कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने जसजशी प्रगती केली तसतशी या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठीही केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याचाच एक भाग म्हणून माती परिक्षण करणारे कीट्स, शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर माहिती देणारे ॲप्स, शेतजमिनीचा आढावा घेणारे ॲप्स, अत्याधुनिक अवजारे आज उपलब्ध आहेत.
शेती क्षेत्राला उपयुक्त ठरेल, कृषी क्षेत्रासंबंधित योजनांच्या अंमलबजावणीला हातभार लावेल असंच आणखीन एक ॲप आहे ते म्हणजे ‘कृषी मॅपर’ ॲप. जाणून घेऊयात या ॲपचा कशापद्धतीने उपयोग केला जातो.
काय आहे कृषी मॅपर ॲप?
‘कृषी मॅपर’हे शेतीसाठी भू-स्थानिक माहिती संकलित करणारं मोबाईल ॲप आणि वेब पोर्टल आहे. यामध्ये शेतजमिनीचं भू-फेंसिंग (geo-fencing) करुन त्या जमिनीवर शेतीसंबंधी योजनांचा माहिती गोळा करते. हे ॲप शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती घेते आणि जमिनीवर आधारित योजनांची पारदर्शकता सुनिश्चित करते, जेणेकरून फायदे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि शेती व्यवस्थापनात सुधारणा करता येईल हा यामगचा उद्देश आहे.
कृषी मॅपरचे प्रमुख वैशिष्ट्ये:
भू-फेंसिंग आणि भू-टॅगिंग : शेतजमिनीची अचूक नोंदणी आणि सीमा निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो.
एकात्मिक डेटा : कृषी संबंधित विविध योजनांसाठी एकच डेटाबेस तयार केला जातो, ज्यामुळे माहितीचे प्रमाणीकरण होते.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त : शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य, हवामान, पिकांची स्थिती, जमीन वापर आणि इतर संबंधित माहिती मिळते.
धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त : हे ॲप धोरणकर्त्यांना डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी मदत करते.
प्रशासकीय देखरेख : भू-आधारित योजनांच्या प्रभावी देखरेखीसाठी हे ॲप उपयुक्त आहे.
फोटो कॅप्चर करणे : जमिनीच्या नोंदींसाठी आणि देखरेखीसाठी ॲपद्वारे जमिनीचे फोटोही घेता येतात.
या ॲपचे महत्त्व :
- हे ॲप शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करते.
- हे शेती क्षेत्रातील पारदर्शकता वाढवते आणि योजनेतील गैरव्यवहार कमी करते.
- शेतकऱ्यांसाठी योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होते.
कृषी मॅपरवरील योजना
या ॲपवर सरकारकडून कृषी क्षेत्राशी संबंधित राबवण्यात येणाऱ्या 19 योजनांची माहिती दिलेली आहे. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एनएचबी तपासणी, मृदा आरोग्य कार्ड, कृषी विपणन पायाभूत सुविधा, पीएमएफबीवाय, एआयएफ, बियाणे वितरण, एसीएबीसी, नैसर्गिक शेती, राष्ट्रीय बांबू अभियान, पीडीएमसी, राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान, कृषी वनीकरण, जीसीईएस, क्षेत्र निरीक्षण, क्रॉपिक, एनएमईओ, एम अँड टीसीएचसी पोर्टल, पर्जन्यावर आधारित क्षेत्र विकास इत्यादी योजनांचा समावेश आहे.
कृषी मॅपर या पोर्टलवर गेल्यावर त्याठिकाणी विविध योजनांसाठी विशेष पानं तयार केलेली आहेत. आपल्याला ज्या योजनेची माहिती हवी आहे त्यावर क्लिक केल्यावर त्या योजनेचं मुख्य वेब पेज उघडते. तिथे आपल्याला योजनेची माहिती, अर्ज कसा करावा, लाभार्थी किती आहेत, योजनेचा प्रगती अहवाल अशा अनेक गोष्टी पाहता येतात.
एकंदरीतच कृषी क्षेत्राशी संबंधित योजना जाणून घेण्यासाठी, आणि या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जी माहिती हवी असते ते शेतकऱ्यांना आणि धोरणकर्त्यांनाही या कृषी मॅपर ॲपवर सहज मिळते.