युरोपियन देशांनी जेल नेल पॉलिशच्या अनेक ब्रँडमध्ये आढळणाऱ्या एका प्रमुख विषारी घटकावर बंदी घातली आहे. ट्रायमिथाइलबेंझोयल डायफेनिलफॉस्फिन ऑक्साइड, याला सामान्यतः टीपीओ म्हणतात. हा एक विषारी घटक मानला जातो. यामुळे प्रजनन समस्या निर्माण होऊन पुनरुत्पादक आरोग्य समस्या निर्माण होतात. ही बंदी 1 सप्टेंबर 2025 पासून लागू झाली आहे. या बंदीमुळे टीपीओ हा घटक युरोपियन युनियनमध्ये विकण्यास, आयात करण्यास किंवा सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरता येणार नाही.
टीपीओचा परिणाम
संशोधकांच्या अभ्यासांनुसार, टीपीओला “कार्सिनोजेनिक, म्युटेजेनिक किंवा पुनरुत्पादनासाठी विषारी” म्हणून वर्गीकृत केलं आहे. या घटकामुळे त्वचेची ऍलर्जी आणि त्वचा संवेदनशील ही होऊ शकते.
मे 2025 मध्ये, युरोपियन कमिशनने ऑम्निबस VII म्हणून ओळखले जाणारे एक नियुक्त नियमन स्वीकारले. यामुळे TPO सह अनेक रासायनिक पदार्थांना कॉस्मेटिक्समधील प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत औपचारिकपणे समाविष्ट केले गेले.
युरोपियन युनियनने TPO असलेल्या उत्पादनांची विक्री, विपणन आणि वापर प्रतिबंधित केला आहे. त्यामुळे नेल सलूनना त्यांच्याकडे आता उपलब्ध असलेल्या मालाची विल्हेवाट लावावी लागणार आहे. तसेच यापुढे TPO-मुक्त उत्पादनं तयार करावी लागणार आहेत.
शिक्षेची तरतूद
युरोपमधील हजारो नेल सलून, तंत्रज्ञ आणि सौंदर्यप्रसाधने विक्रेत्यांवर याचा परिणाम झाला आहे. नियमांचे पालन केलं नाहीतर दंड आकारू शकतात. हा दंड 22 हजार युरो ज्यामध्ये प्रत्येक उल्लंघनासाठी €22,000 पर्यंतचा समावेश आहे. भारतीय रकमेमध्ये हा दंड 22,68,926 रुपये इतका आहे.
टीपीओला पर्याय
बीपीओ (बेंझॉयल पेरोक्साइड) किंवा कमी विषारीपणा असलेले इतर फोटोइनिशिएटर्ससारखे सुरक्षित पर्याय टीपीओ-मुक्त पर्याय म्हणून विकसित करुन त्याचा उपयोग करता येऊ शकतो.
ही बंदी केवळ युरोपीय युनियनसाठी आहे. तरिही त्याचा परिणाम जगातल्या अन्य उत्पादकांवरही पडतोच. कारण युरोपीय युनियनमध्ये निर्यात करणाऱ्या सौंदर्य प्रसाधन कंपन्यांना त्यांची उत्पादन टीपीओ – मुक्त तयार करावीच लागणार. सध्या काही ब्रँड आधीच उत्पादने TPO-मुक्त करण्यासाठी सुधारणा करत आहेत.
टीपीओमुळे नेमका आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात याचा अद्याप उलगडा झालेला नाही. तरिही, ते विषारी असल्याने धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून आधीच त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेणं हे चांगलं आहे.