नवरात्र म्हटलं की नऊ दिवस पूर्ण उपवास, फळाहार, संध्याकाळच्या वेळी रंगीबेरंगी लेहंगे, गळ्यात ऑक्साईडचे दागिने घालून गरबा, दांडिया खेळणे हे एक सर्वसाधारण सण साजरा करण्याची पद्धत आपल्या नजरेसमोर येते. ही संपूर्ण पद्धत गुजराती संस्कृतीवर आधारित आहे. यासाठी स्पेशल गरब्याची गाणी तयार केली जातात, स्पेशल लेहंग्यांचा ट्रेंड सुरू होतो. 500, हजार ते त्याहून अधिक किंमतीचे पासेस घेऊन तरुण-तरुणी उत्साहाने या गरबा इव्हेंटला हजेरी लावतात. यामध्ये महाराष्ट्रीयन तरुणांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. अगदी सोसायटीच्या आवारातही मराठी लोकं नऊ रात्री मनसोक्त गरबा खेळतात. पण, नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात भोंडला किंवा हादग्याची विशेष अशी संस्कृती लाभली आहे. जाणून घेऊयात हा भोंडला काय असतो आणि ते कसा साजरा करतात.
भोंडल्याची संस्कृती
दुर्गा मातेच्या उपासनेसाठी साजरा केल्या जाणाऱ्या या नवरात्री निमित्ताने महाराष्ट्रामध्ये भोंडल्याची संस्कृती आहे. यालाच हादगा किंवा भूलाई असंही म्हटलं जातं. श्रावणात ज्याप्रमाणे महिला एकत्र येत मंगळागौरीचे खेळ खेळतात. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या उत्सवात स्त्रिया आणि मुली एकत्र येत भोंडला खेळतात.
यामध्ये अंगणात मध्यभागी हत्तीची मूर्ती किंवा एखाद्या पाटीवर हत्तीचं चित्र काढून ठेवलं जातं. त्यांच्याभोवती सहभागी महिला आणि तरुण मुली भोंडल्याची विशेष लोकगीतं गात फेर धरतात. भोंडल्याच्या या लोकगीतांमधून निसर्गाबद्दलचा आदर, शेतीसाठी शुभेच्छा आणि सामाजिक एकात्मता याचा संदेश दिला जातो.
वर्तुळाच्या मध्यभागी हत्ती का ठेवतात?
भोंडल्याच्या खेळामध्ये हत्तीची मूर्ती किंवा चित्र ठेवलं जातं. कारण हत्ती हे सुबत्ततेचं प्रतिक समजलं जातं. लक्ष्मीसोबत नेहमी एक हत्ती असतो. या हत्तीला गजलक्ष्मी, गजगौरी असं संबोधलं जातं. हे पार्वतीचं रुप असल्याचं मानलं जातं. जेव्हा आपण गजलक्ष्मी, गजगौरीच्या भोवती नृत्य करतो वा फेर धरतो तेव्हा आपल्या घरात समृद्धी येते अशी धारणा आहे.
दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा सन्मान असतो. भारतीय प्रथेनुसार हत्ती हा संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतिक आहे. त्यामुळे या नऊ दिवसात हत्तीच्या भोवती भोंडला खेळला जातो.
खिरापतीच्या गंमती-जमती
या उत्सवाची रंजकता केवळ भोंडल्यापुरती मर्यादीत नाही तर त्यानंतर आयोजित केलेल्या खिरापतीमध्येही खूप मजा येते. भोंडल्याचे खेळ झाल्यावर तिथे जमा झालेल्या सर्व महिला आपल्या डब्यात काहिनाकाही खाऊ घेऊन येतात. याला ‘खिरापत’ असं म्हटलं जातं. आता हा खाऊ सहजपणे सगळ्यांमध्ये वाटला जातो का? तर नाही. यासाठीही खेळ घेतला जातो. प्रत्येक महिला किंवा मुलगी तिच्या डब्यातल्या पदार्थाबद्दल कोडं घालते. उपस्थित मुलींनी हे कोडं सोडवत तो पदार्थ काय आहे हे ओळखायचं असतं. अशा पद्धतीने तो पदार्थ ओळखल्यावरच तो सर्वांना वाटतात. किंवा जिच्या घरी हा भोंडला आयोजित केला आहे, ती ही खिरापत काय आहे हे ओळखण्यासाठी कोडी घालते.
भोंडल्याची माहिती तर तुम्हाला मिळाली.. आता तुम्हीसुद्धा भोंडल्याच्या तयारीला लागणार असाल. पण त्यासाठी भोंडल्याली विशेष गाणी तर हवीच ना. तर तुमच्यासाठी ही गाणी ही देत आहोत. दर तुमच्या घरात किंवा सोसायटीत भोंडला खेळून नवरात्रीचा आनंद घ्या
1. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी , आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साड्या डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो
2 – नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
3 – हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं
4 – आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला