आजकालच्या धावपळीच्या जगात महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांची एकच धावपळ सुरू असते. घरकाम, ऑफिसचं काम, मुलांची काळजी आणि अजून बरंच काही. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातात. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो.
मानसिक ताण आणि महिला
एका सर्व्हेनुसार, दर दोनपैकी एका महिलेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण असतो. हा ताण अनेक वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतो.
जगभरात महिलांच्या आत्महत्येपैकी 36.6% आत्महत्या भारतात होतात.
जवळपास 47% महिलांना झोप न लागण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यामुळे त्यांना रात्री शांत झोप मिळत नाही.
41% महिला भावनिकरित्या खूप दुखावलेल्या असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना सुरक्षित जागा किंवा विश्वासू मित्र-मैत्रिणी मिळत नाहीत.
38% महिलांना आपल्या करिअरची आणि पैशांची चिंता सतावते. वाढत्या महागाईत स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याचं आव्हान त्यांचा समोर असते.
हे आकडे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या महिलांच्या मानसिक स्थितीची कल्पना देतात. अनेक महिला आतून खूप अस्वस्थ आणि एकट्या असतात, पण त्याबद्दल बोलण्यासाठी समाजात अजूनही मोकळेपणा नाही.
त्यामुळे, महिलांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्या मदत मागत नाहीत. आणि समस्या अजून वाढतात.
शहरांमधील परिस्थिती
भारतातील मोठ्या शहरांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात.
मुंबईमध्ये कॉर्पोरेट लाइफ आणि कामाचा ताण खूप जास्त आहे. त्यामुळे, कामामुळे येणारा ताण आणि अभ्यासाचा ताण खूप जास्त असतो.
दिल्लीमध्ये महिलांची सुरक्षितता हे एक मोठं आव्हान आहे. सततची भीती आणि असुरक्षितता यामुळे दिल्लीतील महिलांच्या मानसिक ताणात ‘सुरक्षितता’ याचीही भर पडते.
कोलकातामध्ये आजही मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलणं लोक टाळतात. त्यामुळे मदतीची गरज असतानाही महिला पुढे येत नाहीत.
या सगळ्या परिस्थितीमुळे महिलांच्या शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. कामाचा ताण, आर्थिक अस्थिरता आणि कुटुंबातील अपेक्षा या सगळ्यामुळे त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकतात.
यावर उपाय काय?
थेरपी फक्त गंभीर मानसिक आजार असणाऱ्या लोकांसाठी नाही आहे. थोडा जरी मानसिक त्रास होत असेल, तर थेरपी घेतल्याने खूप फरक पडतो. थेरपी म्हणजे मन मोकळं करण्यासाठी आणि स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी एक सुरक्षित उपाय आहे.
कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला महत्त्व द्या.कंपन्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कामाचा ताण कमी करणं, समुपदेशन सेवा पुरवणं आणि कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी मानसिक आरोग्यावर शिबिरं आयोजित करणं हे महत्त्वाचं आहे.
टीव्ही, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. यामुळे या विषयाबद्दल समाजात असलेले गैरसमज कमी होतील.
पीअर सपोर्ट ग्रुप्स सुरू करा. असे गट सुरू केल्यास महिलांना एकत्र येऊन आपल्या समस्यांवर मोकळेपणाने बोलता येतं. अशा ठिकाणी बोलण्याने त्यांना मानसिक आधार मिळतो आणि त्या एकट्या नाहीत, याची जाणीव होते.
महिलांनी दिवसातून किमान 15-20 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा. या वेळात तुम्हाला जे आवडेल ते करा. मग ते पुस्तक वाचणं असो, गाणी ऐकणं असो.
नियमित व्यायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो. चालणं, धावणं, योगा किंवा कोणताही आवडता खेळ खेळा. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने राहतील.
आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे कुठल्याही कामापेक्षा कमी महत्त्वाचं नाही. मानसिकदृष्ट्या कणखर असणाऱ्या महिलाच आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात.