‘आय लव्ह मोहम्मद’ या पोस्टरवरून गुरूवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी कर्नाटक आणि गुजरातमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. गुजरात इथल्या गांधीनगर जिल्ह्यात अनेक अल्पसंख्यांक समुदायाच्या दुकानांचं आणि वाहनांचं या दगडफेकीमध्ये नुकसान झालेलं आहे. हे केवळ या दोन राज्यातच घडलंय असं नाही. तर याची सुरुवात उत्तरप्रदेशपासून झाली आहे.
उत्तर प्रदेशमधल्या उन्नाव, बरेली, कन्नौज, आग्रा, गोंडा या शहरात आणि काशीपूर, तेलंगानातील हैदराबाद इथेही ‘आय लव्ह मोहम्मद’ या घोषवाक्याचे फलक हातात घेऊन मुस्लिम समाज मिरवणूका काढत आहे. उन्नाव इथल्या मिरवणूकीवेळी महिलांनी पोलिसांच्या लाठ्या हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केल्याची घटना घडली.
पण यापूर्वी उत्तरप्रदेश इथल्या कानपूरमध्ये ‘ईद-ए-मिलाद उन नबी’ च्या दिवशी मुस्लिम समाजाकडून जे जुलूस म्हणजे मिरवणूका काढल्या जातात त्यावेळी ‘आय लव्ह मोहम्मद’ चे फलक पहिल्यांदा वापरले गेलेले. त्यावेळी पहिल्यांदा वाद सुरू झाला आणि त्यानंतर इतर ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.
अचानक या घटना का घडू लागल्या ? हा आय लव्ह मोहम्मद ट्रेंड कोणी कुठे कसा सुरू झाला आणि त्यावरून नेमका वाद का उद्वभवला ? यासोबतच या ट्रेंडला प्रत्यूत्तर म्हणून सुरू झालेल्या आय लव्ह महादेव ट्रेंड कसा आहे हे जाणून घेऊयात.
कानपूरमधल्या मिलादच्या दिवशी ‘आय लव्ह मोहम्मद’ फलकावरून वाद का झाला?
यावर्षी 4 सप्टेंबरच्या दिवशी ‘ईद-ए-मिलाद उन नबी’ साजरी केली गेली. यादिवशी संध्याकाळच्या वेळी मुस्लिम समाजाकडून मिरवणूका काढल्या जातात. कानपूर मधल्या रावतपूर इथे ज्या मार्गाने मिरवणूक जाणार होती तिथे ‘आय लव्ह मोहम्मद’ असा फलक लावला होता. मात्र, या फलकाला तिथल्या हिंदू समुदायांनी विरोध केला. आणि ही नवीन प्रथा का सुरू केली जात आहे असा प्रश्न विचारला. हे प्रकरण वाढू नये म्हणून तिथल्या पोलिसांनी तात्काळ दोन समाजांमध्ये समझोता करुन ते मिटवलं.
कानपूरचे डीसीपी दिनेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या नियमांनुसार या मिरवणूकीसाठी कोणत्याच नवीन पद्धती सुरू करता येत नाहीत. जे पूर्वीपासून सुरू आहे तसंच ठेवण्याचा नियम आहे. मात्र, मिरवणूकीवेळी काही लोकांनी नवीन पद्धत म्हणून दरवर्षी जिथे तंबू उभारला जायचा त्याऐवजी वेगळ्या ठिकाणी तंबू उभारत तिथे ‘आय लव्ह मोहम्मद’ हा फलक लावला. पण पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर पोहोचून त्यांची समजूत काढून पूर्वीच्याच ठिकाणी तंबू उभारत तिथे हा पलक लावला. यावेळी या प्रकरणावरून कोणतीच तक्रार दाखल केली जाणार नाही हेही स्पष्ट केलं.
दोन्ही समुदायांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
या संपूर्ण घटनेनंतर मुस्लिम समाजातील काही लोकांनी त्यांचे ‘आय लव्ह मोहम्मद’चे फलक फाडल्याचे आरोप केले. तर हिंदू समुदायातील लोकांनी म्हटलं की, या मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनीच हे फलक फाडलेले आहेत. हा वाद शांत करण्यात पोलिसांना यश आलं.
कानपूर पोलिस स्थानकांत तक्रार दाखल होताच वाद पेटला
हे सगळं प्रकरण 4 आणि 5 सप्टेंबरमध्ये मिटलं होतं. मात्र, 9 सप्टेंबरच्या दिवशी कानपूर पोलिसांनी साधारण 15 अज्ञात लोकांवर रावतपूर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. मिलादच्या मिरवणूकीमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’चे फलकच्या माध्यमातून नवीन पद्धत सुरू करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या तक्रारी दाखल केल्या होत्या असा दावा केला होता.
ओवैसींच्या एक्स पोस्टवरुन प्रकरणाला मिळाली पुष्टी
I LOVE MOHAMMAD ﷺ @adgzonekanpur ये जुर्म नहीं है। अगर है तो इसकी हर सज़ा मंज़ूर है।
तुम पर मैं लाख जान से क़ुर्बान या-रसूल
बर आएँ मेरे दिल के भी अरमान या-रसूलक्यों दिल से मैं फ़िदा न करूँ जान या-रसूल
रहते हैं इस में आप के अरमान या-रसूल https://t.co/8kKWY22zHC— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 15, 2025
15 सप्टेंबरच्या दिवशी एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणाशी संबंधित एक पोस्ट एक्स प्लॅटफॉर्मवर केली. या पोस्टमध्ये त्यांनी कानपूर पोलिसांना टॅगकरुन लिहिलं की, ‘आय लव्ह मोहम्मद’ असं म्हणणं गुन्हा नाही. जर हा गुन्हा असेल तर यासाठी दिली जाणारी शिक्षा आम्हाला मान्य आहे. मिलादच्या दिनी आयोजित केल्या जाणाऱ्या मिरवणूकीमध्ये मुस्लिम समाजाने नवीन पद्धत सुरू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या, असा दावा ही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
कानपूर पोलिसांची बाजू
#खण्डन– थाना रावतपुर क्षेत्रान्तर्गत सैयद नगर मोहल्ले से बारावफात का एक परंपरागत जुलूस निकलना था। मोहल्ले के कुछ लोगों द्वारा परंपरागत स्थान से हटकर टेंट, पोस्टर व बैनर लगाये गये। जुलूस के दौरान इसमें शामिल कुछ युवकों द्वारा दूसरे सम्प्रदाय के धार्मिक पोस्टर को फाड़ दिए जाने से… pic.twitter.com/zt4IFhZ5no
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) September 23, 2025
कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलादच्या दिवशी आयोजित केलेल्या मिरवणूकी दरम्यान, ‘आय लव्ह मोहम्मद’ या फलकावरून कोणतीही तक्रार दाखल केली नाही. तर या मिरवणूकीवेळी पारंपरिक पद्धतीने ज्याठिकाणी तंबू लावला जातो त्याठिकाणी तंबू न लावता अन्य ठिकाणी लावल्याबद्दल आणि एका समुदायाने दुसऱ्या समुदायाचे फलक फाडल्या संबंधित तक्रार दाखल केल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणावरून कोणत्याही अफवा पसरवू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मात्र, पोलिसांकडून स्पष्टीकरण येईपर्यंत या प्रकरणाचे पडसाद अन्य ठिकाणी पडले होते.
‘आय लव्ह महादेव’ चा ट्रेंड
यासगळ्या प्रकरणाविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. सोशल मीडियावर #आयलव्हमोहम्मद या हॅशटॅगने पोस्ट फिरू लागल्या. या ट्रेंडला प्रत्यूत्तर म्हणून सोशल मीडियावर #आयलव्हमहादेव हा ट्रेंड सुरू केला. हा ट्रेंड केवळ सोशल मीडियावरच नाही तर वाराणसीच्या रस्त्यावर ही वेगाने पसरतोय.
वाराणसीतल्या अनेक युवकांनी आपल्या हातावर ‘आय लव्ह महादेव’ असा टॅटू काढायला सुरूवात केली आहे. टॅटू पार्लर चालकांनी सांगितलं की, या विवादामुळे अनेक तरुण आपल्या हातावर ‘आय लव्ह महादेव’ असा टॅटू काढून घेत आहेत. वाराणसी हे शिवाचं शहर आहे. हे पावलोपावली स्पष्ट करण्यासाठी अनेक तरुण या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.