फेब्रुवारी 2024 साली तेजस्वी मनोज ही 16 वर्षांची मुलगी आपल्या वडिलांसोबत स्काऊटिंग अमेरिका कॅम्प याच्या प्रशिक्षण केंद्रातून घरी येत होती. टेक्सास इथल्या फ्रिस्को इथल्या घरी येते वेळी तिला तिच्या 85 वर्षांच्या आजोबांसोबत घडत असलेल्या सायबर गुन्ह्याची माहिती मिळाली. त्यादिवशी तिच्या आजोबांना त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाकडून 2 हजार अमेरिका डॉलरची मदत हवी असल्याचा मेल आला होता. तिचे आजोबा त्या नातेवाईकाला ही मदत देऊ करणार होते, इतक्यात तेजस्वीच्या वडिलांनी त्यांना थांबवलं. त्यांनी त्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना मदतीची गरज आहे का याची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी असा कोणताही मेल न पाठवल्याचं उघड झालं. त्या क्षणाला तिच्या आजोबांची फसवणूक होण्यापासून बचाव झाला होता.
मात्र, ही घटना तेजस्वीच्या मनात नोंदवली गेली. तिने लागलीच या विषयावर संशोधन करायला सुरूवात केली. दरवर्षी सायबर फ्रॉडच्या घडणाऱ्या घटना, त्याचे प्रकारे आणि या गुन्ह्याचे मुळ टार्गेट असलेले वयस्कर मंडळी यांची तिने माहिती मिळवून अभ्यास केला. त्यानंतर तिने या वयस्कर मंडळींची अशा सायबर गुन्ह्यापासून, फ्रॉडपासून संरक्षण करण्यासाठी त्याविषयीची जनजागृती करण्यासाठी ‘शिल्ड सीनियर्स’ नावाचं ऑनलाईन पोर्टल सुरू केलं. या पोर्टलवरुन तेजस्वी ज्येष्ठ मंडळीला या नव्या गुन्हेगारी क्षेत्राची माहिती देऊ लागली, यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा, काय काळजी घ्यावी याविषयी त्यांना प्रशिक्षण देऊ लागली.
या तिच्या योगदानाची दखल टाइम्स मासिकाने घेत तिला ‘टाइम्स किड ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविलं.
मल्टिटेलेंटेड तेजस्वी मनोज – सायबरसुरक्षेची प्रणेता
तेजस्वी मनोज ही अमेरिकेतल्या टेक्सास इथे महाविद्यालयात शिकणारी तरुणी आहे. ती ‘शिल्ड सीनियर्स’ या ऑनलाईन पोर्टलची संस्थापक आहे. मात्र ही एवढीच तिची ओळख नाही. तर तेजस्वी ही एक कुशल कोडर आहे. ती केवळ अभ्यासू मुलगी नाही तर सामाजिक क्षेत्रातही ती योग्य पद्धतीने योगदान देत असते. तिने ईगल स्काउट रँक मिळवला आहे. नॉर्थ टेक्सास फूड बँक यंग अॅडव्होकेट्स कौन्सिल या संस्थेत ती स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. अमेरिकेत असलेल्या भूतान निर्वासितांना साक्षर करण्याच्या उपक्रमात तिचा हिरीरीने सहभाग आहे. शिवाय तिच्या शाळेतल्या ऑर्केस्ट्रामध्ये ही ती कुशलतेने सादरीकरण करत असते. या तिच्या विविध कलागुणांमुळेच ती मल्टिटॅलेंटेड असल्याचं दिसून येतं.
ज्येष्ठ मंडळींच्या विरोधात सायबर गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण
सायबर गुन्ह्यांसाठी ज्येष्ठ नागरिक हे पहिलं लक्ष्य असतं. निवृत्त अधिकारी, सरकारी कर्मचारी यांनाच अधिकतर सायबर फ्रॉडमध्ये अडकवलं जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एफबीआयच्या इंटरनेट क्राइम कंप्लेंट सेंटरनुसार, अमेरिकेमध्ये 2024 मध्ये ऑनलाइन घोटाळ्यांचे सुमारे 8 लाख 60 हजार तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यामुळे 16 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं उघड झालं आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींशी केलेल्या फसवणुकीचं प्रमाण हे 5 अब्ज डॉलर्स होतं. जे 2023 च्या तुलनेत 32 टक्क्याने जास्त आहे.
फेडरल ट्रेड कमिशनच्या अहवालानुसार 2020 ते 2024 पर्यंत वृद्धांमध्ये 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होण्याचं प्रमाण ही चारपटीने वाढलं आहे. तर 1 लाख डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होण्याच्या प्रमाणात सात पटीने वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी ही सायबर चोरी रोखण्यासाठी निवृत्त, पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यांविषयी सावध राहण्यासाठी प्रशिक्षण देणं, माहिती देणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालं.
तेजस्वी मनोज हिने तिच्या आजोबासोबत घडलेली घटना पाहून ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल वा इंटरनेटचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणारी शिल्ड सीनियर्स ही वेबसाइट विकसित केली.
या वेबसाईटवर चार भाग आहेत :-
शिका – शिल्ड सीनियर्स या वेबसाईटच्या शिका या पेजवर ज्येष्ठ मंडळीना इंटरनेटच्या सुरक्षिततेविषयी साक्षर केलं जाते. यामध्ये विविध अॅप्सना मजबूत पासवर्ड कसा द्यावा, गोपनीयतेविषयीच्या सेटिंग्ज, फ्रॉड मॅसेज, फोन कोणते आहेत हे कसं ओळखावं अशा गोष्टिंचा समावेश आहे. यामध्ये बनावट धर्मादाय संस्था आणि त्वरित पेमेंट विनंत्या यासारखे जे मार्ग सायबर चोरांकडून वापरले जातात त्याविषयीची माहिती दिलेली आहे.
आस्क (विचारा) – या पेजवर तुमचे जे प्रश्न असतील त्याची उत्तरं एआय चॅटबोटच्या माध्यमातून दिली जातात. यामध्ये ज्येष्ठांना समजेल अशा साध्या-सोप्या शब्दामध्ये अगदी दोन ओळीमध्ये ही उत्तरं दिली जातात.
विश्लेषण – या पेजमध्ये एखादा मेल वा मेसेज संशयास्पद असेल तर ते ओळखलं जातं. जसं की, एखाद्या वापरकर्त्यांला संशयास्पद मेल किंवा मॅसेज आला असेल तर त्याने तो या पेजवर अपलोड करावा. त्यानंतर एआय सिस्टम त्या मेल किंवा मेसेजचं अवलोकन करते. हा मेल किंवा मेसेज अधिकृत प्लॅटफॉर्मवरुन वा संस्थेकडूनच आला आहे की नाही याची खातरजमा करुन घेतली जाते.
तक्रार – तक्रारी नोंदवण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वापरकर्त्यांना FBI, AARP, SEC आणि ग्राहक वित्तीय संरक्षण ब्युरो यासारख्या योग्य एजन्सींशी जोडते.
हे व्यासपीठ स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाला प्राधान्य देते, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे इंटरनेट वापरण्यास सक्षम करते आणि त्याचबरोबर तांत्रिक मदतीसाठी कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहणं कमी करते.
तेजस्वीच्या सायबरसुरक्षा प्लॅटफॉर्मला राष्ट्रीय मान्यता मिळाली
शील्ड सीनियर्स तयार करण्यासाठी तेजस्वीला अनेक कसोट्या पार पाडाव्या लागल्या. तिच्यातील क्षमता जाणून तिच्या या कामाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
2024 च्या काँग्रेसनल अॅप चॅलेंजमध्ये तिला सन्मानित करम्यात आलं. 2025 मध्ये डिजिटल दरी कमी करण्यावर काय उपाययोजना करता येतील या विषयावर तिला TEDx मध्ये भाषण करण्याची संधी दिली. तर 2025 साली तिला TIME मासिकाचा ‘किड ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी ‘TIME फॉर किड्स सर्व्हिस स्टार’ हा सन्मानही तिला दिला.
तेजस्वीचं ध्येय
ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने इंटरनेट वापरण्यास मदत करणे हे तेजस्वीचं मुख्य लक्ष्य आहे. सध्या खाजगी प्रिव्ह्यू मोडमध्ये, शील्ड सीनियर्स एका मोफत एआय इंजिनवर अवलंबून आहे. यामध्ये मर्यादित वापरकर्त सहभागी होऊ शकतात.या पोर्टलची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि अनेकानेक ज्येष्ठ मंडळीपर्यंत पोहोचण्यासाठी तेजस्वी निधी गोळा करत आहे. सहाय्यक-निवास सुविधांमध्ये प्रत्यक्ष कार्यशाळा आयोजित करण्याची तिची योजना आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून वृद्ध प्रौढांना सायबर सुरक्षेविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करता येईल.
यशाचं श्रेय
तेजस्वी तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना, त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देते. तेजस्वी हीचे आई-वडिल आयटी क्षेत्रात नोकरी करतात. त्यामुळे साहजिकच त्यांनी तेजस्वीला इयत्ता आठवीपासूनचं संगणकांची भाषा असलेले कोडींग कसं करायचं हे शिकवायला सुरूवात केली. त्यामुळे ती जावा, पायथॉन, एचटीएमएल यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पारंगत आहे. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व्यवस्थापक आरती राजमणिकम यांनी एआय, सायबरसुरक्षा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबद्दल मार्गदर्शन करत तिला मार्गदर्शक म्हणून मदत केली. ‘गर्ल्स हू कोड’ आणि ‘सायबर-पॅट्रियट’ सारख्या कार्यक्रमांनी तिच्या तांत्रिक कौशल्यांना आणखी बळकटी दिली आणि तिला वास्तविक जगातील सायबरसुरक्षा धोक्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी तयार केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी सामाजिक विषयावर मार्ग काढण्यासाठी जनजागृती करत असते.
ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन जगात स्वतंत्रपणे, आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी सक्षम बनवणे, तसेच कुटुंबांना वृद्ध नातेवाईकांना फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मदत करण्यास शिक्षित करणे हा तेजस्वीचा प्राथमिक उद्देश आहे.



