पंजाब देशाचं धान्य कोठार म्हणून विशेष ओळख मिळवलेलं राज्य आहे. आज हेच राज्य पूराने वेढलेलं आहे. गेल्या दशकभरातला हा सर्वात मोठा पूर आहे. या पुरामुळे जवळपास चार लाख लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला आहे. 48 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे दोन हजार गावं प्रभावित झाली आहेत आणि अंदाजे 13 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही सारी हानी पूर ओसरेपर्यंत आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्या हे वरकरणी दिसणार पहिलं मुख्य कारण आहे. तरी तज्ञ आणि अधिकृत माहितीनुसार, मानवी हस्तक्षेप, जसं की पाणि वाहून जाण्याचा मार्ग बंद करणं, नैसर्गिक जलवाहिन्यांवर अतिक्रमण आणि रस्ते बांधणीसारख्या अनियंत्रित बांधकामं ही या परिस्थितीला कारणीभूत आहेत.
पंजाबमध्ये 2023, 2019, 2013, 2010, 2008 आणि 2004 मध्ये मोठे पुर आले होते. प्रत्येक पावसाळ्यात, पंजाबमध्ये वार्षिक पावसाच्या सुमारे 75 टक्के पाऊस पडतो. पुरामुळे जीवितहानी होते आणि पिके, घरे आणि सार्वजनिक सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या वर्षी, सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ज्यामुळे शेती, रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेले. भात कापणीला आठवडे उरले असताना, उभी पिके नष्ट झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. शेतीसह पशुधनाच्या मोठ्या नुकसानामुळे ही परिणाम आणखी वाढला आहे.
मानवी घटक
पंजाबच्या 23 पैकी 18 जिल्ह्यांमधील 1.72 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी याला पाच दशकांमधील सर्वात वाईट पूर अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“22 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करता येईल, पण केंद्र सरकारने अतिरिक्त आर्थिक मदती व्यतिरिक्त राज्याची 60 हजार कोटी रुपयांची प्रलंबित देणी त्वरित द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
जलसंपदा विभागाच्या पूर तयारी मार्गदर्शक पुस्तिका 2024 मध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणून मुसळधार पाऊस ग्राह्य धरला आहे. पण त्याचवेळी या अहवालामध्ये मानवनिर्मित घटकांचा ही उल्लेख केलेला आहे. त्यात असा इशारा दिला आहे की मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक नाल्यातून पाण्याच्या प्रवाहात अडथळे आणले जातात. नदीकाठावरील बांधकामं, अनियंत्रित विकास यासारख्या कारणांमुळेही पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा येतो.
अहवालात असंही नमूद केलं आहे की बियास, सतलज आणि रावी नद्यांवर जलाशय आणि बंधाऱ्यांमुळे पूर येण्याचे धोके कमी झाले असले तरी, जलाशयांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे तसेच बंधाऱ्यांना भेगा पडल्यामुळे पूराचा धोका कायम आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 4 सप्टेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यात बेकायदेशीर खाणकामाला जबाबदार धरले. “जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री होते, तेव्हा सतलज, बियास, रावी आणि घाग्गर नद्यांच्या काठावरील बंधारे मजबूत करून पुरापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलं होतं. पण आता राज्यात वाढलेल्या बेकायदेशीर खाणकामामुळे हे बंधारे कमकुवत झाले आणि पाणी गावांमध्ये शिरलं असं मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, पंजाबच्या अर्थमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आणि केंद्र सरकार पंजाबविरुद्ध पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला आहे.
अक्षम्य दुर्लक्ष
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अनियंत्रित बांधकाम आणि खाणकामामुळे राज्याची असुरक्षितता वाढली आहे. रणजित सागर आणि शाहपूरकंदी धरण प्रकल्पांचे माजी मुख्य अभियंता एस.के. सलुजा म्हणाले, “नद्या आणि ओढ्यांजवळील वस्त्यांमध्ये वर्षानुवर्षे अतिक्रमणे होत आहेत. सत्तेत येणाऱ्या सरकारांना त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं आहे.”
अवैज्ञानिक पद्धतीने केलेल्या बांधकामांची संख्या देखील मोठी आहे. यामुळेही पाण्याच्या प्रवाहात अडथळा येतो. नदीकाठातून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करणं ही पंजाबमधली आणखीन एक मोठी समस्या आहे.
24 जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून, राज्यात 591.8 मिमी पाऊस पडला आहे. जो सामान्यपेक्षा 53 टक्के जास्त असल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. सध्याच्या पुराची तुलना 1988 च्या पुरांशी केली जात आहे. जेव्हा 500 हून अधिक लोकांचा जीव गेला होता.
पुढील आव्हाने
हवामान बदलामुळे हवामानाच्या पद्धतींमध्ये बदल दिसून येत आहे. गेल्या दशकात, पंजाबमध्ये पाऊस अधिक विसंगत झाला आहे. मान्सून एकसारखा नाही, जो चिंतेचा विषय आहे. असं मत चंदीगड इथले शास्त्रज्ञ आणि आयएमडी संचालक सुरेंदर पॉल यांनी व्यक्त केलं आहे.
हवामान तज्ञ सौम्या दत्ता, मौसम (MAUSAM – मुव्हमेंट फॉर अॅडव्हान्सिंग अंडरस्टँडिंग ऑन सस्टेनेबिलिटी अँड म्युच्युअलिटी) च्या विश्वस्त, यांनी याप्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचं प्रमाण वाढत आहे. पंजाब आणि उत्तरेकडील भागात मुसळधार पावसामागील मुख्य कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ. अरबी समुद्र असामान्यपणे गरम झाला आहे. ज्यामुळे अधिक आर्द्रता येत आहे. ही नवीन सामान्य परिस्थिती आहे.
या सगळ्या पार्श्वभूमिवर जलविद्युत धरणांचे व्यवस्थापन सुधारले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.