नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. सगळीकडे शक्तीची माता असलेल्या दुर्गेकरता विविध प्रथा पाहायला मिळतात. आपल्याकडे ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो तसाच बंगालमध्ये दुर्गा पूजेला मान आहे. यंदा दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गा मातेची पूजा केली जाणार आहे. बंगालमध्ये मोठमोठ्या मंडपांमध्ये खूप उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो.
दुर्गा पुजेची कथा
अशी आख्यायिका आहे की, दुर्गा माता या काळामध्ये कैलास पर्वतावरुन तिच्या माहेरी आली होती. हा नवरात्रीतला षष्टी म्हणजे सहावा दिवस असतो. यापुढचे पाच दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत दुर्गा मातेची रोज विधीवत पूजा केली जाते.
दुर्गा माता ही शक्तीची माता, प्रतीक मानली जाते. त्यामुळे दुर्गामातेच्या सन्मानार्थ स्त्रीशक्तीचा सन्मान, गौरव या दिवसात केला जातो. बंगालमध्ये तसेच अलिकडे मुंबईतही या पूजेसाठी मोठमोठे मंडप उभारुन त्यामध्ये दुर्गामातेची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते. सिंहावर स्वार होऊन महिषासुराचा वध करणाऱ्या या मूर्तीच्या बाजूला लक्ष्मी आणि सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्याही मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.
मूर्तीची विविधता
गणेशोत्सवात ज्याप्रमाणे विविध विषयावर आधारित देखावे आणि मूर्ती तयार करतात तसेच दुर्गा पुजेमध्येही विविध विषयाला अनुरूप देखावे सादर केले जातात.
दुर्गामातेचे मूर्ती ही खूप प्रेरणादायी, आक्रमक आणि शक्तीशाली असे भाव प्रकट करणारी असते. यामध्ये देवीच्या हातात असलेल्या आयुधांमधून आणि मूर्तीच्या रंगातून विविध अर्थ स्पष्ट होत असतात.
दुर्गामातेच्या कपाळावर असलेल्या कुंकुवाखाली कोळी रेखाटलेला असतो. बहुतांशी वेळा डाक किंवा डाकर साज पद्धतीने रेखाटलेल्या मूर्तीमध्ये देवतेच्या कपाळावर हा कोळी पाहायला मिळतो. याचा विशेष असा अर्थ आहे.
कोळ्याने विणलेले जाळे हे ‘महामाया’चे प्रतीक आहे. ते कोळ्याने साकारलेल्या सर्वोच्च भ्रमाची किंवा दिव्य स्त्रीत्वाची संकल्पना दर्शवते.
कोळी जाळे विणत विणत ते मोठे करतो, पण कोळी कधीही त्यात अडकत नाही. देवी देखील एक भ्रम निर्माण करते, पण माया तिला कधीही गिळंकृत करत नाही आणि ती नियंत्रणात राहते.
विस्डम लायब्ररीनुसार, “हिंदू धर्मात, कोळ्याचे जाळे हे सांसारिक इच्छांमध्ये अडकणे, आपल्या अस्तित्वामधली नाजूकता दर्शवतात. तसेच जीवनातील गुंतागुंत आणि आसक्तींच्या पलीकडे आध्यात्मिक स्पष्टतेचा शोध यामध्ये संतुलन साधणाऱ्या लोकांना प्रतिबिंबित करते.