मध्य आशियातील ताण-तणाव, इस्त्रायलचं शेजारील राष्ट्रांसोबतचं वैर, रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यंतरी झालेला भारत – पाकिस्तान संघर्ष अशा सगळ्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला सांगितलं की भूतान नावाच्या आशियातील एका देशाला स्वत:चं सैन्यदलचं नाही तर? ‘अरे बापरे ! या देशावर तर कोणतंही शेजारील राष्ट्र रातोरात कब्जा करेल’ हाच पहिला विचार तुमच्या मनात येईल ना? पण कब्जा तर सोडा या भूतान देशावर आतापर्यंत तरी कोणत्याच राष्ट्रांनी हल्लाही केलेला नाहीये.
जगात इतकी अशांतता असताना हा देश मात्र एका वेगळ्याच शांततेत जगत आहे, असं म्हणालो तर काही वावगं नाही. जाणून घेऊयात भूतानच्या या खास वैशिष्ट्यांबद्दल.
भौगोलिक सीमांनी वेढलेला देश
भूतान या देशाच्या सगळ्या सीमा भौगोलिक प्रदेशांनी वेढलेल्या आहेत. त्याला किनारपट्टी नाही. त्यामुळे भूतानकडे स्वत:चं नौदल नाही. किनारपट्टीच नसल्यामूळे साहजिकच नौदलाची आवश्यकता नाही. पण भूतानकडे स्वत:चं हवाईदल सुद्धा नाहीये. भूतानकडे फक्त 7 हजार सैन्यदल आहे. याच नाव ‘रॉयल भुतानीज आर्मी’ असं आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेला आणि देशाला सुरक्षा पुरविण्याचं काम हे 7 हजार सैनिक करतात. तर देशातल्या रॉयल श्रीमंत घराण्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी विशेष असे रॉयल बॉडीगार्ड्स आहेत. त्यांची संख्या सुमारे 2 हजार आहे. याशिवाय देशभरात 1 हजार मिलिशिया स्वयंसेवक आहेत.
बलाढ्य शस्त्रास्त्रे नाहीत
भूतानचं सैन्यदल हे संख्येने खूप कमी आहे. त्यांच्याकडे मोठ मोठे रणगाडे, तोफगोळे, लढाऊ विमानं, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे यासारखी शस्त्रास्त्रे नाहीत. तिथल्या सैनिकांकडे INSAS रायफल्स, एके – 47 रायफल्स, पिस्तुल आणि मशीन गन सारखी शस्त्रास्त्रं आहेत. तसेच भारताकडून पुरविण्यात आलेले चिलखत असलेल्या सैन्यांच्या गाड्या आहेत. एकंदरीतच इथलं सैन्यदल हे आक्रमक स्वरुपातलं नसून बचावात्मक पावित्र्यात असतं.
हवाई दलासाठी ते भारतावर अवलंबून
भूतानकडे स्वत:चं हवाई दल नसल्यामुळे ते भारताच्या पूर्व हवाई कमांडवर अवलंबून आहेत. काही वैद्यकीय अडचण आली किंवा हेलिकॉप्टरची गरज भासली तर भारताकडून मदत मागवली जाते. भारतही वेळोवेळी हवाई मिशनमध्ये सहभाग घेऊन भूतानला मदत करत असतो.
भूतानच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार ?
भूतान हा आकाराने छोटा देश आहे. त्याच्याकडे स्वत:चं पुरेसं असं सुरक्षादल नाही. तरी या देशाने आतापर्यंत भारताच्या मदतीने स्वत:चं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं आहे. पण हे फक्त मैत्रीच्या संबंधाने नाही तर यासाठी भूतान आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान विशेष करार झालेला आहे.
भारत – भूतान मैत्री करार 1949 या कराराअंतर्गत भूतानचं रक्षण करणं, त्यांना हवाई सुरक्षा आणि मदत करणं, सैन्यदलाला प्रशिक्षण देणं आणि शस्त्रास्त्रं पुरवणं ही भारताची जबाबदारी आहे. थोडक्यात भूतानवर जर कोणत्याही राष्ट्राने हल्ला केला तर तो भारतावर केलेला हल्ला असेल हे या करारातून स्पष्ट होतं. त्यामुळेच तिबेटवर वर्चस्व गाजवू पाहणारा चीन भूतानमध्ये प्रवेश करण्याचं धाडस करत नाही.
भारत – भूतान मैत्री
भारत हा नेहमीच प्रत्येक कार्यात भूतानला सहकार्य करत असतो. 2017 मध्ये ज्यावेळी चीनने भूतानच्या डोकलाम भागात रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सैन्यांने हे काम रोखलं. भारताने भूतानमध्ये रस्ते, पूल, संपर्कासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोई-सुविधा निर्माण केलेल्या आहेत. भारतीय गुप्तहेर खातं दहशतवाद, बंडखोरी आणि सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरी विषयीची माहिती भूतान सैन्याला पुरवत असते. अशाप्रकारे भारताच्या प्रादेशिक आणि लष्करी शक्तीच्या साहाय्याने भारत चीन आणि अन्य देशांच्या कुरघोडीपासून भूतानचं रक्षण करते.