एकूणच सजीव बुद्धीमान मानवाचे जे अंगभूत कौशल्य आहेत त्यांचा विकास करत शिकवणं गरजेचं आहे. ही शिक्षण पद्धत मंद गतीची, खोलवर ज्ञान देणारी असली पाहिजे. ही प्रक्रिया आपल्याला क्लिष्ट वाटू शकते पण शिकण्याची हीच पद्धत आपल्याला डिजिटलच्या विळख्यातून आणि त्याला पूर्ण शरण जाणाऱ्या सवयीपासून मुक्त करु शकते.



