गर्भधारणा ते बाळाचा जन्म होईपर्यंत स्त्रीची फार काळजी घेतली जाते. एकदा का बाळाचा जन्म झाला की सगळ्या कुटुंबाचं लक्ष नवजात बाळाकडे केंद्रीत होतं. बाळंतीण आईची सुरुवातीला फार काळजी घेतली जाते. पण एकदा का सहा महिने भरले की त्या स्त्रीवर पहिल्या सारख्या संपूर्ण जबाबादाऱ्या टाकून तिने आता सगळंच सांभाळलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवली जाते.
पण वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी तब्बल सहा वर्षाचा कालावधी लागतो. हा इतका मोठा कालावधी का लागतो, स्त्री च्या शरीरात या संपूर्ण प्रवासात काय बदल घडतात, आणि ही पूर्ण बरी होण्याची प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊयात.
बाऊन्स बॅक पिरीयड
एखादी महिला जेव्हा बाळंतपणासाठी कामातून सुट्टी घेते आणि तीन महिने किंवा सहा महिन्यानंतर पुन्हा कामावर रुजू होते, तेव्हा त्याला बाऊन्स बॅक पिरीयड असं म्हटलं जातं. जी महिला तीन महिन्यातच घरातली कामं करु लागते किंवा तीन महिन्यातच ऑफिसला जाऊ लागते ती महिला खूप मजबूत, सक्षम आहे असं समजलं जातं. समाजात अशा महिलांचं खूप कौतुक करतात. संपूर्ण बाळंतपणाच्या प्रक्रियेमध्ये ती लवकर बरी झाली असा समज होतो. मात्र, हे पूर्ण चुकीचं आहे. कारण बाळंतपणानंतर स्त्रीचं शरीर तीन महिन्यामध्ये पूर्ण बरं होऊ शकत नाही. यासाठी एक – दोन वर्ष नाही तर तब्बल सहा वर्षाचा कालावधी लागतो.
गर्भारपणाच्या काळात जेव्हा स्त्रीच्या उदरात बाळ जन्माला येत असतं, तेव्हा त्या बाळाच्या पोषणासाठी तिचं पूर्ण शरीर रिकामी होत असतं. त्या स्त्रीच्या शरीरातले लोह, कॅल्शिअम, शरीराला ऊर्जा पुरवणारे फॅटी अॅसिड पूर्णत: नाहीसे होतात. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेल्या हा गुणसत्वाच्या पुननिर्मितीसाठी किंवा शरीरात या गुणसत्वांचा भरणा होण्यासाठी 2 ते 6 वर्षाचा कालावधी अत्यावश्यक असतो.
मानसिक आरोग्य
ज्यावेळी स्त्री गर्भवती होते त्यावेळी तिच्या मेंदूमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू लागतात. यामध्ये जन्माला येऊ घातलेल्या बाळासोबतचे नातेसंबंध, अधिक सावधता बाळगणे, स्मरणशक्ती अशा विविध मुद्द्यांवर बदल घडू लागतात.
आपल्या मेंदूमध्ये राखाडी (ग्रे) आणि पांढरी (व्हाईट) बाजू असतात. यापैकी राखाडी बाजू ही बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाची असते. जर ही राखाडी बाजू कमी झाली तर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते तसेच छोट्या छोट्या गोष्टीचं विस्मरण होऊ लागतं.
गर्भारपणाच्या काळात या राखाडी बाजूमध्ये 7 टक्क्यांने घट होते. जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा त्या आईला बाळाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी तिला खूप जास्त सावध, सतर्क राहावं लागतं. या संपूर्ण कालावधीमध्ये तिचा मेंदू खूप थकतो. पुरेशी झोप नसते, शरिरामध्ये गुणसत्वांची कमतरता असते. अशावेळी त्या स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. मात्र, याकडे आजही पूर्णत: दुर्लक्ष केलं जातं हे वास्तव आहे.
बाळंतपणानंतर हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आरोग्य
बाळाला जन्म दिल्यावर त्या स्त्रीच्या हृदयाचं कार्य, रक्तदाब आणि पचन संस्था पुन्हा स्थिर होण्यासाठीही साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो. ज्यावेळी बाळंतीणीला थकल्यासारखं किंवा अशक्त वाटू लागतं, तेव्हा तिच्या हृदयात अस्थिरता असते असं अभ्यासात म्हटलं आहे.
अपुऱ्या झोपेचे परिणाम
बाळंतपणाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्या स्त्रीला पुरेशी झोप मिळत नाही. अपुरी झोप हे तिच्या थकव्यामागचं, शारिरीक, मानसिकरित्या दुर्बल राहण्यामागचं मुख्य कारण असतं. या कारणामुळे त्या महिलेची रिकव्हरी, बरी होण्याची प्रक्रिया संथ होते.
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्या महिलेच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. तसेच मध्यरात्रीच्या वेळी किंवा जेव्हा कधीही गाढ झोपेतून झोपमोड होते, त्यावेळी शरीरातील स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते.
…तरिही लवकर बरी होण्याची अपेक्षा किती व्यवहार्य
एका बाळाला जन्म दिल्यावर त्या स्त्रिच्या डोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवामध्ये, शरीरातील हार्मोन्समध्ये, नसानसात प्रचंड प्रमाणात बदल घडत असतात. एका बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई अशक्त, कमजोर होणं याचा अर्थ ती स्त्री सशक्त किंवा सक्षम नाही असा होत नाही. तर, हे एक शरीरशास्त्र आहे, शरीराच्या पूनर्रभरणासाठी पुरेसा कालावधी द्यावाच लागेल हे समजून घेण्याची गरज आहे.
भारतामध्ये कायद्यानुसार बाळंतीण आईला सहा महिन्यांची सुट्टी दिली जाते. तरिही, अनेक खाजगी आस्थापणांमध्ये ही पूर्ण सुट्टी पूर्ण पगारासह दिली जात नाही. एकतर, तीन महिनेच सुट्टी दिली जाते पूर्ण पगारासह किंवा अर्ध्या पगारासह सुट्टी दिली जाते. यामुळे एकतर अनेक महिलांना नोकरी सोडावी लागते. किंवा स्वत:च्या तब्येतीकडे पूर्ण दुर्लक्ष करुन नोकरीवर रुजू व्हावं लागतं. त्यामुळे पुढे अशा महिलांना अनेक शारिरीक आणि मानसिक आजारांना सामोरं जावं लागतं.
नॉर्वेमध्ये 1 वर्षाची सुट्टी
नॉर्वेमध्ये बाळंतपणाची सुट्टी ही पूर्ण एक वर्षाची असते आणि तिही पूर्ण पगारासह. यामुळे तिथे पोस्ट पार्टेम डिप्रेशनचा दर कमी आहे. तिथल्या स्त्री या मोठ्या प्रमाणावर आपल्या नवजात बाळाला दूध पाजतात. आई आणि बाळाचं नातं या काळात अधिक दृढ होतं, जास्त काळ आईचं पुरेसं दूध मिळाल्यामुळे बाळं ही निरोगी राहतं. आईलाही पुरेशी विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळतो. ती ही तणावमुक्त राहते.
निरोगी आई, निरोगी कुटुंब
ज्यावेळी कुटुंबातली आई ही तंदुरूस्त, निरोगी, तणावमुक्त असते तेव्हा त्या घरातलं वातावरण प्रसन्न असते. जर बाळंतिणीला पुरेशी विश्रांती मिळत असेल तर नैराश्याचा दर, पोस्ट पार्टेम दर कमी राहतो. संपूर्ण कुटुंब मजबूत राहतं. मुलंही तणावमुक्त घरात वाढत असल्यामुळे त्यांची वाढ खुप सकारात्मक आणि उत्तम होत असते. थोडक्यात संपूर्ण नवीन पिढीही योग्य पद्धतीने घडत असते.
अनेकदा आपण जन्म दिलेल्या बाळालाच सगळा वेळ दिला पाहिजे. जे काही करु ते त्या बाळासाठीचं असं म्हणत अनेक स्त्रिया या बाळंतपणाच्या कालावधीत स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. मात्र, त्यामुळे त्या बाळाचंही कुठेतरी नुकसान होत असते. ज्यावेळी आई ही पूर्ण वेळ काळजीत, तणावात असते तेव्हा दूध पिणारं बाळ ही तणावग्रस्त असतं.
आई तिच्या मनामध्ये शरिरात जी ऊर्जा निर्माण करत असते तिच ऊर्जा तिच्या बाळापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे त्या आईने जर स्वत:ची जास्त काळजी घेत, प्रसन्न राहिली तर तिच सकारात्मक ऊर्जा बाळापर्यंत पोहचू शकते. त्यामुळे बाळंतपणाचा काळ हा सहा महिन्यापर्यंत सिमीत नसून सहा वर्षापर्यंतचा आहे. त्यामुळे स्त्रियांना बाळाला जन्म दिल्यावर सहा वर्ष स्वत:च्या तब्येतीवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.