कर्करोग या जीवघेण्या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. दररोज नवीन रुग्णांची भर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाची माहिती वाचनात येत असते. या जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधोपचार पद्धती विकसीत केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रशियामध्ये कर्करोगवरील उपचारासाठी लस विकसीत केली आहे. या लसीमध्ये कर्करोगाशी लढण्याची पूर्ण क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
कर्करोगवरील चाचण्या पूर्ण
एन्टरोमिक्स नावाच्या या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 100 टक्के कार्यक्षमता असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्था ‘तास’ यांनी दिली आहे. फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) च्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये या लसीच्या निष्कर्षाचा अहवाल सादर केला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, रशियन आरोग्य मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यावर ही लस बाजारात उपलब्ध करुन देता येईल.
कर्करोगाची लस कशी काम करेल?
रशियाची नवीन कर्करोग लस mRNA तंत्रज्ञानावर तयार केली आहे. कोविड -19 च्याही काही लसी याच तंत्राने तयार केलेल्या आहेत. या लसीमध्ये पारंपारिक लसींसारख्या कमकुवत किंवा निष्क्रिय विषाणूंचा वापर केला जात नाही. त्याऐवजी, mRNA लसींमध्ये अनुवांशिक सूचनांचा एक संच असतो. या सूचना शरीराच्या पेशींना एक विशिष्ट प्रतिजन, एक प्रथिन तयार करु लागतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरातील संभाव्य धोका ओळखते. एकदा रोगप्रतिकारक शक्ती त्या प्रतिजनाची ओळख पटवण्यास शिकली की, ती त्यावर हल्ला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करू लागते.
कर्करोगाच्या उपचारात, हे अँटीजेन्स ट्यूमर पेशींवर दिसतात. रोगप्रतिकारक शक्ती एकदा प्रशिक्षित झाल्यानंतर, निरोगी पेशींना स्पर्श न करता त्या कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करून नष्ट करू शकते हे उद्दिष्ट आहे. यामुळे ते केमोथेरपीपेक्षा खूप वेगळे बनते, कारण केमोथेरपीमध्ये बहुतेकदा कर्करोगाच्या पेशींसह निरोगी ऊतींना ही नुकसान पोहोचवलं जातं.
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारासाठीही mRNA पद्धतीवर संशोधन सुरू
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांची तपासणी करण्यासाठी mRNA-आधारित इम्युनोथेरपी क्लिनिकल चाचण्यां करता येतात का या विषयावर आता संशोधन सुरू आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट (यूसीएलएच) चे सल्लागार वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट प्रोफेसर सिओ मिंग ली, यांनी माहिती दिली.
प्रतिबंधात्मक लसीपेक्षा या उपचार लसी वेगळ्या आहेत
निरोगी लोकांना एखाद्या रोगापासून वाचवणाऱ्या लसींना प्रतिबंधात्मक लस म्हटलं जातं. मात्र, या mRNA कर्करोगाच्या लसी आधीच कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्माण केल्या आहेत. चेन्नईतील डब्ल्यूआयए इथल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अरविंद कृष्णमूर्ती यांनी द हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, एमआरएनए कर्करोगाच्या लसी इतर लसींप्रमाणे आजार रोखण्यासाठी निरोगी रुग्णांसाठी नाहीत तर त्या ज्यांना कर्करोग झाला आहे अशा रुग्णांच्या ट्यूमरना लक्ष्य करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी वापरली जाणार आहे. या लसीचा आणखीन एक फायदा असा आहे की ही लस त्या- त्या रुग्णांच्या आजाराप्रमाणे तयार केली जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक रुग्णाची लस त्यांच्या ट्यूमरमधील विशिष्ट अँटीजेन्सनुसार कस्टमाइज केली जाऊ शकते. याचा अर्थ, एकाच अँटीजेन, कोरोनाव्हायरस स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करणाऱ्या कोविड-19 लसीच्या विपरीत, कर्करोगाच्या लसी एकाच वेळी अनेक ट्यूमर अँटीजेन्सवर मारा करण्यासाठी डिझाइन केल्या जाऊ शकतात.
ते किती प्रभावी आहे?
या लसीवर गेल्या अनेक वर्षापासून संशोधन सुरू होतं. या प्रक्रियेअंतर्गत सलग तीन वर्ष या लसीच्या प्रीक्लिनिकल चाचण्या केलेल्या आहेत.
या चाचण्यांच्या आतापर्यंतच्या निकालानुसार वारंवार डोस देऊनही लस सुरक्षित होती. रुग्णांवर याचा नकारात्मक परिणाम होत नाही. काही प्रकरणांमध्ये, कर्करोगाच्या प्रकारानुसार, ट्यूमरची वाढ 60 टक्क्यांपासून 80 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. किंवा या वाढीची गती मंदावली आहे. संशोधकांनी चाचणी घेतलेल्या नमुना रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण ही वाढल्याचं आढळून आलं आहे.
ही लस सुरूवातीला कोलोरेक्टल कर्करोग – मोठ्या आतड्याचा कर्करोगावरील उपचारासाठी वापरली जाणार आहे. तसेच ग्लिओब्लास्टोमा, वेगाने वाढणारा मेंदूचा ट्यूमर आणि डोळ्यांवर परिणाम करणाऱ्या ओक्युलर मेलेनोमासारख्या मेलेनोमाच्या अनेक प्रकारांसह इतर आक्रमक कर्करोगांच्या उपचारासाठी ही संशोधन सुरूच आहे.
या लसीच्या सुरूवातीच्या चाचण्यांमध्ये 48 नमुना रुग्णांचा समावेश होता. रशियाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटरने एंगेलहार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीच्या साहय्याने या चाचण्या केल्या होत्या.
पहिल्या टप्प्यातील हे निकाल उत्साहवर्धक असले तरी, तज्ञांनी असा इशारा दिला आहे की ही लस मोठ्या रुग्ण गटांमध्ये प्रभावीपणे काम करू शकते की नाही याची पुष्टी करण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोठ्या चाचण्यांची अजूनही आवश्यकता आहे.
कर्करोग उपचारावरील अन्य लसी
2023 मध्ये, यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (NHS) औषध कंपनी बायोएनटेकच्या सहकार्याने कर्करोग लस लाँच पॅड लाँच केला. NHS वेबसाइटनुसार, “कर्करोगाचे निदान झालेल्या लोकांसाठी mRNA वैयक्तिकृत कर्करोग लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रवेश वाढवणे” आणि “कर्करोगाच्या उपचारांचा एक प्रकार म्हणून कर्करोग लसींच्या विकासाला गती देणे” हे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेत, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आतापर्यंत फक्त एकाच कर्करोगाच्या लसीला मान्यता दिली आहे. सिपुल्युसेल-टी, ही लस 2010 मध्ये प्रोस्टेट कर्करोगासाठी मंजूर केली होती. या वैयक्तिकृत लसीमध्ये रुग्णाच्या रोगप्रतिकारक पेशी गोळा करणे, त्यांना प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या प्रथिनांच्या संपर्कात आणणे आणि नंतर रुग्णाला त्या पेशी पुन्हा सादर करणे समाविष्ट होते. नाविन्यपूर्ण असले तरी, यामुळे केवळ चार महिने जगण्याची शक्यता वाढली होती.
सध्या जगभरात कर्करोगाच्या लसींसाठी 120 हून अधिक क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुस, स्तन, प्रोस्टेट, मेलेनोमा, स्वादुपिंड आणि मेंदूच्या कर्करोगांवर लक्ष केंद्रित केलं आहे.