शिक्षण म्हटलं की आजकाल शाळेच्या फी सोबतच कोचिंग क्लासची फी देखील अवाढव्य झाली आहे. आता परिस्थिती अशी आहे की, काही ठिकाणी मुलं प्री-प्रायमरी पासूनच कोचिंग क्लासला जायला लागली आहेत. सरकारने जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, भारतात पालक आपल्या मुलांच्या कोचिंग क्लासेसवर किती आणि कसा खर्च करतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.
खर्च करण्यात ‘गुजरात’ नंबर वन
कोचिंग क्लासवर होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत गुजरात राज्य देशात अव्वल आहे. इथला प्रत्येक विद्यार्थी वर्षाला क्लासवर सरासरी ₹14,545 रुपये खर्च करतो. तसंच, दिल्ली (प्रति मूल सरासरी) ₹ 14,424 आणि महाराष्ट्र (प्रति मूल सरासरी) ₹14,398 या राज्यांचा नंबर देखील गुजरातच्या मागोमाग लागतो. या तिन्ही राज्यांमध्ये पालकांचा कोचिंगवरचा खर्च खूप जास्त आहे, जो (प्रति मूल सरासरी) ₹14,300 च्या वर आहे. यावरून स्पष्ट होतं की, या राज्यांतील कुटुंबे आपल्या मुलांच्या ‘अतिरिक्त’ शिक्षणासाठी खूप मोठी रक्कम खर्च करत आहेत.
कोचिंगला जाणारे विद्यार्थी किती?
कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शिक्षणाच्या स्तरानुसार वाढत जाते. ‘प्री-प्रायमरी’ स्तरावर ग्रामीण भागात 11% मुले कोचिंगला जातात, तर ‘उच्च माध्यमिक’ स्तरावर ही संख्या 40% च्या आसपास पोहोचते.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागातील मुले जास्त प्रमाणात कोचिंग क्लासला जातात. तसेच, उच्च माध्यमिक स्तरावर कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.कोचिंग क्लासला पाठवण्यामध्ये देखील आजही मुला-मुलींमध्ये थोडा फरक दिसतो.
ग्रामीण भागात प्रत्येक स्तरावर मुलींपेक्षा मुलांना किंचित जास्त कोचिंग दिलं जातं. तर , शहरी भागात हा फरक अजून स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, प्री-प्रायमरीमध्ये 15.5 % मुले कोचिंगला जातात, तर 11.5% मुली कोचिंगला जातात. यामध्ये, अपवाद म्हणजे फक्त उच्च माध्यमिक स्तरावर शहरी भागातील मुले (44.6% आणि मुली (44.5%) यांची संख्या जवळपास सारखी आहे, म्हणजे या स्तरावर मुलींनाही तितकंच महत्त्व दिलं जात आहे.
खर्चाचा चढता आलेख
शिक्षणाचा स्तर वाढत जातो, तसा कोचिंग क्लासवरचा खर्चही वाढत जातो. तसेच, शहरी भागातील खर्च ग्रामीण भागापेक्षा नेहमीच जास्त असतो. सर्वात जास्त खर्च उच्च माध्यमिक स्तरावर होतो, कारण याच काळात अनेक प्रवेश परीक्षांची तयारी केली जाते.
पश्चिम बंगालसारख्या राज्यांत तर कोचिंग क्लासची सुरुवात खूप लवकर होते. तसंच, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संपूर्ण देशात मुलगा आणि मुलगी यांच्या खर्चातील तफावत कमी झाली असली तरी, राजस्थान मध्ये यात आजही मोठा फरक दिसून येतो. इथे प्रत्येक मुलांवर सरासरी ₹31,347 खर्च होतो, तर प्रत्येक मुलींवर फक्त ₹17,054 खर्च होतो. म्हणजे मुलींच्या तुलनेत मुलांवर जवळपास दुप्पट खर्च केला जातो.
या आकडेवारीतून स्पष्ट होतं की, कोचिंग क्लास हे आता ‘अतिरिक्त’ शिक्षण न राहता, भारतीय शिक्षण पद्धतीचा अत्यावश्यक’ भाग बनला आहे आणि यासाठी पालक मोठी किंमत मोजायला तयारही आहेत.