स्वातंत्र्यपूर्व काळात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात महिलांचं अस्तित्वच नसायचं. मुलीचं शालेय शिक्षण झाल्यावर लग्न करणं आणि घर सांभाळचं अशी परिस्थिती होती. अशा स्थितीत शालेय शिक्षणानंतर विज्ञान शाखेतून शिक्षण घ्यायला सुरूवात करणं, त्यातही भौतिकशास्त्रासारखा विषय निवडणं हे अत्यंत आश्चर्यचकित करणार होतं. मात्र, केरळमधल्या टी.के.राधा यांनी भौतिकशास्त्रातून उच्च शिक्षण पूर्ण करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला.. पाहुयात त्यांचा प्रवास.
केरळमधल्या थायूरमध्ये 1938 साली टी.के.राधा यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामाजिक बंधनांमध्ये अडकून न राहता महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत भौतिकशास्त्र विषयात गोल्ड मेडल मिळवलं. महाविद्यालयामध्ये त्यांनी ‘पार्टीकल फिजिक्स अँड क्वाटम मेकॅनिक्स’ या विषयावर बारकाईने अभ्यास केला होता.
त्यावेळी अमेरिकेतले प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ जुलियस रॉबर्ट ऑपनहाइमर यांनी 1965 साली टी.के.राधा यांना प्रीन्सटन विद्यापीठात विशेष निमंत्रण दिलं होतं.
तिथे त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांसह तसेच लिओनार्ड शिफ आणि रॉबर्ट मार्शेक यांच्यासोबत काम केलं आहे.
क्वांटम मेकॅनिक्स, फेनमन प्रोपॅगेटर आणि कणांच्या परस्पर संवादांवर राधा याचं काम हे खूप उल्लेखनीय आहे. भारतीय महिलांच्या प्रतिभेचं दर्शन टी.के. राधा यांच्या विद्वतेतून आणि कार्यातून दिसून येतं.
तत्कालिन स्थितीत विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात प्रवेश करणं आणि चौकटीच्या बाहेर पडून स्वत:ला झोकून देऊन काम करणं कौतुकास्पद होतं. टी.के.राधा यांच्या जिद्दीमुळे आणि या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीमुळए नंतर अनेक मुलीं या क्षेत्राकडे आकर्षिल्या गेल्या आणि त्यांनीही या क्षेत्रात प्रवेश करुन काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे टी.के. राधा यांना भौतिकशास्त्रातले प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून गणलं जातं.